दुसऱ्या दिवशीही विधानसभेत गदारोळ
प्रश्नोत्तराचा प्रश्न ‘समज’ देऊन सोडविला : भविष्यात खबरदारी घ्या : मुख्यमंत्री
पणजी : विधानसभा अधिवेशनात दोन दिवसांच्या कामकाजात प्रश्नोत्तराचे दोन तास गदारोळात घालविल्यानंतर अखेर मुख्यमंत्र्यांनाच त्यावर ‘समज’ हे उत्तर सापडले व त्यातून सर्वांचे समाधान होऊन पुढील कामकाजास सुरळीतपणे प्रारंभ झाला. मात्र या गदारोळात दोन्ही दिवस सभापतींना प्रत्येकी दोन वेळा कामकाज स्थगित करावे लागले होते हेही तेवढेच खरे. सभापती हे सर्वोच्च पद असले तरी त्या पदावरील विद्यमान व्यक्ती व आपण एकाच समाजाचे आहोत व दोघांचीही तळमळ ही समाजाचे हित व भल्यासाठीच आहे. त्यामुळे आपण केलेली मागणी वैयक्तिक नसून समाजासाठीच होती. अशी मागणी करणे हा गुन्हा नाही व त्यातून सभापतीपदाचा अपमान होण्यासारखेही काही बोललेलो नाही, असा दावा आमदार अॅल्टन डिकॉस्टा यांनी केला व माफी न मागण्याच्या आपल्या निर्णयावर ते ठाम राहिले.
त्यावेळी सत्ताधाऱ्यांनी त्यांना सभापतींच्या चेंबरमध्ये जाऊन वैयक्तिकरित्या माफी मागण्याचा सल्ला दिला. तरीही अॅल्टन यांच्यावर कोणताही परिणाम झाला नाही. आज आपण सभापतींसमोर गुपचूप माफी मागितली तरी भविष्यात ती एक वाईट प्रथा पडेल. आपणाला कोणताही अहंकार नाही. त्यामुळे प्रसंगी शिक्षा भोगेन पण माफी मागणार नाही, हवे तर सरकारने सदर मुद्दा सभागृह समितीकडे पाठवावा, आपण सामोरे जाण्यास तयार आहे, असे ठाम मतही त्यांनी मांडले.
याच मुद्यावर सभागृहात तब्बल दोन दिवस गरमागरम चर्चा चालली होती. त्यातून प्रचंड गदारोळ माजला होता. सभापतींनी दोन्ही दिवस चक्क दोन वेळा कामकाज स्थगितही केले होते. सत्ताधारी गटातील आमदारांनी सोमवारी या मुद्यावर अॅल्टन यांच्याकडून माफीची मागणी करणारे फलकही दाखवले होते. हे फलक त्यांनी आधीच तयार करून आणले होते, त्यावरून हे पूर्वनियोजित षडयंत्र होते, असे आरोप विरोधकांनी केले होते. सरकारला विरोधकांच्या जनहितकारी प्रश्नांची उत्तरे टाळायची आहेत, त्यामुळेच हे सर्व खेळ चालले आहेत, असा दावाही विरोधकांनी केला होता.
अशा प्रकारे सत्ताधारी व विरोधक दोघेही आपापल्या मागण्यांवर ठाम राहिले. विजय सरदेसाई यांनी याप्रश्नी बोलताना, सभागृहाच्या कामकाजात खुद्द सत्ताधाऱ्यांकडूनच मोडता घालण्याचा असा प्रकार बहुदा भारताच्या इतिहासात प्रथमच घडला असावा, असा दावाही केला. युरी आलेमाव यांनी बोलताना, यापूर्वी सभापती रमेश तवडकर यांनी खुद्द मुख्यमंत्र्यांवरच गंभीर आरोप केले होते. मात्र त्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्षांनी ‘तो आपला अंतर्गत कौटुंबिक प्रश्न’ असल्याचे सांगून वाद संपुष्टात आणला होता, याचे स्मरण करून दिले. तोच नियम लावून सध्याचा वाद का सोडविला जात नाही, असा सवालही त्यांनी केला. आश्चर्यकारक प्रकार म्हणजे, सभापतीपदाचा अपमान झाल्याबद्दल आमदाराकडून माफीची मागणी करणारा ठराव मांडणारे आमदार दाजी साळकर हे नंतरच्या गदारोळात कुठेच सहभागी झाले नाहीत, हा मुद्दाही विरोधकांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला. आमदार संकल्प आमोणकर यांनी एक दोनदा अॅल्टन यांना समजावण्याचे प्रयत्न केले. परंतु अॅल्टनकडून त्याच तोडीचे प्रत्युत्तर मिळाल्यानंतर ते गप्प बसले.
प्रत्येक सदस्याने खबरदारी घ्यावी : मुख्यमंत्री
सरते शेवटी दुपारी 12.30 वाजता स्वत: मुख्यमंत्र्यांनीच या प्रश्नाचे उत्तर शोधले व भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत याची प्रत्येक सदस्याने खबरदारी घ्यावी, सभापतीपदाचा मान सन्मान राखला जावा, अशा शब्दात सर्वांना ’समज’ दिली व या ‘मानापमान’ नाट्यावर पडदा टाकला.
सभागृहाचे पावित्र्य राखा : तवडकर
सभापती रमेश तवडकर यांनी यावेळी बोलताना, सभागृहाचे पावित्र्य राखणे ही प्रत्येक सदस्याची जबाबदारी असल्याचे सांगितले. एखादी छोटीशी चूक झाली तरी ती मान्य करण्याएवढा मनाचा मोठेपणा असायला हवा, असे ते म्हणाले. अॅल्टन डिकॉस्टा यांनी मांडलेल्या ठरावासारखाचा ठराव वर्षभरापूर्वीच मांडण्यात आला होता व एकमताने मंजुरही करण्यात आला होता.त्यामुळे हा ठराव फेटाळण्यात आला असे तवडकर यांनी स्पष्ट केले. त्यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी, ठराव सादर करणे हा सदस्याचा अधिकार आहे. एखादा ठराव दुसऱ्यांदा सादर केला तरी ते चुकीचे किंवा नियमांच्या विरोधात नाही, असे सांगितले.
Home महत्वाची बातमी दुसऱ्या दिवशीही विधानसभेत गदारोळ
दुसऱ्या दिवशीही विधानसभेत गदारोळ
प्रश्नोत्तराचा प्रश्न ‘समज’ देऊन सोडविला : भविष्यात खबरदारी घ्या : मुख्यमंत्री पणजी : विधानसभा अधिवेशनात दोन दिवसांच्या कामकाजात प्रश्नोत्तराचे दोन तास गदारोळात घालविल्यानंतर अखेर मुख्यमंत्र्यांनाच त्यावर ‘समज’ हे उत्तर सापडले व त्यातून सर्वांचे समाधान होऊन पुढील कामकाजास सुरळीतपणे प्रारंभ झाला. मात्र या गदारोळात दोन्ही दिवस सभापतींना प्रत्येकी दोन वेळा कामकाज स्थगित करावे लागले होते हेही तेवढेच खरे. सभापती […]