नवीन रेशनकार्डचे काम लांबणीवर

अन्नभाग्य, गृहलक्ष्मीपासून वंचित : लाभार्थी प्रतीक्षेत बेळगाव : मागील कित्येक दिवसांपासून नवीन रेशनकार्डचे काम लांबणीवर पडले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना शासकीय सुविधा आणि योजनांपासून वंचित रहावे लागत आहे. अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री के. एच. मुनियप्पा यांनी नवीन रेशनकार्डला चालना देणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे रेशनकार्डसाठी अर्ज […]

नवीन रेशनकार्डचे काम लांबणीवर

अन्नभाग्य, गृहलक्ष्मीपासून वंचित : लाभार्थी प्रतीक्षेत
बेळगाव : मागील कित्येक दिवसांपासून नवीन रेशनकार्डचे काम लांबणीवर पडले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना शासकीय सुविधा आणि योजनांपासून वंचित रहावे लागत आहे. अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री के. एच. मुनियप्पा यांनी नवीन रेशनकार्डला चालना देणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे रेशनकार्डसाठी अर्ज केलेल्यांच्या पदरात केवळ निराशा पडली आहे. काँग्रेस सरकारने दिलेल्या गॅरंटी योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशनकार्डची मागणी वाढली आहे. जिल्ह्यातून दीड लाख अर्ज दाखल झाले आहेत. मात्र सद्यस्थितीत अर्ज स्वीकृतीचे कामही थांबले आहे. त्यामुळे अर्ज करणाऱ्यांनाही रेशनकार्डसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. अन्नभाग्य योजनेंतर्गत प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ आणि 170 रुपये दिले जात आहेत. त्यामुळे अंत्योदय, बीपीएल आणि एपीएल रेशनकार्डची मागणी वाढू लागली आहे.
दोन वर्षांत रेशनकार्डचे काम विस्कळीत
मागील दोन वर्षांत रेशनकार्डचे काम विस्कळीत झाले आहे. मध्यंतरी काही रेशनकार्डे वितरीत करण्यात आली. त्यानंतर पुन्हा या कामाला स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे खात्याकडे तब्बल 2 लाखांहून अधिक अर्ज पडून आहेत. शिवाय नवीन अर्ज स्वीकृतीला मंजुरी दिल्यास पुन्हा अर्जांच्या संख्येत वाढ होणार आहे. अन्नभाग्य, गृहलक्ष्मी या दोन योजनांसाठी रेशनकार्ड अनिवार्य आहे. अन्नभाग्य योजनेंतर्गत मोफत रेशन त्याबरोबर प्रतिव्यक्ती 170 रुपये आणि गृहलक्ष्मी योजनेंतर्गत कुटुंबातील प्रमुख महिलेला मासिक 2 हजार रुपये दिले जात आहेत. त्यामुळे रेशन कार्डची मागणी वाढू लागली आहे. मात्र कित्येक दिवसांपासून काम ठप्प असल्याने लाभार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.