‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ फलक खटल्यातील 9 जणांची निर्दोष मुक्तता

सरकारी पक्षाला आरोप सिद्ध करता न आल्याने न्यायालयाचा निकाल बेळगाव : महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक हटवितानाचे व्हिडिओ चित्रीकरण करणाऱ्या प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीला दगड आणि काठीने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून येळ्ळूरच्या 9 जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षाला आरोप सिद्ध न करता आल्याने बुधवार दि. 4 रोजी द्वितीय जेएमएफसी न्यायालयाने हा निकाल दिला आहे. 7 पैकी आतापर्यंत 5 खटल्यांतील सर्वांची निर्दोष […]

‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ फलक खटल्यातील 9 जणांची निर्दोष मुक्तता

सरकारी पक्षाला आरोप सिद्ध करता न आल्याने न्यायालयाचा निकाल
बेळगाव : महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक हटवितानाचे व्हिडिओ चित्रीकरण करणाऱ्या प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीला दगड आणि काठीने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून येळ्ळूरच्या 9 जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षाला आरोप सिद्ध न करता आल्याने बुधवार दि. 4 रोजी द्वितीय जेएमएफसी न्यायालयाने हा निकाल दिला आहे. 7 पैकी आतापर्यंत 5 खटल्यांतील सर्वांची निर्दोष मुक्तता झाली. उर्वरित 2 खटल्यांची सुनावणी सुरू आहे. कुमार परशराम मासेकर, केदारी राघोजी पाटील, नंदू गोपाळ कुगजी, राहुल अर्जुन अष्टेकर, नामदेव विठ्ठल कदम, राजू जोतिबा नायकोजी, सुधीर परशुराम धामणेकर, जयसिंग यल्लाप्पा अष्टेकर, प्रकाश नारायण कुगजी सर्व रा. येळ्ळूर अशी निर्दोष मुक्तता झालेल्यांची नावे आहेत. या खटल्यातील मनोज लक्ष्मण नायकोजी यांचे निधन झाल्याने त्यांना वगळण्यात आले आहे.
येळ्ळूर गावच्या वेशीवर 1956 पासून ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ असा फलक उभारण्यात आला होता. मात्र जिल्हा प्रशासनाने 27 जुलै 2014 ला पोलीस बळ वापरत सदर फलक हटविला होता. त्याला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केल्याने कर्नाटकी पोलिसांनी अमानुष लाठीमार केल्याने अनेकजण जायबंदी झाले होते.घरांचे दरवाजे व तावदानांचीही मोडतोड करण्यात आली होती. इतकेच नव्हेतर गोठ्यातील जनावरांनाही मारहाण करण्यात आली. उलट बेळगाव ग्रामीण पोलिसांनी ग्रामस्थांवरच 7 वेगवेगळे गुन्हे दाखल केले. मात्र सरकारी पक्षाला आरोप सिद्ध करता न आल्याने यापूर्वी 4 खटल्यांमधील सर्वांची  निर्दोष मुक्तता झाली आहे.
बुधवारी खटला क्रमांक 194/15 ची द्वितीय जेएमएफसी न्यायालयात सुनावणी होती. मात्र सरकारी पक्षाला आरोप सिद्ध करता न आल्याने न्यायालयाने वरील सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे. फलक हटवितानाचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यासाठी गेलेल्या प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीवर जीवघेणा हल्ला केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. शेट्याप्पा पुंडाप्पा बॅळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी कलम 143, 147, 342, 341, 323, 506, 504, सहकलम 149 नुसार गुन्हा दाखल करून घेत तत्कालीन तपास अधिकारी जॉक्सन डिसोजा यांनी न्यायालयात दोषारोप दाखल केला होता. आतापर्यंत 7 पैकी 5 खटल्यांमधील सर्वांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. तर उर्वरित 2 खटल्यांची सुनावणी सुरू आहे. वरील सर्वांतर्फे अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड. हेमराज बेंचण्णावर, अॅड. शाम पाटील यांनी काम पाहिले.