मनपा शाळेची मैदाने बनली पार्किंग अड्डा

खेळाऐवजी गैर कामासाठी मैदानांचा होतोय वापर कोल्हापूर/ इम्रान गवंडी मुलांना शालेय जीवनापासूनच खेळाची आवड निर्माण व्हावी, खेळण्यासाठी प्रोत्साहान मिळावे, यासाठी केंद्राकडून खेलो इंडिया उपक्रम राबवला जात आहे. दुसरीकडे महापालिकेच्या काही शाळांच्या मैदानांचा वापर पार्कींग व इतर कामांसाठी होत असल्याने मुलांनी खेळायचे कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.शाळा बंद पडली म्हणून काय झालं? मुलांना खेळण्यासाठी मैदाने […]

मनपा शाळेची मैदाने बनली पार्किंग अड्डा

खेळाऐवजी गैर कामासाठी मैदानांचा होतोय वापर
कोल्हापूर/ इम्रान गवंडी
मुलांना शालेय जीवनापासूनच खेळाची आवड निर्माण व्हावी, खेळण्यासाठी प्रोत्साहान मिळावे, यासाठी केंद्राकडून खेलो इंडिया उपक्रम राबवला जात आहे. दुसरीकडे महापालिकेच्या काही शाळांच्या मैदानांचा वापर पार्कींग व इतर कामांसाठी होत असल्याने मुलांनी खेळायचे कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.शाळा बंद पडली म्हणून काय झालं? मुलांना खेळण्यासाठी मैदाने तरी सुस्थितीत ठेवा, अशी भावना पालक, शिक्षक, विद्यार्थ्यांतून होत आहे. या मैदानांचा गैरवापर होत असेल तर त्याला वेळीच पायबंद घालण्याची गरज आहे.
मनपा शाळेच्या अनेक मैदानांची दुरावस्था झाली आहे. काही शाळांना अपुरी मैदाने आहेत. पुरेसा निधी नसल्याने मैदाने विकसित करण्यात अडचणी येत आहेत. यासाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे. शाळा असली तर मैदाने असलीच पाहिजेत, असा नियम आहे. शाळेला मैदाने आहेत, पण ती मुलांना खेळण्यायोग्य आहेत का, याकडे महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. नेहरूनगर विद्यामंदिराच्या मैदानाचे सपाटीकरण करण्याची गरज आहे. येथे क्रीडा साहित्याची गरज आहे. क्रीडा शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याची आवश्यकता आहे. येथील मुलांना वार्षिक क्रीडा महोत्सवासाठी इतर शाळेच्या मैदानाचा आधार घ्यावा लागत आहे.
राजेंद्रनगर येथील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण विद्यालयाला मैदान आहे. मात्र या मैदानाची दुरावस्था झाली आहे. मैदानाचे सपाटीकरण गरजेचे आहे. प्रशासनाने मैदान बंदीस्त केले आहे. पण काहींनी कंपाऊंडची भिंत एका बाजूने पाडली आहे. रात्रीच्यावेळी येथे मद्यपींचा वावर असतो. टेंबलाईवाडी विद्यालयाच्या मैदानाचेही सपाटीकरण नसल्याने मुलांना खेळणे अवघड होत आहे. येथील संरक्षक भिंतीचीही दुरावस्था झाली आहे.
प्रिन्सेस पद्माराजे विद्यालयाचे मैदान म्हणजे पार्कींगचा अड्डाच : मनपाकडून कागदी घोडे नाचवण्यातच धन्यता
बुधवार पेठेतील खोल खंडोबा मंदिर परिसरातील प्रिन्सेस पद्माराजे विद्यालय बऱ्याच वर्षापासून बंद आहे. शहरातील दाट लोकवस्तीच्या ठिकाणी असूनही काळाच्या ओघात ही शाळा बंद पडली. सध्या येथील शाळेच्या इमारतीत महापालिकेचे उद्यान विभाग, आरोग्य विभाग, आरोग्य सुविधा केंद्र सुरू आहे. शाळेला भव्य मैदान आहे. शाळा बंद असली तरी मैदानाचा वापर परिसरातील मुलांना खेळण्यासाठी होऊ शकतो. तसा सुचना फलकही लावला आहे. पण तसे न होता येथे अवैधरित्या पार्कींग केले जात आहे. महापलिकेने मनावर घेतल्यास या मैदानाचा वापर नक्कीच मुलांना खेळण्यासाठी होऊ शकतो. पण प्रशासन नुसते कागदी घोडे नाचवण्यातच धन्यता मानत आहे.
महाराणी ताराबाई विद्यालयाच्या मैदानावर पार्कींग
मंगळवार पेठेतील बेलबागेशेजारील महाराणी ताराबाई विद्यालय कमी पटसंख्येमुळे वर्ग कमी करण्यात आले. सध्या येथे सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू आहेत. शाळेचे मैदान प्रशस्त असूनही या शाळेच्या मैदानावर राजेरोसपणे वाहने पार्कींग केली जात आहेत. शाळा बंद पडली असली तरी मैदाने विकसित करा, अशी मागणी जोर धरत आहे.
पोलीस प्रशासनासह संयुक्त कारवाई करू
मनपा शाळेच्या मैदानावर पार्कींग होणाऱ्या वाहनांवर कारवाईसाठी शहर वाहतूक पोलिसांकडे लेखी तक्रार देणार आहे. मनपा व पोलीस प्रशासनाकडून संयुक्तरीत्या वाहनांवर कारवाईची मोहीम राबवली जाईल. नागरिकांनी शाळेच्या मैदानात पार्कींग करू नये. मैदाने विकसित करण्यासाठी मनपाचा निधी कमी पडत आहे. शासनाच्या जादा निधीची आवश्यकता आहे.असे महापालिका ईस्टेट अधिकारी सचिन जाधव म्हणाले आहेत.