आता प्रतीक्षा काही तासांची

ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देवनगरी सज्ज, देशभरात आनंदीआनंद वृत्तसंस्था / अयोध्या अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीच्या स्थानी साकारत असलेल्या भव्य राममंदिराच्या गर्भगृहात भगवान रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षण आता अगदी समीप आला आहे. साऱ्या देशात उत्सुकता आणि उत्साह त्यांच्या चरमसीमेवर पोहचला आहे. देवनगरी अयोध्या तर आनंद आणि भगवा रंग यात न्हाऊन निघाली आहे. भगवान रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेच्या समारंभाचा प्रारंभ  […]

आता प्रतीक्षा काही तासांची

ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देवनगरी सज्ज, देशभरात आनंदीआनंद
वृत्तसंस्था / अयोध्या
अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीच्या स्थानी साकारत असलेल्या भव्य राममंदिराच्या गर्भगृहात भगवान रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षण आता अगदी समीप आला आहे. साऱ्या देशात उत्सुकता आणि उत्साह त्यांच्या चरमसीमेवर पोहचला आहे. देवनगरी अयोध्या तर आनंद आणि भगवा रंग यात न्हाऊन निघाली आहे. भगवान रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेच्या समारंभाचा प्रारंभ  आज सोमवारी दोन प्रहरी 12 वाजून 20 मिनिटांनी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कार्यक्रमाचे मुख्य यजमान असून त्यांच्याच हस्ते प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. त्यांच्यासह हिंदू समाजाच्या सर्व घटकांमधील मान्यवरही त्यांच्या पत्नींसह यजमानपद स्वीकारणार आहेत. या कार्यक्रमाचे पौरोहित्य वेदपंडित दीक्षित हे करणार असून त्यांच्या नेतृत्वात देशभरातील 121 पुरोहित सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम साधारणत: 1 वाजेपर्यंत चालणार आहे.
श्रीरामजन्मभूमीच्या मुक्ततेसाठी पाच शतकांपेक्षा अधिक काळ चाललेल्या संघर्षाचे आणि प्रदीर्घ अशा न्यायालयीन प्रतिस्पर्धेची आज यशस्वी फलनिष्पत्ती होणार, अशी प्रतिक्रिया समाजाच्या सर्व घटकांमधून देशभरात व्यक्त होत आहे. भारताबाहेरही अनेक देशांमध्ये वास्तव्य करणारे हिंदू नागरिक अत्यंत भाविकतेने आणि त्या देशांमधील स्थानिक नागरिक अत्यंत औत्सुक्याने हा कार्यक्रम पाहणार आहेत. कार्यक्रमासाठी अयोध्येला आलेल्या मान्यवरांमध्ये 54 देशांच्या 100 प्रतिनिधींचा समावेश असेल. श्रीरामजन्मभूमी आंदोलनाशी संबंधित नेते आणि कार्यकर्ते, तसेच न्यायालयीन कामकाजाशी संबंधित महनीयांनाही आमंत्रण देण्यात आले आहे. न्यायालयातील या प्रकरणाचा निर्णय ‘श्रीरामलल्ला विराजमान’ या देवतेच्या पक्षात एकमुखाने देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व पाच न्यायाधीशांनाही आमंत्रणे देण्यात आली आहेत. त्यांच्यापैकी धनंजय चंद्रचूड हे सध्या भारताचे सरन्यायाधीश आहेत. इतर न्यायाधीश निवृत्त झालेले आहेत.
अयोध्येत भगवा महापूर
प्रभू रामचंद्रांचे जन्मस्थान असणारी अयोध्यानगरी पूर्ण भगवेमय झाल्याचे दिसत आहे. या नगराच्या प्रत्येक छोट्यामोठ्या घरांवर, मंदिरांवर आणि अन्य वास्तूंवर ‘जय श्रीराम’ ही घोषणा म्द्रित केलेले भगवे ध्वज फडकत आहेत. हीच घोषणा श्री रामजन्मभूमी आंदोलनाचा स्फुरणमंत्र ठरलेली होती. या नगरीतील सर्व मार्ग, चौक, कोपरे, उपमार्ग, उद्याने, मंदिरे, आखाडे आणि आश्रम तसेच शासकीय कार्यालये आणि अन्य आस्थापने सुशोभित करण्यात आलेली आहेत. सडा, रांगोळ्यांनी घरांची अंगणे सजली असून सर्वत्र मंगलमय वातावरणाचा अनुभव येत आहे. गेला एक आठवडा प्रत्येक रात्री विद्युत रोषणाईने ही नगरी झगमगत होती.
श्रीराममंदिराची अद्भूत सजावट
ज्या मंदिराच्या गर्भगृहात भगवान रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, त्या मंदिराचा थाटमाट तर अद्भूत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी स्पष्ट केले आहे. संपूर्ण मंदिरच विविध पुष्पांच्या आणि पर्णांच्या चित्तवेधक रचनांनी शोभिवंत करण्यात आलेले आहे. कळसापासून पायऱ्यांपर्यंत सर्वत्र विविध प्रकारची सजावट करण्यात आली आहे. धनुष्यबाणाकृती पुष्परचना विशेषत्वाने लक्ष वेधून घेत आहेत. मंदिराचे छतही आकर्षकरित्या सजविल्याचे वर्णन प्रत्यक्षदर्शींनी केले आहे.
योगी रात्रीपासून अयोध्येतच
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे रविवारी रात्रीपासून अयोध्येतच वास्तव्यास आहेत. त्यांना वेळोवेळी सुरक्षा व्यवस्था आणि प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची व्यवस्था यांची माहिती देण्यात येत आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठीच त्यांनी अयोध्येत रविवारी रात्रीपासून सोमवारी सर्व कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत वास्तव्य करण्याचा निर्णय घेतला आहे, अशीही माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दशलक्ष पणत्यांनी अयोध्या उजळणार
प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतरच्या सायंकाळी अयोध्येत एक दशलक्ष पणत्या लावण्यात येणार आहेत. त्यामुळे ही नगरी उजळणार आहे. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतरही अनेक कार्यक्रम असून ते नंतर अनेक दिवस चालत राहणार आहेत. प्राण्हाप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर भगवान रामलल्लांचे दर्शन साऱ्यांसाठी मुक्त होत आहे.
कडेकोट सुरक्षा व्यवस्था
या मंगल कार्यक्रमाला कोणतेही गालबोट लागू नये, म्हणून अयोध्या, तिच्या नजीकचा परिसर आणि अयोध्येकडे जाणारे मार्ग तसेच जलमार्ग येथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. उत्तर प्रदेश पोलीस, केंद्रीय राखीव सुरक्षादले, शरयू नदीतून कोणी घुसखोरी करू नये म्हणून विशेष प्रतिशिक्ष पाणबुडे, राष्ट्रीय आपत्तीनिवारण दलांची विशेष वाहने, टेहळणी वाहने आणि अन्य सुरक्षा आणि संपर्क साधने क्रियान्वित करण्यात आली आहेत. संपूर्ण नगरी आणि आसपासच्या भागांमध्ये 10 हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून नगरीतील प्रत्येक हालचालींवर सूक्ष्म लक्ष ठेवले जाण्याची योजना आहे. तीन दिवसांपूर्वीपासूनच अयोध्येत बिगरअनुमती प्रवेश बंद करण्यात आला आहे. केवळ ज्यांच्याकडे प्रवेशपत्र असेल त्यांनाच नगरीत येणे शक्य होईल. सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही त्रुटी राहू नये, म्हणून अतिशय दक्षता घेण्यात येत आहे.
पंतप्रधान मोदी सकाळी येणार
प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे प्रमुख यजमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अयोध्येत आज सोमवारी सकाळी 8 वाजता आगमन होणार आहे. साडेआठ ते साडेअकरा या कालावधीत ते मुख्य पुरोहितांच्या अधिपत्यात विविध अनुष्ठाने करणार आहेत. त्यानंतर ते प्राणप्रतिष्ठेच्या प्रत्यक्ष कार्यक्रमासाठी सज्ज होतील. प्राणप्रतिष्ठेच्या मुहूर्ताचा कालावधी केवळ 34 सेकंदांचा असल्याची माहिती देण्यात आली आहे. याच कालावधीत प्राणप्रतिष्ठेचा मुख्य कार्यक्रम होईल. त्याआधी आणि त्यानंतर अन्य कार्यक्रम होतील, अशी माहिती देण्यात आली आहे.
रामचरित्राशी संबंधित स्थानांना भेटी
गेल्या आठ दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील श्रीरामचरित्राशी संबंधित स्थानांना भेटी देत आहेत. तेथील मंदिरांमध्ये पूजाअर्चा करीत आहेत. गेले चार दिवस ते दक्षिण भारताच्या दौऱ्यावर होते. त्यात त्यांनी श्रीरामेश्वरम् मंदिर, श्रीरंगनाथ मंदिर, गुरुवायूरचे कृष्णमंदिर, रामायणातील रामसेतूचे प्रारंभ स्थान असणारी धनुष्यकोडी इत्यादी पवित्र स्थानांना भेटी दिल्या. रविवारी त्यांनी अरिचाल मुनाईला भेट देऊन प्रार्थना आणि पूजा केली. याच स्थानी प्रभू रामचंद्रांनी सेतूबंधन केले होते, असा उल्लेख वाल्मिकी रामायणात आहे. त्यांनी कोदंडरामस्वामी मंदिरातही पूजा केली. या मंदिरात प्रभू रामचंद्रांची धनुष्यबाणधारी मूर्ती आहे. त्यांनी रामेश्वरम् येथील अग्नीतीर्थात स्नानही केले आहे.
जुन्या मूर्तीचाही मंदिरप्रवेश
1992 पासून अस्थायी मंदिरात असणारी जुनी श्रीराममूर्ती, लक्ष्मण आणि इतर बंधूंच्या मूर्ती तसेच सीतामातेची मूर्तीही आता मंदिराच्या आत आणण्यात आली असून त्यांची स्थापना गर्भगृहातच केली जाणार आहे. तसेच प्राणप्रतिष्ठा झालेल्या मूर्तीसह या मूर्तींची पूजाही प्रतिदिन केली जाणार आहे. या सर्व मूर्तींचा यथोचित मान ठेवला जाईल, अशी माहिती न्यासाकडून स्पष्टपणे देण्यात आली आहे.
दहशतवाद्यांकडून धमकी
भगवान रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम उधळून लावू अशी धमकी गेल्या काही दिवसापासून दहशतवाद्यांकडून देण्यात येत आहे. तसेच प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम देशभरातील आणि जगातील लोकांना पाहता येऊ नये म्हणून या कार्यक्रमाच्या प्रत्यक्षचित्रणावर सायबर हल्ला होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. हे सायबर हल्ले निष्प्रभ करण्यासाठी प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवली आहे. तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल दिसून आल्यास त्वरित कृती करण्याचे आदेश सर्व सुरक्षा दलांना देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. योगी आदित्यनाथ यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून सुरक्षा व्यवस्था जागरुक अवस्थेत आहे.
प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची आतुरतेने प्रतीक्षा

अयोध्येसह साऱ्या देशात उत्कंठा शिगेला, प्रत्येकाला प्रतीक्षा प्राणप्रतिष्ठेची
भव्य राममंदिरात अद्भूत सजावट, विद्युत रोषणाई, नयनमनोहर पुष्परचना
संपूर्ण अयोध्या नगरीत भगवे ध्वज, मार्ग चकाचक, नागरिक गेले भारावून
अयोध्या आणि नजीकच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था, संपर्क व्यवस्था चोख

प्राणप्रतिष्ठादिनी कार्यक्रम

सकाळी 10.30 : या वेळेच्या आत सर्व आमंत्रितांनी त्यांच्या आसनांवर आसनस्थ व्हायचे आहे. तसेच सर्व यजमान आणि पुरोहितही गर्भगृहात असतील. या वेळेनंतर आलेल्यांना आणि प्रवेशपत्र नसलेल्यांना प्रवेश नाकारणार.
सकाळी 10.30 : मंगलध्वनी आणि प्राणप्रतिष्ठापूर्व धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ करण्यात येईल. हे कार्यक्रम प्राणप्रतिष्ठेच्या मुहूर्तापर्यंत चालणार आहेत. तोपर्यंत प्राणप्रतिष्ठा कार्यकमाची सर्व पूर्वसज्जता पूर्ण करण्यात येणार आहे.
सकाळी 10.55 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गर्भगृहात आगमन होणार आहे. त्याआधी 10.25 ला ते अयोध्येच्या विमानतळावर पोहचणार आहेत. त्यांच्या आगमनापूर्वी सर्व आमंत्रितांनी निर्धारित वेळेत मंदिरात पोहचायचे आहे.
दुपारी 12.20 : प्राणप्रतिष्ठा समारंभास प्रारंभ केला जाणार आहे. प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठा मुहूर्त 12 वाजून 29 मिनिटे 8 सेकंद हा असून तो त्या समयापासून 84 सेकंदांपर्यंत, अर्थात दुपारी 12 वाजून 30 मिनिटे 32 सेकंदांपर्यंत आहे.
हा मुहूर्त ‘अभिजित मुहूर्त’ म्हणून परिचित आहे. याच मुहूर्तावर प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला होता. त्यामुळे तो निर्धारित करण्यात आला आहे. हा अत्यंत शुभ मुहूर्त असून नेमक्या याच कालावधीत प्राणप्रतिष्ठा होणार आहे.
ड याच मुहूर्तावर मुख्य यजमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भगवान रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे पौरोहित्य वेदशास्त्रसंपन्न आचार्य गणेश्वरशास्त्री द्रविड यांच्याकडून होणार आहे.
प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम दुपारी 1 वाजेपर्यंत चालणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ आणि मोहन भागवत हे संदेश देतील. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अध्यक्ष महंत नृत्यगोपालदास आशीर्वाद देतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येत साधारणत: चार तास असतील. ते दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी कुबेर टिला येथे जातील आणि दर्शन घेतील. त्यानंतर, ते दिल्लीला परततील. संपूर्ण कार्यक्रम समयबद्ध पद्धतीने साकारला जाणार आहे.
भारतीय कालगणनेनुसार मुहूर्त : पौष मासाच्या द्वादशी तिथीचा अभिजित मुहूर्त, इंद्र योग, मृगशिरा नक्षत्र, मेष लग्न, तसेच वृश्चिक नवांश असा प्राणप्रतिष्ठा समारंभाचा भारतीय कालगणनेनुसार सविस्तर मुहूर्त निर्धारित झालेला आहे.