जम्मू सीमेजवळील हल्ल्यांमध्ये नवा पॅटर्न, हल्लेखोर काही वेळातच होतात बेपत्ता – ग्राऊंड रिपोर्ट

जम्मूमध्ये अलीकडच्या काळात कट्टरतावाद्यांचे अनेक हल्ले झाले आहेत. 9 जून : रियासी 11 जून : कठुआ 7 जुलै : राजौरी 8 जुलै : कठुआ 9 जुलै : डोडा

जम्मू सीमेजवळील हल्ल्यांमध्ये नवा पॅटर्न, हल्लेखोर काही वेळातच होतात बेपत्ता – ग्राऊंड रिपोर्ट

जम्मूमध्ये अलीकडच्या काळात कट्टरतावाद्यांचे अनेक हल्ले झाले आहेत.

9 जून : रियासी

11 जून : कठुआ

7 जुलै : राजौरी

8 जुलै : कठुआ

9 जुलै : डोडा

ही अशाच काही हल्ल्यांची यादी.

 

सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस केंद्रीय निवडणूक आयोग जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक घेण्याची तयारी करत आहे. पण नेमकी गेल्या काही दिवसांतच हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे.

त्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे? या हल्ल्यांमागे कोणती कारणं आहेत? या प्रश्नांची उत्तरे शोधणारा हा ग्राऊंड रिपोर्ट.

जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी अलीकडेच प्रसारमाध्यमांना मुलाखत दिली होती. या मुलाखतींमध्ये त्यांनी आशा व्यक्त केली होती की, या समस्येवर लवकरच नियंत्रण मिळवलं जाईल.

यात लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, कठुआचा अपवाद सोडल्यास हल्ले करणारे कट्टरतावादी पकडले गेलेले नाहीत किंवा चकमकीत मारलेही गेले नाहीत.

मागील काही वर्षांमध्ये कट्टरतावाद्यांकडून जम्मूमध्ये झालेल्या हल्ल्यांकडे बारकाईनं पाहिलं तर असं दिसतं की, यात हल्लेखोर पकडले न जाण्याचा एक नवा पॅटर्न तयार झाला आहे.

ऑक्टोबर 2021 मध्ये जम्मूच्या पुँछ आणि मेंढर भागात कट्टरतावाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत एकूण नऊ जवानांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून या पॅटर्नची सुरुवात झाली.

या दोन्ही चकमकीनंतर भारतीय सैन्यानं जंगलात हल्लेखोरांचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्यानंतर एक महिन्यापेक्षा अधिक काळ सैन्य आणि कट्टरतावाद्यांमध्ये घनदाट जंगलात चकमक सुरू असल्याच्या बातम्या येत राहिल्या.

ही आतापर्यंतची सर्वात जास्त काळ चाललेली चकमक असल्याचं मानलं गेलं. मात्र, अनेक आठवडे उलटल्यानंतरही कट्टरतावाद्यांचा सुगावा लागला नाही.

 

डावपेचात बदल?

अलीकडच्या हल्ल्यांच्या संदर्भात जम्मू-काश्मीर पोलिस दलाचे माजी पोलिस महासंचालक (DGP) एस. पी. वैद यांनी कट्टरतावाद्यांच्या डावपेचात बदल झाल्याचं मत मांडलं.

वैद म्हणतात, “कट्टरतावाद्यांना जंगलात, डोंगरदऱ्यांमध्ये (Mountain Warfare) लढण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. त्याचबरोबर त्यांना आधुनिक शस्त्रे देण्यात आलेली आहेत.

“ही शस्त्रे शक्तीशाली असून त्यांचा वापर स्नायपरसारखा सुद्धा करता येतो. या शस्त्रांमध्ये नाईट व्हिजनची सुविधा आहे. त्यामुळे त्यांचा वापर रात्रीदेखील केला जाऊ शकतो.”

“याचबरोबर हल्लेखोरांना सांगण्यात आलं आहे की सैन्यावर लक्षं ठेवा, त्यांच्या हालचालींचा नोंद ठेवा. त्यांच्यावर हल्ला करा आणि त्याचवेळी तिथून निसटण्याचा मार्गदेखील विचारात घ्या.”

सीमेला लागून असलेल्या राजौरी आणि पुँछसारख्या भागात घुसखोरी आणि हल्ले होणं हे नेहमीचंच आहे. मात्र, आता यात बदल झाला आहे. कोणताही छडा लागू न देता हल्लेखोर पळून जात आहेत. त्यामुळे ही बाब सुरक्षा दलांसाठी खूपच डोकेदुखीची ठरते आहे.

 

यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये देखील भीती आणि चिंतेचं वातावरण आहे.

डॉ. जमरूद मुगल भारत आणि पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या पुँछमध्ये राहतात. ते म्हणतात, “हल्लेखोर येतात, हल्ला करतात आणि गायब होतात. मात्र, ते गायब होतात तरी कुठं?

“बरं ते काही सेकंदांमध्ये किंवा मिनिटांमध्ये सीमा ओलांडून पलीकडे तर जाऊ शकत नाहीत. याचाच अर्थ ते इथेच लपलेले असतात. तुम्ही पाहिलं असेल की इथं किती घनदाट जंगल आहे. उंच उंच पर्वत आहेत.”

हा परिसर भौगोलिकदृष्ट्या खूपच अवघड आहे. आता जे हल्ले होत आहेत आणि त्यात जम्मूवर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. त्यामागं काश्मीरच्या तुलनेत या भागात हल्लेखोरांना शोधणं अधिक अवघड आहे हे कारण आहे.”

पुँछमध्ये राहणारे मोहम्मद जमान वकील आहेत. ते पीर पंजाल ह्युमन राइट्स संघटना चालवतात.

जमान यांच्या मते, “आम्हाला असं वाटतं की संपूर्ण व्यूहरचनाच बदलली आहे. आधी आपण जसं गनिमी काव्याबद्दल किंवा युद्धाबद्दल ऐकायचो त्याचप्रकारे हे हल्लेखोर हल्ला करतात. ते गाड्यांवर, सुरक्षा दलांवर हल्ला करतात. हल्ला केल्यानंतर त्यांचा कोणताही सुगावा न लागणं आणि त्यांनी जंगलात लपून राहणं, ही एक चिंतेची बाब आहे.”

 

गावकऱ्यांचं दहशतीखाली जगणं

अलीकडेच जम्मूमध्ये झालेल्या हल्ल्यांमध्ये एकच हल्ला असा होता की, ज्यात दोन कट्टरपंथी मारले गेले. 11 जूनला कठुआमधील सुहाल गावात हा हल्ला झाला होता. तिथे दोन कट्टरतावाद्यांनी गोळीबार केला होता.

 

हा हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांपैकी एक हल्लेखोर त्याच्याच ग्रेनेडचा स्फोट झाल्यामुळे मारला गेला. तर दुसरा हल्लेखोर सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत मारला गेला.

 

त्या दिवशी सुहाल मध्ये जे घडलं त्याबद्दल गावातील काही प्रत्यक्षदर्शींनी आम्हाला सांगितलं.

गावातील तरुणानं सांगितलं की, “त्यानं (हल्लेखोर) आम्हाला हाक मारली. तो म्हणाला प्यायला पाणी द्या. मी त्याला म्हटलं, की तुला प्यायला पाणी देतो. पण तू कोण आहेस? त्यावर तो म्हणाला की आधी प्यायला पाणी द्या, मग मी माझा परिचय सांगतो.”

“मग मी त्याला म्हणालो की, तू असं कर, तुझं नाव सांग आणि कुठून आला आहेस ते सांग, मी पाणी घेऊन येतो. हे ऐकताच तो म्हणाला की, ये आपण बसून बोलूया. तो डोगरी-पंजाबी अशा मिश्र भाषेत बोलत होता.”

“मी पुढे जाऊ लागताच त्यानं पाठीला लटकवलेलं शस्त्र हातात घेतलं. ते पाहताच मी लगेच मागच्या बाजूला पळालो. त्यानंतर एक मिनिटानं त्याने गोळीबार सुरू केला.”

सुहाल गावातील एका वृद्ध दुकानदारानं सांगितलं की, “दोन्ही हल्लेखोर त्यांच्याजवळ आले आणि पिण्यास पाणी मागू लागले. दुकानदार म्हणाले, पाणी प्यायल्यानंतर त्यांनी हवेत चार-पाच गोळ्या झाडल्या. ते पाहून मी लगेचच दुकानाचं शटर बंद केलं आणि सकाळपर्यत आतच पडून होतो.”

याच गावातील एका घराच्या भिंतींवर आम्हाला गोळ्यांच्या खुणा दिसल्या. हल्लेखोरांनी ओंकार नाथ यांच्या घरावर गोळीबार सुरू केल्यानंतर ओंकार नाथ यांच्या हाताला गोळी लागली.

ओंकार नाथ यांच्या आई, ज्ञानो देवी 90 वर्षांच्या आहेत. त्यांनी सांगितलं, “कोणीतरी सांगितलं की, ते आले आहेत. त्यांनी ग्रेनेड फेकलं. ओंकार बाहेर पाहण्यासाठी गेला. तो तिथंपर्यंत पोहोचताच हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या.”

“चार गोळ्या झाडल्या. आम्ही खूपच घाबरलेलो आहोत. संध्याकाळी सहा वाजताच गावात सामसुम होतं, शांतता पसरते. हल्लेखोर पुन्हा येण्याची गावकऱ्यांना भीती वाटते.”

सुहाल गावात गोळीबार करणारे दोन हल्लेखोर मारले गेले. मात्र अजूनही या गावातील लोकांच्या मनात भीती आणि चिंता आहे.

 

सुहाल गावातच राहणारे रिंकू शर्मा सांगतात, “लोकांमध्ये अजूनही भीतीचं वातावरण आहे. कारण लोकांना अद्यापही असंच वाटतं की हल्लेखोर जवळपासच आहेत.”

 

“सध्या जे हल्ले होत आहेत, त्यामुळे लोकांना ही भीती वाटते. इथे सर्वत्र जंगलच तर आहे. जंगल असल्यामुळे लोकांमध्ये दहशतीचं वातावरण अधिक आहे.”

 

सुहाल गावाप्रमाणेच जम्मूच्या बऱ्याच भागात घनदाट जंगलं आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय सीमा या भागापासून जवळपास 20 किलोमीटर अंतरावर आहे.

 

सुरक्षा दलांचं म्हणणं आहे की, या घनदाट जंगलांचा फायदा घेऊन लपून-छपून कट्टरपंथी सीमेपलीकडून भारतात शिरतात.

 

सुहाल गावातील हल्ला 11 जूनला झाला होता. या घटनेनंतर सुरक्षेबद्दल, जीविताबद्दल इथल्या लोकांच्या मनातील चिंता वाढली आहे. या भागातील लोक आता सातत्यानं भीतीच्या सावटाखाली जगत आहेत.

 

‘जुन्या जखमा अजूनही ताज्या आहेत’

जम्मूत अलीकडेच झालेल्या हल्ल्यांमुळे भीतीचं वातावरण असतानाच, मागील दोन वर्षात झालेल्या हिंसेच्या जखमा अजूनही ताज्या आहेत.

 

राजौरीमधील ढांगरी गावातील एका घरावर चोवीस तास निमलष्करी दलांचा पहारा असतो.

 

31 डिसेंबर 2022 च्या रात्री याच जागी दोन कट्टरपंथीयांनी गोळीबार केला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी या घराजवळ एक बॉम्बस्फोट झाला होता. या दोन्ही घटनांमध्ये एकूण सात जणांचा मृत्यू झाला होता. यात दोन मुलांचाही समावेश होता.

सरोज बाला यांची दोन तरुण मुलं या हल्ल्यात मारली गेली. हल्ला करून पळून जाण्यात हल्लेखोरांना यश आलं. सरोज बाला अजूनही न्यायाची वाट पाहत आहेत.

 

सरोज बाला म्हणतात, “आपल्या पोटच्या मुलांना कोणी विसरू शकतं का बरं. कोणीही विसरू शकत नाही. लोकांच्या गाड्या आल्या की मला वाटतं माझी मुलंच येत आहेत. मला अजूनही वाटतं की माझी मुलं जिवंत आहेत.”

 

“माझ्या घरात फक्त दगड आणि विटाच शिल्लक राहिल्या आहेत. माझ्या मुलांचा जीव जाऊन अठरा महिने झाले आहेत. इतक्या मोठ-मोठया गुप्तहेर संस्था काम करत आहेत, मात्र त्यांच्याकडून काहीही साध्य झालेलं नाही.”

 

“आम्ही न्यायाचीच वाट पाहत आहोत. परमेश्वर एक दिवस आमच्या मुलांना न्याय देईल.”

 

आपल्या मुलांचा जीव घेणारे कोण होते आणि ते अजून पकडले का गेले नाहीत, या प्रश्नाचं उत्तर

 

सरोज बाला शोधत आहेत.

 

त्या म्हणतात, “जर इतके लोक म्हणत आहेत की ते पाकिस्तानातून आलेले आहेत, तर आपल्या गुप्तहेर यंत्रणा, सुरक्षा दलं काय करत आहेत. त्यांचं काय काम आहे?”

“जर सर्वच सीमा बंद केलेल्या आहेत, तर मग सीमेपलीकडून इकडे येण्यासाठी ते कोणत्यातरी मार्गाचा वापर करत असतीलच ना. तो मार्ग तर बंद केला जाऊ शकतो.”

त्याचबरोबर त्यांना असं वाटतं की, “या प्रकारचे हल्ले स्थानिक मदतीशिवाय होऊ शकत नाहीत. जर त्यांना स्थानिक लोकांची मदत मिळाली नाही तर कुठे राहतील, काय खातील. ते आपल्या सोबत जे सामान आणतात, त्यांच्याकडे शस्त्रं इत्यादी वस्तू असतात, हे सर्व ते कुठे ठेवतात.”

“सामान ठेवण्यासाठीसुद्धा त्यांना जागा तर हवीच. त्यांना राहण्यासाठीसुद्धा जागा हवी. खाण्यापिण्याची व्यवस्था हवी. घालायला कपडे हवेत, इतर सुविधा सुद्धा लागत असतील. इथूनच, स्थानिकांकडूनच मदत मिळते आहे त्यांना. इथूनच तर त्यांना मदत होते आहे.”

 

 

राजौरीपासून जवळपास 90 किलोमीटर अंतरावर पुँछमध्ये अशाच प्रकारचं मत आम्हाला ऐकायला मिळालं.

 

पुँछमधी अलोट गावचे रहिवासी, मोहम्मद रशीद यांचा मुलगा हवालदार अब्दुल मजीद यांचा कट्टरपंथियांच्या गोळीबारात मृत्यू झाला होता.

नोव्हेंबर 2022 मध्ये राजौरीच्या जंगलात सुरक्षा दलांकडून राबविण्यात आलेल्या एका तपास मोहिमेच्या वेळेस कट्टरपंथियांनी गोळीबार केला होता. यामध्ये अब्दुल मजीद यांचा मृत्यू झाला होता.

त्यांना अलीकडेच मरणोत्तर कीर्ति चक्रानं सन्मानित करण्यात आलं.

 

याबद्दल मोहम्मद रशीद म्हणतात, “आपलं जे नुकसान होतं आहे ते स्थानिकांशी हातमिळवणी केल्याशिवाय होऊ शकत नाही. जर एखादा अनोळखी व्यक्ती माझ्या घरी आला तर त्याला माझ्या घराबद्दल काहीच माहिती असणार नाही.”

“घरात कोण कुठे बसतं, कोण कुठे झोपतं हे त्याला कसं माहिती असणार. आपल्यामधीलच कोणीतरी त्यांना ही माहिती देतं आणि त्यानंतर ते हल्ला करतात.”

“मला असंच वाटतं की स्थानिकामध्येच अशी माणसं आहेत जी जवानांचा बळी देत आहेत. जवान मारले जात आहेत, नागरिक मारले जात आहेत, छोटी मुलं मारली जात आहेत.”

 

जम्मूमध्येच का होत आहेत हल्ले?

ताज्या घटनांनंतर एक महत्त्वाचा प्रश्न समोर उभा राहतो. तो म्हणजे, जम्मूमधील या भागांमध्येच का हल्ले केले जात आहेत? काश्मीर खोऱ्याऐवजी जम्मूला टार्गेट करण्यामागे कट्टरपंथीयांची नवी व्यूहरचना आहे का?

जम्मू-काश्मीर पोलीस दलाचे माजी पोलिस महासंचालक एस. पी. वैद म्हणतात, “जम्मू भागात मागील 15 वर्षांचा काळ जर तुम्ही लक्षात घेतलात तर जवळपास 2007-08 नंतर इथला दहशतवाद संपला होता.”

“सुरक्षा दलांची तैनाती आवश्यकतेनुसार होते. लडाखमध्ये भारत-चीन सीमेवर जेव्हा संघर्ष झाला तेव्हा सेनादलं आणि राष्ट्रीय रायफल्सच्या तुकड्यांना जम्मूतून तिकडे पाठवण्यात आलं होतं.”

“याचप्रकारे केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांची जम्मूमधील संख्या कमी करून त्यांना काश्मीरमध्ये पाठवण्यात आलं. जम्मू-काश्मीर पोलीस दलाच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या कारवायादेखील थंडावल्या आणि ग्राम सुरक्षा समिती (व्हिलेज डिफेन्स कमिटी) निष्क्रीय झाल्या.”

“मला वाटतं की याच परिस्थितीचा फायदा पाकिस्तानने घेतला आणि जम्मूतील विविध भागांवर हल्ले करण्यास सुरू केली.”

 

या परिस्थितीबद्दल जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा म्हणाले की, परिस्थिती दुर्दैवी आहे मात्र खूप चिंताजनक आहे असं वाटत नाही.

 

‘इंडियन एक्सप्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सिन्हा म्हणाले, “मला विश्वास आहे की, आपण ही परिस्थिती प्रभावीपणे हाताळू. हे पाकिस्तानचं कारस्थान देखील आहे. कट्टरतावाद्यांमध्ये स्थानिकांची होणारी भरती हे यातलं सर्वात मोठं आव्हान आहे.”

“सेनादलं घुसखोरीवर लक्ष ठेवतील. तसं पाहता कट्टरतावाद्यांमध्ये होणारी स्थानिक भरती शून्य आहे. हे एक मोठं यश आहे. सेनादलं आणि पोलीस ही परिस्थिती नियंत्रणात आणतील.”

“आमच्याकडे अशी माहिती आहे की काही जणांनी घुसखोरी केली आहे. सशस्त्र दलांनी त्यासंदर्भात पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठीची व्यूहरचना तयार आहे. मला पूर्ण विश्वास आहे की दहशतवाद रोखण्यासाठी लवकरच एक व्यवस्था निर्माण केली जाईल.”

“जम्मूच्या लोकांनी दहशतवादाशी सामना केला आहे. ग्राम सुरक्षा समिती (व्हिलेज डिफेन्स कमिटी) च्या सदस्यांना स्वयंचालित शस्त्रं देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गृहमंत्री परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत.”

जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे.

 

केंद्रीय निवडणूक आयोग देखील यासंदर्भात तयारी करतं आहे.

16 ऑगस्टला केंद्रीय निवडणूक आयोगानं जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका जाहीर केल्या आहेत. 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 01 ऑक्टोबरला जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठीचं मतदान घेतलं जाणार आहे. तर 04 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर एकच शंका व्यक्त करण्यात येते आहे. ती म्हणजे, आगामी विधानसभा निवडणुका रोखणं हा तर जम्मूमध्ये होणाऱ्या या हल्ल्यांमागचा उद्देश नाही ना?

Published By- Priya Dixit 

 

 

 

 

Go to Source