कदापि नको दहशतवादाचे समर्थन

कदापि नको दहशतवादाचे समर्थन

पंतप्रधान मोदी यांचा एससीओ परिषदेत चीन-पाकला अप्रत्यक्ष इशारा
वृत्तसंस्था /अस्ताना
दहशतवाद हा संपूर्ण जगासमोरचा सर्वात मोठा धोका आहे. त्यामुळे कोणत्याही कारणास्तव त्याचे समर्थन कोणी करता कामा नये. तसेच कोणत्याही प्रकारचा आणि कोणत्याही स्वरुपातील दहशतवाद हा त्याज्यच मानला पाहिजे, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन आणि पाकिस्तानला अप्रत्यक्षरित्या दिला आहे. कझाकिस्तान देशातील अस्ताना येथे होत असलेल्या शांघाय सहयोग शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संदेश पाठविला आहे. या संदेशात त्यांनी चीन आणि पाकिस्तानला काही खडे बोल सुनावले आहेत. या संदेशाचे वाचन या परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करणारे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी केले. चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी त्यांनी या परिषदेच्या निमित्ताने चर्चा केली. भारत आणि चीन यांच्यात लडाख सीमेवर अद्यापही विवाद सुरु असून दोन्ही देशांच्या सेना गेली अडीच वर्षे एकमेकांसमोर उभ्या आहेत. दोन्ही देशांचे संबंध खऱ्या अर्थाने सुधारायचे असतील, तर सीमारेषेचे पावित्र्य राखले पाहिजे, अशी भारताची स्पष्ट भूमिका असल्याचे जयशंकर यांनी या चर्चेत स्पष्ट केले.
अशा देशांना एकटे पाडा
जे देश दहशतवादाला प्रोत्साहन, आश्रय आणि आर्थिक साहाय्य देतात, त्यांना एकटे पाडले पाहिजे. राजकारण बाजूला ठेवून अशा देशांविरोधात सर्व शांतताप्रेमी देशांनी कठोर भूमिका घ्यावयास हवी. त्यांना एकटे पाडल्याशिवाय त्यांच्यात सुधारणा होणार नाही आणि जगासमोरचा दहशतवादाचा धोका टळणार नाही. विश्वसमुदायाने हे केले नाही, तर दहशतवाद वाढविणाऱ्या देशांना प्रोत्साहन दिल्याप्रमाणे होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संदेशात स्पष्ट केले आहे.
चीनलाही अप्रत्यक्ष इशारा
चीनने अनेकदा आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये आणि व्यासपीठांवर पाकिस्तानच्या दहशतवादी संघटना आणि त्यांचे नेते यांना संरक्षण देणारी भूमिका घेतली आहे. तसेच पाकिस्तानचे समर्थन केले आहे. त्यामुळे दक्षिण आशियातील दहशतवाद अधिकच फोफावला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनलाही या संदेशाच्या माध्यमातून भारताच्या वतीने सूचना दिल्याचे स्पष्ट करण्यात आले.
मूळ लक्ष्याकडे दुर्लक्ष नको
दहशतवादाचा नि:पात हे शांघाय सहयोग संघटनेचे एक मूळ उद्दिष्ट्या आहे. त्याकडे कोणत्याही कारणास्तव आणि कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष केले जाऊ नये. जगातील प्रत्येक देशाने दहशतवाद संपविण्याला प्राथमिकता देणे आवश्यक आहे. आपल्या सीमेपलिकडून  दहशतवादी कृत्यांचा अनुभव अनेक देशांनी घेतला आहे. दहशतवादाची अशी वाढ अनियंत्रितरित्या होत राहिली, तर क्षेत्रीय शांतता आणि वैश्विक सौहार्द धोक्यात येणार आहे, असेही प्रतिपादन भारताने केले.
चीनचे अभिनंदन, पण…
शांघाय सहयोग संघटनेचे अध्यक्षपद सध्या कझाकिस्तानकडे आहे. पुढील वर्षी ते चीनला मिळणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे अभिनंदन केले. मात्र, दहशतवादाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष समर्थन तसेच सहकार्य केले जाऊ नये, ही अपेक्षाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट शब्दांमध्ये व्यक्त केली.
सीमावादावर न्यायोचित तोडगा आवश्यक : जयशंकर
चीनशी संपर्कात राहण्याची भारताची इच्छा आहे. मात्र, त्यासाठी सीमावादावर न्यायोचित तोडगा निघणे आवश्यक आहे. सीमेवरील तणाव त्वरित दूर होण्याचीही आवश्यकता आहे. भारताने आजवर प्रत्येक नियमाचे पालन केले आहे. सीमेचे पावित्र्य अबाधित राखल्याशिवाय द्विपक्षीय संबंध सुरळीत होतील, अशी आशा बाळगणे व्यर्थ आहे, असेही जयशंकर यांनी यी यांच्याकडे स्पष्ट केले आहे.