फर्मागुडीच्या पठारावर..काकडीच्या मळ्यांना बहर..!

मळे उभारणीच्या कामात शेतकऱ्यांची लगबग : 15 दिवसांत गावठी काकडी बाजारात :अभियांत्रिकीच्या पठारावर फुलवतात फुले, भाजीचा मळा फोंडा : तशी काकडी वर्षभर बाजारात मिळते. पण गोवेकरांना उत्सुकता असते ती अस्सल पावसाळी गावठी तवशांची…! फोंडा तालुक्यातील फर्मागुडीच्या पठारावर व डोंगर टेकड्यांवर सध्या काकडीचे हंगामी मळे बहरू लागले आहेत. पावसाच्या धारा अंगावर झेलीत, वाढलेल्या वेलिंना बहरण्यासाठी मांडवाची […]

फर्मागुडीच्या पठारावर..काकडीच्या मळ्यांना बहर..!

मळे उभारणीच्या कामात शेतकऱ्यांची लगबग : 15 दिवसांत गावठी काकडी बाजारात :अभियांत्रिकीच्या पठारावर फुलवतात फुले, भाजीचा मळा
फोंडा : तशी काकडी वर्षभर बाजारात मिळते. पण गोवेकरांना उत्सुकता असते ती अस्सल पावसाळी गावठी तवशांची…! फोंडा तालुक्यातील फर्मागुडीच्या पठारावर व डोंगर टेकड्यांवर सध्या काकडीचे हंगामी मळे बहरू लागले आहेत. पावसाच्या धारा अंगावर झेलीत, वाढलेल्या वेलिंना बहरण्यासाठी मांडवाची उभारणी व इतर कामांमध्ये येथील शेतकरी गुंतलेला आहे. हवामान पोषक राहिल्यास येत्या पंधरा दिवसांत चवदार ‘पिपऱ्यां’ची लज्जत चाखायला मिळणार आहे. फर्मागुडी येथील गोवा अभियांत्रिकी कॉलेजच्या पाठिमागील माळरानावर वेलिंग गावातील काही शेतकरी कुटुंबे मळ्यांची लागवड करतात. वेलिंगपासून बांदोड्यापर्यंत विस्तारलेल्या या संपूर्ण पठारावर हंगामी भाजी मळ्यांची लागवड पूर्वापार केली जाते. एकेकाळी वेलिंग गावातील प्रत्येक घरातून हे हंगामी पीक घेतले जात होते.
आता अवघी पंधरा ते वीस शेतकरी कुटुंबे हा पूर्वापार कृषी व्यावसाय करताना दिसतात. अगदी नोकरी धंदा सांभाळून व पदरमोड करून ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर ही कृषी परंपरा जपणारे तऊण शेतकरी येथील मळ्यात राबताना  दिसतात. चंदन वेलिंगकर हा तऊण शेतकरी गेल्या दहा वर्षांपासून याठिकाणी मळ्याची लागवड करीत आहे. गोवा अभियांत्रिकी कॉलेजच्या जागेत त्याचा मळा आहे. दरवर्षी रितसर परवानगी घेऊन कॉलेजच्या पाठिमागील मोकळ्या जागेत तो व त्याची आई हा मळा लावतात. यंदा गावठी काकडी बरोबरच दोडकी, कारली, वाल, भेंडी आदी भाज्यांची लागवड त्याने केली आहे. पूर्वी त्याचे आजोबा व त्यानंतर वडील बाजूच्या कटमगाळ परिसरात मळे लावत होते. चंदन याच्याबरोबरच कृष्णनाथ गावडे, सुरेश गावडे, राघोबा गावडे व शशिकांत गावडे या वेलिंग गावातील पाच शेतकऱ्यांनी यंदा गोवा अभियांत्रिकीच्या जागेत मळे लावले आहेत.
भर उन्हाळ्यात राबतात शेतकरी
शेती म्हणजे कष्ट आलेच. त्यात मळा लावून काकड्या व दोडकी लवकर बाजारात आणायची असल्यास भर उन्ह्याळ्यात तयारी करावी लागते. चंदन व त्याच्या सोबत याच पठावर हंगामी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच कुंपण उभारून मशागत व अन्य कामाला सुऊवात केली होती. यावर्षी एप्रिल महिन्यात अवेळी कोसळलेल्या पावसामुळे मळ्यांच्या जागेत गवत मोठ्या प्रमाणात वाढल्याने ते कापण्यासाठी अतिरिक्त वेळ व श्रम वाया गेल्याचे तो सांगतो. उन्हाळ्यात बी ऊजत टाकण्यापासून रोपे वाढविण्यासाठी लागणारे पाणी टँकरमधून आणावे लागते. पाचही शेतकऱ्यांना मिळून दर दिवशी एक टँकर पाण्याची व्यवस्था करावी लागते. एका टँकरमागे दोन ते अडीच हजार ऊपये मोजून पावसाला सुऊवात होईपर्यंत हा पाणीपुरवठा सुऊ ठेवण्याशिवाय पर्याय नाही.
यंदा साधारण वीस दिवस त्यांना टँकरद्वारे पाण्याची सोय करावी लागली. याशिवाय मांडव उभारण्यासाठी लागणाऱ्या बांबूवर जास्त खर्च होतो. दरदिवशी घरातील किमान दोन माणसे व सुट्टीच्या दिवशी इतर सर्व मंडळीही मळ्यांच्या कामात गुंतलेली दिसतात. ऊजलेल्या बियांची रोपे होऊन, त्यांचे वेल वाढेपर्यंत काटेकोर काळजी घ्यावी लागते. डोंगर टेकड्यांवरील मळ्यांपेक्षा पठावरील मळ्यांना समतोल पाऊस लागतो. बी बियांण्यापासून खतापर्यंत व इतर सर्व खर्च स्वत: हे शेतकरीच करतात. जमिन मालकीच्या मुद्द्यावरून मळे लागवडीला कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना कोणतीच सवलत मिळत नाही. रानटी जनावरांकडून नुकसान झाल्यास, तेही शेतकऱ्यांनाच सोसावे लागते. मळ्यांचे काम मोठ्या कष्टाचे असले तरी, वडिलोपार्जित ही कृषी पंरपरा आपल्या खांद्यावर पेलणाऱ्या तऊण शेतकऱ्यांमुळे ती फोंडा तालुक्यात टिकून आहे.
मळे लागवड म्हणजे एक प्रकारची लॉटरी…
सुरेश बोमी गावडे यांचाही मळा फर्मागुडी पठारावर असून गेल्या वीस वर्षांपासून ते हा हंगामी कृषी व्यावसाय करतात. मळ्यांची लागवड म्हणजे एकप्रकारची लॉटरी, लागली तर लागली…! सर्व गोष्टी निसर्गावर अवलंबून असतात. मे महिन्यापासून आम्ही कामाला सुऊवात करतो. सुऊवातीचा साधारण दीड महिना पहाटे 5 ते रात्री 8 वा. पर्यंत मळ्यातील कामांतून उसंत नसते. जुलै महिन्यापासून पुढील दोन महिने पिकाचा काळ असतो. आपली सर्व भाजी मडगावच्या बाजारात जाते. फर्मागुडीच्या पठारावर काकडीपेक्षा दोडकी व अन्य फळभाज्या चांगल्या होतात. गावठी भोपळा व चिबूड लावणे बंद केले आहे. एखाद्या वर्षी पीक अपेक्षेपेक्षा चांगले येते, तर एका वर्ष लावडीवरील खर्चही भागत नाही. अशावेळी निराशा येते. पण पुढच्यावर्षी त्याच जोमाने कामाला लागतो. कारण या मळ्यांचा लळा काही सुटत नाही.
म्हार्दोळची जाई…तशी फर्मागुडीची काकडी..!
संपूर्ण गोव्यात फर्मागुडीच्या तसेच फोंडा परिसरातील या हंगामी काकडी व मळ्यातील गावठी भाजी हे खास वैशिष्ट्या आहे. पावसाळ्यात व खास करून श्रावण महिन्यातील गोवेकरांच्या शाकाहाराची गरज मळ्यातील या भाजीवरच भागते. गावठी काकड्यांबरोबरच दोडकी, कारली, वाल, पडवळ आदी वेलभाज्यांची लागवड या मळ्यांमध्ये केली जाते. जोडीला भेंडी व अन्य काही भाज्यांचे पिकही घेतले जाते. वेलिंग गावातील शेतकरी कुटुंबे गोवा अभियात्रिंकी कॉलेजजवळील पठारावर पूर्वापार मळे लागवड करीत आहेत. पलिकडे कोने व बांदोडा परिसरातही फोंडा-पणजी महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या डोंगर टेकड्यांवर काकडीचे मळे लावले जातात. म्हार्दोळची सुगंधी जाई, कुंकळ्योचे चवदार अननस तशी फर्मागुडीची लज्जतदार गावठी काकडी ही या परिसराची ओळख आहे. काकडी तशी वर्षभर सर्वत्र मिळते. पण फर्मागुडीच्या मळ्यातून उगवणाऱ्या गावठी काकडीची चव इतरत्र मिळणार नाही. त्यामुळे संपूर्ण गोव्यातून आणि आता देशविदेशातील पर्यटकांची वाहनेही पावसाळी हंगामात रस्त्याच्या बाजूला मिळणाऱ्या काकड्यांचा आस्वाद घेण्यासाठी हमखास थांबतात.