रोमानियाला 3-0 ने नमवून नेदरलँड्स 16 वर्षांनंतर उपांत्यपूर्व फेरीत

वृत्तसंस्था/ म्युनिक नेदरलँड्सचा संघ योग्य वेळी आपला स्तर उंचावत चालला असल्याचे दिसून येत असून युरो, 2024 मधील आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीची मालिका चालू ठेवताना त्यांनी रोमानियावर 3-0 असा विजय मिळविला. त्यासरशी मागील 16 वर्षांत पहिल्यांदाच त्यांनी युरोपियन चॅम्पियनशिपची उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यश प्राप्त केले आहे. कोडी गॅकपोने आधी 20 व्या मिनिटाला कोंडी फोडली आणि बदली खेळाडू […]

रोमानियाला 3-0 ने नमवून नेदरलँड्स 16 वर्षांनंतर उपांत्यपूर्व फेरीत

वृत्तसंस्था/ म्युनिक
नेदरलँड्सचा संघ योग्य वेळी आपला स्तर उंचावत चालला असल्याचे दिसून येत असून युरो, 2024 मधील आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीची मालिका चालू ठेवताना त्यांनी रोमानियावर 3-0 असा विजय मिळविला. त्यासरशी मागील 16 वर्षांत पहिल्यांदाच त्यांनी युरोपियन चॅम्पियनशिपची उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यश प्राप्त केले आहे.
कोडी गॅकपोने आधी 20 व्या मिनिटाला कोंडी फोडली आणि बदली खेळाडू डॉनिएल मालेनने दोन उशिरा गोल करून डच संघाला 2008 नंतर स्पर्धेत प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवून दिला. नेदरलँड्सने त्याआधी आघाडी वाढविण्याच्या अनेक संधी गमावल्या होत्या. तथापि, त्यांच्या निराशाजनक गटस्तरावरील कामगिरीच्या तुलनेत हे खूपच सुधारलेले प्रदर्शन राहिले. गटस्तरावर ऑस्ट्रियाकडून ते 3-2 ने पराभूत झाले होते.
कधी कधी तुम्ही वाईट का खेळता हे सांगणे कठीण असते. या सामन्यातही सुऊवात कठीण होती. प्रतिस्पर्धी खरोखरच आक्रमक होते. पण शेवटी आम्हाला आमची बॉल पोझिशन सापडली, असे नेदरलँड्सचे प्रशिक्षक कोयमन म्हणाले. तरीही रोमानियासाठी हा सामना लक्षात ठेवण्यासारखा होता. रोमानियाची युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये बाद फेरीसाठी पात्र ठरण्याची ही दुसरी वेळ होती आणि गटामध्ये प्रथम स्थान मिळवून त्यांनी बाद फेरीत पाऊल ठेवले होते.
गॅकपोच्या गोलपर्यंत रोमानियाचा सामन्यावर ताबा होता, परंतु नेदरलँड्सचा गोलरक्षक बार्ट व्हर्ब्रुगेनची कधीही कसोटी लागण्यासारखे प्रसंग आले नाहीत. सलामीचा गोल नोंदला गेला त्यावेळी शावी सिमन्सने पुढे सरसावत गॅकपोला चेंडू पुरविला. लिव्हरपूलच्या या फॉरवर्डने मग गोल करण्यात कसूर केली नाही. गॅकपोचा हा स्पर्धेतील तिसरा गोल होता, ज्यामुळे तो जर्मनीचा जमाल मुसियाला, जॉर्जियाचा जॉर्जेस मिकौताडझे आणि स्लोव्हाकियाचा इव्हान श्रांझ यांच्यासमवेत सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनला आहे.