न्यूझीलंडविरुद्ध पाकिस्तान सलामीला नवीन जोडी वापरण्याची शक्यता

वृत्तसंस्था/ कराची पाकिस्तान न्यूझीलंडमधील टी-20 मालिकेत मोहम्मद रिझवानसह बाबर आझमच्या ऐवजी युवा सइम अय्युबसह नवीन सलामीची जोडी उतरविण्याची शक्यता आहे. ऑकलंडमधून आलेल्या वृत्तानुसार, संघ व्यवस्थापनाने रिझवान आणि सइम यांना जाळ्यात सराव करताना नवीन चेंडूच्या गोलंदाजांविरुद्ध फलंदाजी करायला लावली, तर बाबर आणि फखर झमान यांनी मुख्यत: फिरकीपटूंचा सामना केला. बाबर आणि रिझवान यांनी 2021 पासून टी-20 […]

न्यूझीलंडविरुद्ध पाकिस्तान सलामीला नवीन जोडी वापरण्याची शक्यता

वृत्तसंस्था/ कराची
पाकिस्तान न्यूझीलंडमधील टी-20 मालिकेत मोहम्मद रिझवानसह बाबर आझमच्या ऐवजी युवा सइम अय्युबसह नवीन सलामीची जोडी उतरविण्याची शक्यता आहे. ऑकलंडमधून आलेल्या वृत्तानुसार, संघ व्यवस्थापनाने रिझवान आणि सइम यांना जाळ्यात सराव करताना नवीन चेंडूच्या गोलंदाजांविरुद्ध फलंदाजी करायला लावली, तर बाबर आणि फखर झमान यांनी मुख्यत: फिरकीपटूंचा सामना केला.
बाबर आणि रिझवान यांनी 2021 पासून टी-20 प्रकारात पाकिस्तानसाठी खूप यशस्वीपणे सलामी दिली आहे. परंतु नवा कर्णधार शाहीन शाह आफ्रिदी, नवीन हाय परफॉर्मन्स प्रशिक्षक यासिर अराफत आणि संघ संचालक मोहम्मद हाफीझ हे न्यूझीलंडविरु द्धच्या पाच सामन्यांमध्ये काही नवीन प्रयोग करून पाहण्यास उत्सुक आहेत. 12 जानेवारीपासून ही मालिका सुरू होत आहे. बाबर आझम आणि रिझवान यांच्याच 150 हून अधिक धावांच्या नाबाद भागीदारीमुळे 2021 मध्ये दुबई येथे झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताला पाकने पराभूत केले होते. एखाद्या विश्वचषक सामन्यात पाकिस्तानने भारताला पराभूत करण्याची ही पहिलीच खेप होती.
21 वर्षीय सइम गेल्या वर्षी 8 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला असून या महिन्याच्या सुरु वातीला सिडनीमध्ये त्याने कसोटीत पदार्पण केले. तो त्याच्या हार्ड हिटिंग शैलीसाठी ओळखला जातो आणि संघ व्यवस्थापनाला तो आणि रिझवान संघाला वेगवान सुऊवात करून देऊ शकतील, असा विश्वास वाटत आहे. बाबर आता तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस येण्याची शक्यता आहे. त्यानंतर सलामीवीर असलेला फखर झमान, आझम खान आणि इफ्तिकार अहमद यांचा क्रमांक लागेल. बाबर सध्या पाकिस्तानच्या कोणत्याही संघाचा कर्णधार नसून शाहीन आणि हाफीज त्याच्याशी बोलल्यानंतर या फलंदाजाने तिसऱ्या क्रमांकावर येऊन फलंदाजी करण्यास सहमती दर्शविली आहे.