रालोआच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदी नरेंद्र मोदीं यांची एकमताने निवड

रालोआच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदी नरेंद्र मोदीं यांची एकमताने निवड

चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार यांची नावे मागे

टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू, जनता दल (युनायटेड) नेते नितीश कुमार, जेडीएसचे खासदार एचडी कुमारस्वामी आणि एनडीएमधील इतर नेत्यांनी एका महत्त्वाच्या बैठकीत नरेंद्र मोदींचे संसदेतील आघाडीचे प्रमुख म्हणून नाव देण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एनडीएने आपली पहिली बैठक बोलावली. संसद भवनाच्या संविधान सदनमध्ये झालेल्या या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांची लोकसभेचे नेते तसेच एनडीएच्या संसदीय पक्षाचे नेते म्हणून एकमताने निवड करण्यात आली . या बैठकिला नरेंद्र मोदी यांनीही उपस्थिती लावली.
यावेळी बोलताना टी.डी.पी.चे प्रमुख चंद्राबाबू नायडू म्हणाले, “आम्ही बहुमत मिळवले असून त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन महिने प्रचारादरम्यान कधीही विश्रांती घेतली नसल्याचं आम्ही बघितले आहे. त्यांनी दिवसरात्र प्रचार केला आहे. त्याच भावनेने आम्ही आंध्र प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभा घेऊन मोठ्या रॅलीही आयोजित केल्या होत्या. याच्या मदतीनेच आंध्र प्रदेशात निवडणूक जिंकण्यास आम्हाला मदत झाली.” असे त्यांनी म्हटलं आहे.
भाजप खासदार राजनाथ सिंह यांनी या बैठकिला संबोधित करताना म्हटलं आहे कि, “मला सर्व नवनिर्वाचित खासदारांचे अभिनंदन करायचे आहे. आज आम्ही एनडीएचा नेता निवडण्यासाठी आलो आहोत. मला विश्वास आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव सर्वांसाठी सर्वात योग्य आहे.”
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाले तसेच आम्ही ओडिशातही आमचे सरकार स्थापन केलं आहे. मला कळवण्यास आनंद होत आहे की, आंध्र प्रदेशातही एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे. अरुणाचल प्रदेशातही एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे. , आम्ही तिसऱ्यांदा सरकार स्थापन केले, सिक्कीममध्येही एनडीएने सरकार स्थापन केले.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.