…आता सरकारी कार्यालयांचा नंबर!

गोवावेसजवळील महानगरपालिकेचे विभागीय कार्यालय फोडले : चार लॅपटॉप लांबविले बेळगाव : गोवावेसजवळील महानगरपालिकेच्या दक्षिण विभाग कार्यालयात चोरीची घटना घडली आहे. चोरट्यांनी आता सरकारी कार्यालयांनाही लक्ष्य बनविले असून मनपाचे विभागीय कार्यालय फोडून चार लॅपटॉप पळविण्यात आले आहेत. चोरीच्या या घटनेने एकच खळबळ माजली आहे. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. सोमवारी सकाळी 9 वाजता कर्मचारी […]

…आता सरकारी कार्यालयांचा नंबर!

गोवावेसजवळील महानगरपालिकेचे विभागीय कार्यालय फोडले : चार लॅपटॉप लांबविले
बेळगाव : गोवावेसजवळील महानगरपालिकेच्या दक्षिण विभाग कार्यालयात चोरीची घटना घडली आहे. चोरट्यांनी आता सरकारी कार्यालयांनाही लक्ष्य बनविले असून मनपाचे विभागीय कार्यालय फोडून चार लॅपटॉप पळविण्यात आले आहेत. चोरीच्या या घटनेने एकच खळबळ माजली आहे. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. सोमवारी सकाळी 9 वाजता कर्मचारी कार्यालय उघडण्यासाठी आले असता दरवाजाला आतून कडी असल्याचे आढळून आले. चोरट्यांनी पार्टीशन फोडून कार्यालयात प्रवेश केल्याचे उघडकीस आले असून चार लॅपटॉप पळविण्यात आले आहेत. यावेळी महत्त्वाची कागदपत्रे विस्कटून टाकण्यात आली आहेत. घटनेची माहिती समजताच टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक कपिलदेव गडाद व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. या कार्यालयात 1 ते 26 क्रमांकाच्या वॉर्डसंबंधीचे मालमत्ता व इतर महत्त्वाची कागदपत्रे आहेत. महत्त्वाच्या नोंदी असलेले लॅपटॉप पळविण्यात आल्याने खळबळ माजली आहे. उपलब्ध माहितीनुसार शनिवार दि. 17 फेब्रुवारीच्या सायंकाळी 7 पर्यंत हे कार्यालय सुरू होते. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी कार्यालयाला कुलूप लावले. रविवारी सुटी असल्यामुळे हे कार्यालय बंद होते. सोमवारी सकाळी 9 वाजता नेहमीप्रमाणे कार्यालय उघडण्यासाठी कर्मचारी आले, त्यावेळी चोरीची घटना उघडकीस आली. चोऱ्या, घरफोड्यांपाठोपाठ आता वाहन चोरीच्या घटनाही वाढल्या आहेत. आता तर सरकारी कार्यालयांनाही चोरट्यांनी लक्ष्य बनविले आहे. चोरट्यांची छबी परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे का? याची पाहणी करण्यात येत आहे. टिळकवाडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.