गुंजीनजीक पॅसेज सोडण्याकडे महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष

वार्ताहर/गुंजी येथील शेतवडीत असलेल्या ब्रिटिशकालीन पिण्याच्या पाण्याच्या विहिरीच्या वाटेवर पॅसेज सोडण्याकडे महामार्ग प्राधिकरणाने दुर्लक्ष करत असल्याने येथील महिला वर्ग व नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सदर विहिरीचे पाणी गावातील नागरिक केवळ पिण्यासाठीच वापरतात. त्यामुळे त्या विहिरीच्या वाटेवर महामार्ग प्राधिकरणाने पॅसेज ठेवावा, अशी सुरुवातीपासूनची मागणी आहे. त्यामुळेच मागील कंत्राटदाराने या ठिकाणी खुली जागा सोडली […]

गुंजीनजीक पॅसेज सोडण्याकडे महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष

वार्ताहर/गुंजी
येथील शेतवडीत असलेल्या ब्रिटिशकालीन पिण्याच्या पाण्याच्या विहिरीच्या वाटेवर पॅसेज सोडण्याकडे महामार्ग प्राधिकरणाने दुर्लक्ष करत असल्याने येथील महिला वर्ग व नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सदर विहिरीचे पाणी गावातील नागरिक केवळ पिण्यासाठीच वापरतात. त्यामुळे त्या विहिरीच्या वाटेवर महामार्ग प्राधिकरणाने पॅसेज ठेवावा, अशी सुरुवातीपासूनची मागणी आहे. त्यामुळेच मागील कंत्राटदाराने या ठिकाणी खुली जागा सोडली होती. मात्र सध्या या वाटेवरती महामार्गाचे काम सुरू असून या वाटेवरती माती टाकून रस्ता करण्याचे काम सुरू झाले आहे. मागील महिन्यात झालेल्या गुंजी ग्रामसभेमध्ये सदर पॅसेजविषयी चर्चा करण्यात आली असून तसा ठराव संमत करून तो संबंधितांना पाठविण्यात आला आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून त्या वाटेवरील रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. वास्तविक या वाटेने भालके, भटवाडा, शिंपेवाडी, करंजाळ, जटगा गावातील नागरिकही ये-जा करतात. त्याचबरोबर रस्त्यापलीकडील शेतवडीला जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. सध्या या वाटेवरती भराव टाकण्यात येत असून पाणी आणण्यासाठी जाणाऱ्या महिलांचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे सदर काम त्वरित थांबवून या ठिकाणी पॅसेज निर्माण करून पाण्याची वाट मोकळी करावी, अशी आग्रही मागणी होत आहे.