वरुण तोमर, ईशा सिंग यांचे ऑलिम्पिक तिकीट आरक्षित

वृत्तसंस्था/ जकार्ता येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताचे युवा नेमबाज वरुण तोमर आणि ईशा सिंग यांनी आपले तिकीट आरक्षित केले आहे. येथे नुकत्याच झालेल्या आशियाई पात्र फेरीच्या नेमबाजी स्पर्धेत वरुण तोमर आणि ईशा सिंग यांनी अनुक्रमे पुरूष आणि महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजी प्रकारात सुवर्णपदके मिळवून पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील आपले स्थान निश्चित […]

वरुण तोमर, ईशा सिंग यांचे ऑलिम्पिक तिकीट आरक्षित

वृत्तसंस्था/ जकार्ता
येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताचे युवा नेमबाज वरुण तोमर आणि ईशा सिंग यांनी आपले तिकीट आरक्षित केले आहे. येथे नुकत्याच झालेल्या आशियाई पात्र फेरीच्या नेमबाजी स्पर्धेत वरुण तोमर आणि ईशा सिंग यांनी अनुक्रमे पुरूष आणि महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजी प्रकारात सुवर्णपदके मिळवून पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले.
आगामी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आतापर्यंत भारताच्या 15 नेमबाजांनी आपले तिकीट आरक्षित केले आहे. यापूर्वी झालेल्या टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या 15 नेमबाजांनी आपली पात्रता सिद्ध केली होती. जकार्तामध्ये झालेल्या आशियाई पात्र फेरीच्या लढतीत सोमवारी भारताने 6 पदकांची कमाई केली. त्यामध्ये सांघिक प्रकारातील 2 सुवर्णपदकांचा समावेश आहे.
पुरूषांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजी प्रकारात भारताच्या 20 वर्षीय वरुण तोमरने 239.6 गुणांसह प्रथम स्थान मिळवित सुवर्णपदकाला गवसणी घातली. या प्रकारात भारताच्या अर्जुन चिमाने 237.3 गुणांसह रौप्यपदक तर मंगोलियाच्या देवाखु इनखेतैवानने 217.2 गुणांसह कांस्यपदक मिळविले. तत्पूर्वी 10 मी. एअर पिस्तुल सांघिक नेमबाजी प्रकारात भारताने 1740 गुणांसह सुवर्णपदक घेतले. यामध्ये वरुण तोमरने 586, चिमाने 579 तर उज्वल मलिकने 575 गुण नोंदविले. या क्रीडा प्रकारात इराणने रौप्य आणि कोरियाने कांस्यपदक घेतले.
महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजी प्रकारात भारताच्या 18 वर्षीय ईशा सिंगने 243.1 गुणासह सुवर्णपदक, पाकिस्तानच्या किस्मीला तलथने 236.3 गुणासह रौप्यपदक तर भारताच्या रिदम सांगवानने 214.5 गुणांसह कांस्यपदक मिळविले. पाकच्या 21 वर्षीय किस्मीला तलथने पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित केले आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत नेमबाजी प्रकारात पात्र ठरणारी किस्मीला तलथ ही पाकची तिसरी स्पर्धक आहे. महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल सांघिक नेमबाजी प्रकारात भारताच्या ईशा सिंग, रिदम सांगवान आणि सुरभी राव यांनी 1736 गुणांसह सुवर्णपदक पटकाविले. 10 मी. एअर पिस्तुल मिश्र सांघिक तसेच 25 मी. पिस्तुल सांघिक नेमबाजी प्रकारात ईशा सिंग ही विश्व नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती आहे.
जकार्तामधील या स्पर्धेत 26 देशांचे 385 स्पर्धक सहभागी झाले होते. विविध क्रीडा प्रकारातील विजेत्यांसाठी 84 सुवर्ण, 84 रौप्य आणि 88 कांस्य अशी एकूण 256 पदके ठेवण्यात आली होती. रायफल, पिस्तुल, शॉर्टगन नेमबाजी प्रकारामध्ये भारताने आतापर्यंत पॅरिस ऑलिम्पिकची 13 तिकिटे निश्चित केली आहेत. पॅरिस ऑलिम्पिकसाठी कोटा पद्धतीतून स्थान मिळविणारा वरुण तोमर हा भारताचा 14 वा नेमबाज आहे.