काळ्याकुट्ट काळोखात ना फोन, ना टिफिन आणि शेकडो तास जगापासून दूर…बोगद्याच्या आतलं आयुष्य

काळाकुट्ट काळोख. टॉर्चच्या प्रकाशात काम. डोक्यावर हेल्मेट. हेल्मेटच्या पुढील भागावरही टॉर्च. कंबरेच्या बेल्टला टांगलेली बॅटरी. त्या बॅटरीला जोडलेली टॉर्च जर बंद पडली, तर स्वत:चा हातही दिसू नये, इतका काळोख.

काळ्याकुट्ट काळोखात ना फोन, ना टिफिन आणि शेकडो तास जगापासून दूर…बोगद्याच्या आतलं आयुष्य

 रवी प्रकाश

facebook

 काळाकुट्ट काळोख. टॉर्चच्या प्रकाशात काम. डोक्यावर हेल्मेट. हेल्मेटच्या पुढील भागावरही टॉर्च. कंबरेच्या बेल्टला टांगलेली बॅटरी. त्या बॅटरीला जोडलेली टॉर्च जर बंद पडली, तर स्वत:चा हातही दिसू नये, इतका काळोख.

 

आपलं काम सोडून इतरत्र जाण्यास बंदी. जमिनीच्या आत काम करत असलेल्या ठिकाणी स्वच्छतागृह किंवा शौचालयाची सुविधा तर अशक्यप्रायच. फोन घेऊन जाण्यासही मनाई. जेवणासाठी टिफिनसुद्धा नाही. सोबत फक्त दोन लिटरची पाण्याची बाटली. काम करत असताना आठ तास बाहेरच्या जगाशी कणभर नि क्षणभरही संपर्क नाही.

 

असं असतं जमिनीच्या पृष्ठभागापासून काही मीटर खोल किंवा आत खाणीत किंवा बोगद्यात काम करणाऱ्या कामगारांचं आयुष्य!

 

उत्तरकाशीमध्ये बोगद्यात झालेल्या दुर्घटनेनंतर बीबीसीनं अशा काही कामगारांसोबत बातचीत केली, जे खाण किंवा बोगद्यात काम करतात. ते कुठल्या परिस्थितीत तिथं काम करतात, त्यांना कुठल्या समस्यांना सामोरं जावं लागतं, हे बीबीसीनं जाणून घेतलं.

 

हे जाणून घेण्यासाठी आम्ही अशा काही कामगारांची निवड केली, ज्यांनी त्यांच्या आयुष्यातील मोठा भाग म्हणजे जवळपास 25 वर्षे जमिनीच्या आता खाणीत काम करत घालवलं आहे.

 

आता हे लोक गेल्या काही वर्षांपासून ओपन कास्ट माईन्स म्हणजे उघड्या खाण्यांमध्य काम करू लागले आहेत.

 

49 वर्षीय पोखन साव आता वरिष्ठ ओव्हरमॅन आहेत. 21 वर्षे वयाचे असताना म्हणजे 1995 मध्ये त्यांनी खाणकामगरा म्हणून काम करण्यास सुरुवात केली. आता ते बचावपथकाचंही नेतृत्व करतात.

 

जेव्हा पहिल्यांदा खाणीत उतरले…

पोखन साव जेव्हा खाणीत पहिल्यांदा उतरले तेव्हा त्यांच्यासोबत अनुभवी कामगार (मायनिंग सरदार) होते, तरीही त्यांना भीती वाटली. खाणीत उतरल्यावर काही दुर्घटना झाली तर, असा विचार करून ते आणखीच घाबरले होते.

 

सुरुवातीच्या दिवसात कुठल्या रस्त्यानं खाणीत गेलो आणि कुठल्या रस्त्यानं बाहेर आले, हेच त्यांना कळत नव्हतं. मग हळूहळू रस्ते परिचयाचे बनू लागले.

 

पोखन साव यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, “खाणीत जाण्यापूर्वी व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरमध्ये (व्हीटीसी) पूर्ण प्रशिक्षण दिलं गेलं होतं. हे सांगण्यात आलं होतं की, आत काय काय असतं, कसं काम करायचं, संवाद कसा साधला जाईल, आपत्कालीन स्थितीत कसं राहायचं इत्यादी. आमचा एका डमी खाणीत सरावही करून घेण्यात आला. तरीही मला भीती वाटतच होती. पहिल्या दिवशी फक्त दोन-तीन तासच खाणीत होतो, मग हळूहळू सवय होत गेली आणि भीती वाटणंही बंद झालं.”

 

मूळचे झारखंडच्या पारसनाथचे असलेले पोखन साव पुढे सांगतात की, “खाणीत जाण्याच्या आधी मायनिक यूनिफॉर्म परिधान करावे लागतात. विशेष प्रकारचे बूट असात, आवश्यक मशीन्स आणि कंबरेला बेल्ट लावावा लागतो.

 

“त्याला बॅटरी लावलेली असते. पूर्वी याचं वजन पाच किलो असे. आता बॅटरी 250 ग्रॅमची असते. बारीक तारेने आमच्या हेल्मेटवर लावण्यात आलेल्या टॉर्चला बॅटरी जोडली जाते. त्याच कॅपलाईट प्रकाशात आम्ही काम करतो. मात्र, खाणीतही जागोजागी प्रकाशाची सोय केलेली अशते. मात्र, आमचं काम कॅपलाईटनेच होतं.”

 

खाण्या-पाण्याची सोय

पोखन साव म्हणतात, “आम्ही आमच्यासोबत पाण्याची बाटली ठेवतो. नियमांनुसार पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पाईपलाईनद्वारे व्हायला हवा, मात्र असं होत नाही. त्यामुळे आम्ही आमची पाण्याची बाटली घेऊन जातो. खाण्याची टिफिन मात्र घेऊन जाण्याची परवानगी नाहीय.

 

“पूर्वी काही खाणींमध्ये कँटिनही असायची. आता तशा नाहीत. आता अधिकाधिक ओपन कास्ट माईन्स आहेत. ज्या खाणी जमिनीत आहेत, तिथेही कँटिन नाहीत. त्यामुळे खाण कामगार ड्युटीवर येण्यापूर्वीच घरून जेवून-खाऊन येतात.

 

आमची आठ तासांची शिफ्ट असते. त्यादरम्यान भूक लागते. शिफ्टनंतर खाणीच्या बाहेर आल्यावर साफसफाई आणि कागदपत्रांची कामं करायची असतात. त्यानंतर घरी परतल्यावर आम्ही जेवतो.”

 

ऑक्सिजनचा पुरवठा

त्यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की, “खाणीत ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी दोन रस्ते असतात. पंख्यांच्या सहाय्यानं हवा खाणीत वळवली जाते. मग ही हवा दुसऱ्या मार्गाने बाहेर जाते. व्हेंटिलेशन उत्तम असल्यानं ऑक्सिजनची अडचण कधी येत नाही. ऑक्सिजनचा स्तर कधीही 90 टक्क्यांपेक्षा कमी नसतो.

 

“आम्हाला सेल्फ रेस्क्युअरही दिला जातो. त्याचं वजन दीड किलो असतं, त्यामुळे कामगार बऱ्याचदा तो घेऊन जात नाहीत. हा हलगर्जीपणा आहे. तरीही ऑक्सिजनची अडचण येत नाही. मी माझ्या 28 वर्षांच्या नोकरीदरम्यान कधीच ऑक्सिजनची कमतरता अनुभवली नाही.”

 

अनेकदा खाणीतल्य शिड्यांवरून लोक चालत जातात. मात्र, खाण खोल असल्यानं कामगारांना लिफ्टच्या माध्यमातून आत नेलं जातं, बाहेर काढलं जातं. या प्रकाराला ‘चानक’ म्हणतात.

 

खाण किंवा बोगद्यात काम करणाऱ्यांसाठी ही सामान्य गोष्ट आहे. त्यांच्या दैनंदिन कामाचा भाग आहे.

 

जमिनीच्या आत काम करण्याचा धोका

जमिनीपासून सुमारे 100 मीटर खोल किंवा काही मीटर काळोख्या बोगद्यात काम करतानाचे धोकेही आहेत. निसर्गनियमाच्या विरुद्धचं हे काम आहे. त्यामुळे या कामाची आव्हानंही तशी आहेत.

 

1993 साली बिहारच्या सुगौली (पूर्वीचं चापरण) मधून झारखंडच्या भागात मजुरीचं काम करणारे (आता क्लर्क) चंदेश्वर कुमार सिंह यांनी बीबीसीशी बातचित केली.

 

ते म्हणाले की, “खाण किंवा बोगद्यात काम करण्यास जाणं म्हणजे तुम्ही इतर जगापासून तुटलेले असता. तुमच्याकडे कुठलाही फोन नसतो आणि खाण्याची व्यवस्थाही नसते. त्यामुळे तुम्ही आठ तासाच्या शिफ्टनुसार नियोजन करता. सर्वात मोठा धोका तर हाच आहे.

 

“उत्तरकाशीतल्या बोगद्यात अडकलेल्या कामगारांकडे केवळ शिफ्टपुरती व्यवस्था असेल. अशावेळ त्यांच्यापर्यंत जर खाणं-पिणं पोहोचवलं नाही, तर ते किती दिवस जगू शकतात?”

 

चंद्रेश्वर कुमार सिंह म्हणतात की, “कोळसा खाणीत काम करणं तर आणखीच कठीण आणि धोकादायक आहे. तिथे मिथेन वायू निघतो. हा ज्वलनशील वायू असते. त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो.

 

जर आग लागली, तर स्फोटाचीही शक्यता वाढते. पृथ्वीच्या आतील भागातला तापमान पृष्ठभागापेक्षा जास्त असतो. त्यामुळे जमिनीखालील काम अत्यंत आव्हानात्मक स्थितीत केलं जातं.”

 

सुविधांची कमतरता

खाणींच्या नियमांनुसार, खाणीच्या आता शौचालय असणं बंधनकारक आहे. जेणेकरून कामगार त्याचा वापर करू शकतील आणि स्वच्छताही राहू शकेल. मात्र, असं प्रत्यक्षात होताना दिसत नाही. बहुतांश खाणींमध्ये शौचालयं नसतात. बोगद्यातही हीच स्थिती आहे.

 

उत्तरकाशीच्या बोगद्याच्या प्रकल्पात काम करणारे झारखंडमधील एक कामगार आणि झरिया कोल ब्लॉकच्या खाणीत काम करणारे काही कामगार बीबीसशी बोलताना म्हणाले की, त्यांच्यासाठी शौचालयाची व्यवस्थाच करण्यात आली नाहीय.

 

एका कामगाराने बीबीसीला सांगितलं की, “लघुशंकेला झाल्यास खाणीतच करावी लागते. अंधार असतो, त्यामुळे कुणी हत नाही. शौचाला झाल्यासही एक ठरलेली जागा असते, तिथेच करावं लागतं. ती जागा पडद्यांनी झाकलेली असते. त्याशिवाय कुठलाच उपाय नाही. खाणीच्या बाहेर व्यवस्थित शौचालय असते.”

 

दुर्घटना झाल्यास काय केलं जातं?

खाण किंवा बोगद्यात होणाऱ्या दुर्घटना अत्यंत भयंकर असतात. बहुतांश घटनांमध्ये तर बचावकार्य करणंही कठीण असतं. पोखन साव आणि चंदेश्वर कुमार सिंह यांनी बीबीसीला सांगितलं की, दुर्घटनेनंतर जमिनीखाली तंत्रज्ञान, सतर्कता, प्रार्थना या सगळ्या गोष्टी सारख्याच काम करतात.

 

पोखन आणि चंदेश्वर या दोघांनीही फेब्रुवारी 2001 मधील झरिया कोल ब्लॉकच्या बागडिगी खाण दुर्घटना पाहिलीय. त्या दुर्घटनेत 29 खाण कामगारांचा मृत्यू झाला होता. तेव्हा एका कामगाराला जिवंत वाचण्यात यश आलं होतं.

 

पोखन साव यांनी बीबीसीला सांगितलं की, “तेव्हा 12 नंबर खाणीत पाणी भरलं होतं. पाणी इतक्या वेगानं भरत गेलं की, कुणाला बाहेर येण्यास वेळही मिळाला नाही. मृत्यू पावलेल्या कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठीही सात ते आठ दिवस गेले. बचावकार्य अत्यंत कठीण बनलं होतं.”

 

पोखन साव 2010 च्या जीतपूर खाण दुर्घटनेच्या बचावपथकात होते. तेव्हा लिफ्टचा गरम लोखंड खाणीच्या आत गेल्यानंतर भयंकररित्या आग लागली होती.

 

ते म्हणतात की, “खाणीत पाणी असतं, जे हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या रासायनिक मिश्रणाने तयार होतं. अपघात झाल्यास हे मिश्रण तुटतं. हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगवेगळे होतात. हायड्रोजन ज्वलनशील आहे आणि ऑक्सिजन जळण्यास मदत करतं. त्यामुळे आग वेगानं लागते. त्यामुळे छोटीशी चूकही मोठ्या दुर्घटनेचं कारण बनते.”

 

आजारी पडण्याचा धोका

मोठा कालावधी जमिनीखाली काम करत राहिल्यानं अनेक आजारांनाही आमंत्रण मिळतं.

 

विशेषत: कोळसा खाणी, दगड खाणी आणि बोगदा बनवणारे कामगार न्यूमोकोनोयोसिस यांसारख्या आजारानं त्रास्त होतात. हे आजार जीवघेणे असतात. या आजारामुळे फुफ्फुसांमध्ये कचरा जमा होतो आणि श्वास घेण्यासाठीही त्रास होतो.

 

खाणीच्या नियमांनुसार, खाण कामगारांच्या नियमित आरोग्य तपासणीसह दर पाच वर्षांनी विशेष तपास करणं आवश्यक आहे. मात्र, असं होतंच असं नाही.

काळाकुट्ट काळोख. टॉर्चच्या प्रकाशात काम. डोक्यावर हेल्मेट. हेल्मेटच्या पुढील भागावरही टॉर्च. कंबरेच्या बेल्टला टांगलेली बॅटरी. त्या बॅटरीला जोडलेली टॉर्च जर बंद पडली, तर स्वत:चा हातही दिसू नये, इतका काळोख.

Go to Source