ओल्ड गोवा ते दिवजा सर्कल रस्ता 10 मार्चपासून 30 एप्रिलपर्यंत बंद

‘पणजी स्मार्ट सिटी’ विकासकामांचे होणार बांधकाम पणजी : ओल्ड गोवा ते पणजी दिवजा सर्कल हा रायबंदरमार्गे असणारा जुना रस्ता स्मार्ट सिटीच्या विविध कामांसाठी 10 मार्च ते 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडतर्फे जारी करण्यात आली आहे. त्यामुळे त्या भागातील रहिवाशांची गैरसोय होणार असून त्यांना कदंब बायपास महामार्गाने जावे […]

ओल्ड गोवा ते दिवजा सर्कल रस्ता 10 मार्चपासून 30 एप्रिलपर्यंत बंद

‘पणजी स्मार्ट सिटी’ विकासकामांचे होणार बांधकाम
पणजी : ओल्ड गोवा ते पणजी दिवजा सर्कल हा रायबंदरमार्गे असणारा जुना रस्ता स्मार्ट सिटीच्या विविध कामांसाठी 10 मार्च ते 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडतर्फे जारी करण्यात आली आहे. त्यामुळे त्या भागातील रहिवाशांची गैरसोय होणार असून त्यांना कदंब बायपास महामार्गाने जावे लागणार असल्याचे कंपनीने सूचित केले आहे. रहिवाशांसाठी काही अंतर्गत रस्त्यातून जाण्याची सोय केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. स्मार्ट सिटीच्या अंतिम टप्प्यात रायबंदरची विविध विकासकामे करण्यात येणार असून त्यासाठीच हा रस्ता बंद केला जाणार आहे. हा जुना रायबंदर रस्ता त्या भागातील लोकांसाठी महत्त्वाचा असून त्यांना आता द्राविडी प्राणायाम करावा लागणार असल्याचे समोर आले आहे. कंपनीच्या तातडीने झालेल्या बैठकीत सदर रस्ता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. सांडपाणी निचरा प्रकल्पाच्या विविध कामांसाठी तो रस्ता बंद होणार आहे. बंदीच्या काळात वाहतूक व्यवस्थापन, लोकांची सुरक्षा याकरिता विशेष लक्ष पुरवण्याचे आश्वासन कंपनीतर्फे देण्यात आले आहे. ओल्ड गोवा येथील बासिलिका बाँ जिझस चर्च जंक्शनपासून बायंगिणी, पानवेल, फोंडवे, रायबंदर, पाटो जंक्शन येथून कॉजवे मार्गाने दिवजा सर्कलपर्यंतचा हा रस्ता बंद ठेवला जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्या काळात वाहतूक राष्ट्रीय महामार्ग कदंब बायपास रोड अशी वळवण्यात येणार असल्याचे कंपनीतर्फे कळवण्यात आले आहे. स्थानिकांसाठी योग्य ती पर्यायी व्यवस्था करण्याचे आश्वासन कंपनीने दिले आहे. शिवाय ते काम 31 मेपूर्वी पूर्ण करण्याचा शब्द कंपनीने दिला आहे. रायबंदरच्या साधनसुविधेत वाढ व्हावी आणि वाहतूक सुलभतेने करता यावी म्हणून विविध विकासकामे स्मार्ट सिटी अंतर्गत राबवण्यात येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. रायबंदरच्या राहणीमानात त्यामुळे बदल होऊन त्याचा लाभ तेथील लोकांना मिळेल, असा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे.