नेपाळ जिंकता जिंकता हरली
अवघ्या एका धावेने पराभव : बलाढ्या द. आफ्रिकेला नेपाळने झुंजवले : सामनावीर तबरेज शाम्सीचे 4 बळी
वृत्तसंस्था/ सेंट व्हिन्सेंट, वेस्ट इंडिज
येथील अर्नोस व्हॅले मैदानावर झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नेपाळचा एका धावेने पराभव केला. आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावत 115 धावा केल्या. प्रत्युत्तरात, नेपाळचा संघ 7 गडी गमावून 114 धावाच करू शकला. नेपाळला शेवटच्या षटकात विजयासाठी 8 धावांची गरज होती, परंतु त्यांना 6 धावा करता आल्या आणि 1 धावाने त्यांनी सामना गमावला. दरम्यान, नेपाळच्या संघाने आफ्रिकेला दिलेली कडवी झुंज कौतुकाचा विषय ठरली. आफ्रिकेचा हा चौथा विजय असून गुणतालिकेत आठ गुणासह त्यांनी आपले अव्वलस्थान कायम राखले.
शनिवारी नेपाळने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नेपाळच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा हा निर्णय सार्थ ठरवला. धोकादायक फलंदाजी करणारा आफ्रिकेचा संघ नेपाळच्या गोलंदाजांसमोर कोलमडला. त्यांना निर्धारित 20 षटकात 7 विकेट्सवर केवळ 115 धावा करता आल्या. आफ्रिकेच्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर डिकॉक 10 धावा काढून बाद झाला. कर्णधार मॅरक्रमही फार काळ टिकला नाही. त्याला 15 धावावर ऐरीने बाद केले. हेन्रिक क्लासेन व डेव्हिड मिलर या स्टार फलंदाजांनीही सपशेल निराशा केली. सलामीवीर रिझा हेंड्रिक्सने मात्र एकाकी लढत देताना सर्वाधिक 49 चेंडूत 43 धावा केल्या. याशिवाय ट्रिस्टन स्टब्जने नाबाद 27 धावांचे योगदान दिले. यामुळे आफ्रिकन संघाला 20 षटकांत 115 धावापर्यंत मजल मारता आली. नेपाळकडून दीपेंद्रसिंग ऐरीने 3 तर कुशल भुरटेलने 4 बळी घेतले.
नेपाळचीही कडवी टक्कर
नेपाळने आपल्या फलंदाजीची सुरुवात अतिशय हुशारीने केली होती. त्यांचे फलंदाज आपला डाव सावधपणे पुढे नेत होते. एकावेळी असे वाटत होते की नेपाळ इतिहास रचेल. ते दक्षिण आफ्रिकेला सहज पराभूत करतील. मात्र त्यानंतर एकामागून एक विकेट पडत गेल्याने नेपाळचा संघ दडपणाखाली आला. नेपाळची तिसरी विकेट 85 धावांवर पडली. यानंतर 15 धावांत आणखी 3 विकेट पडल्या.
नेपाळला शेवटच्या षटकात विजयासाठी 8 धावांची गरज होती. आफ्रिकेसाठी ओटनील बार्टमन हे षटक टाकत होता. या षटकात पहिल्या 5 चेंडूत स्ट्राइकवर असलेल्या गुलशन झाने 6 धावा केल्या. शेवटच्या चेंडूवर नेपाळला जिंकण्यासाठी 2 तर टाय करण्यासाठी एका धावेची आवश्यकता होती. बार्टमनचा उसळता चेंडू गुलशनला तटवता आला नाही. चेंडू विकेटकीपर डी कॉककडे गेला. त्याने हुशारीने चेंडू मिडविकेटला उभ्या असलेल्या क्लासनकडे फेकला. त्याने चपळतेने नॉन स्ट्रायकिंग एन्डला स्टंप्सवर चेंडू फेकत गुलशनला बाद केले. अशा स्थितीत नेपाळने अवघ्या 1 धावेने सामना गमावला. नेपाळच्या युवा फलंदाजांनी आफ्रिकेला जोरदार टक्कर दिली पण त्यांना 7 बाद 114 धावापर्यंत मजल मारता आली. नेपाळकडून आसिफ शेखने सर्वाधिक 42 धावा केल्या तर अनिल साहने 27 धावांचे योगदान दिले. आफ्रिकेकडून तबरेज शाम्सीने सर्वाधिक 4 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
द.आफ्रिका 20 षटकांत 7 बाद 115 (हेंड्रिक्स 43, मॅरक्रम 15, स्टब्ज नाबाद 27, भुरटेल 4 तर ऐरी 3 बळी).
नेपाळ 20 षटकांत 7 बाद 114 (कुशल भुरटेल 13, आसिफ शेख 42, अनिल साह 27, शाम्सी 4 बळी).
आफ्रिकेचा असाही अनोखा विक्रम
टी 20 वर्ल्डकपमधील नेपाळविरुद्ध लढतीत दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला. अवघ्या एका धावेने विजय मिळवल्यानंतर आफ्रिकन संघाने अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. यावेळी टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा एका धावेने विजय मिळवण्याचा विक्रम आफ्रिकेने आपल्या नावे केला.
टी 20 वर्ल्डकपमध्ये एका धावेने विजय मिळवणारे संघ
द.आफ्रिका वि न्यूझीलंड, 2009
न्यूझीलंड वि पाकिस्तान, 2010
भारत वि द.आफ्रिका, 2012
भारत वि बांगलादेश, 2016
झिम्बाब्वे वि पाकिस्तान, 2022
द.आफ्रिका वि नेपाळ, 2024.
टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 1 धावेने विजय मिळवणारे संघ
दक्षिण आफ्रिका – 5 वेळा
इंग्लंड – 2 वेळा
न्यूझीलंड – 2 वेळा
भारत – 2 वेळा.
