विरोधकांचा भाजपवर हल्लाबोल

पल्लवी धेंपे यांना उमेदवारी दिल्याबद्दल टीका : भांडवलदारांना उमेदवारी विकल्याचा आरोप,पल्लवी यांच्या योगदानाबद्दल प्रश्नांची सरबत्ती पणजी : भाजपने दक्षिण गोव्याची लोकसभा उमेदवारी उद्योगपती श्रीनिवास धेंपे यांच्या पत्नी पल्लवी धेंपो यांना दिल्यानंतर गोव्यातील विरोधी पक्षांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला असून भांडवलदारांना उमेदवारी विकण्यात आल्याची टीका केली आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक हा केवळ एक फार्स […]

विरोधकांचा भाजपवर हल्लाबोल

पल्लवी धेंपे यांना उमेदवारी दिल्याबद्दल टीका : भांडवलदारांना उमेदवारी विकल्याचा आरोप,पल्लवी यांच्या योगदानाबद्दल प्रश्नांची सरबत्ती
पणजी : भाजपने दक्षिण गोव्याची लोकसभा उमेदवारी उद्योगपती श्रीनिवास धेंपे यांच्या पत्नी पल्लवी धेंपो यांना दिल्यानंतर गोव्यातील विरोधी पक्षांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला असून भांडवलदारांना उमेदवारी विकण्यात आल्याची टीका केली आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक हा केवळ एक फार्स होता, असेही विरोधी पक्षांनी म्हटले आहे. काँग्रेसने भाजपवर जोरदार निशाणा साधला असून पल्लवी यांचे राज्यातील राजकारणासाठी आणि भाजपमधील योगदान काय? असा प्रश्न विरोधी पक्षांनी उपस्थित केला आहे. भाजपचे गोवा प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे यांना या प्रकरणी बोलण्याची हिंमत होणार काय? अशी विचारणा काँग्रेसने केली आहे. भाजपने दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघासाठी एका उद्योजकाच्या पत्नीला उमेदवारी दिली म्हणून ‘आप’चे गोवा प्रदेश अध्यक्ष अमित पालेकर यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. भाजपच्या महिला वर्गाकडे दुर्लक्ष करण्यात आले. ‘धेंपे’ या उद्योगातील नावाचा (ब्रॅण्ड) गैरवापर कऊन ती उमेदवारी देण्यात आल्याची टीका पालेकर यांनी केली आहे. भाजपमध्ये तळमळीने काम करणाऱ्या एका महिलेला ती  मिळायला हवी होती. थोडक्यात काय तर भाजपचे कार्यकर्ते म्हणजे ‘वापरा व फेका’ (टिश्यू पेपरसारखे) असा प्रकार असल्याची प्रतिक्रिया पालेकर यांनी दिली आहे.
विजयीची संधी दिल्याबद्दल आभार : परब
दक्षिण गोव्यात भाजपने एका महिलेला उमेदवारी दिली म्हणून भाजपचे अनेक कार्यकर्ते (महिलांसह) दुखावले गेल्याचे रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी म्हटले आहे. भाजपच्या या दक्षिण गोव्यातील उमेदवार निवडीबाबत आरजीने भाजपला धन्यवाद दिले असून आभार मानले आहेत. त्या निवडीमुळे आरजीपीला उत्तर गोव्याप्रमाणे दक्षिणेतही विजयी होण्याची संधी प्राप्त झाली आहे. गोव्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात आरजीपीची लाट असून यावेळी गोमंतकीय जनता आरजीपी उमेदवारांना मतदान करणार आणि निवडून आणणार असा दावा परब यांनी केला आहे.
काम केलेल्यांना टाळणे दुर्दैव : अमित पाटकर
भाजपमध्ये आताच दाखल झालेल्या एका महिला उमेदवारास भाजपने उमेदवारी दिली आहे. भाजपसाठी ज्यांनी काम केले, पक्ष वाढवला त्यांना टाळण्यात आले हे मोठे दुर्दैव आहे. भाजपला त्यांच्या कार्यकर्त्यांमधून दक्षिण गोव्यासाठी उमेदवार सापडला नाही अशी टीका गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे.
निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय : आलेमांव
विरोधी पक्षनेते युरी आलेमांव म्हणाले की, भाजपच्या दिल्लीतील हुकूमशाही पक्षश्रेष्ठींसमोर गोवा भाजपने मान टाकली असून त्यांच्यासमोर गोवा भाजपचे काही चालत नाही हे स्पष्ट झाले आहे. गोवा भाजपची ही मोठी शरणागती असून ती गोवा भाजपला पत्कारावी लागली आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून भाजपने एका उद्योजकाच्या पत्नीस उमेदवारी देऊन कार्यर्त्यांवर अन्याय केल्याचे आलेमांव यांनी नमूद केले.
भाजपच्या दिल्लीतील हुकूमशाही पक्षश्रेष्ठींसमोर गोवा भाजपने मान टाकली आहे. गोवा प्रदेश भाजपची ही शरणागती.
– युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते
भाजपसाठी काम केलेल्यांना टाळणे हे दुर्दैवी आहे. भाजपला स्वत:मधला उमेदवार सापडला नाही.
– अमित पाटकर, अध्यक्ष, गोवा प्रदेश काँग्रेस
भाजपमध्ये तळमळीने काम करणाऱ्या महिलेला उमेदवारी मिळायला हवी होती. भाजपचे कार्यकर्ते म्हणजे ‘वापरा व फेका.’
– अमित पालेकर, अध्यक्ष, गोवा प्रदेश आप
उमेदवार निवडीबाबत भाजपला धन्यवाद. या निवडीमुळे आरजीपीला दक्षिणेतही विजयाची संधी प्राप्त झाली आहे.
– मनोज परब, पक्षप्रमुख, आरजीपी