महापालिका आयुक्तांनीच हाती घेतली फॉगिंग मशीन

औषध फवारणीसाठी उचलले पाऊल बेळगाव : डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढत चालले आहेत. त्यामुळे महानगरपालिकेने औषध फवारणीसाठी पाऊल उचलले असून गुरुवारी पहाटे चक्क मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनीच हातात फॉगिंग मशीन घेऊन फवारणी केली. या भूमिकेमुळे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वत: होऊनच विविध भागामध्ये फॉगिंग करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी सकाळी 6 वाजता आयुक्तांनी अनगोळच्या विभागीय कार्यालयाला भेट दिली. तेथील कामकाजाची […]

महापालिका आयुक्तांनीच हाती घेतली फॉगिंग मशीन

औषध फवारणीसाठी उचलले पाऊल
बेळगाव : डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढत चालले आहेत. त्यामुळे महानगरपालिकेने औषध फवारणीसाठी पाऊल उचलले असून गुरुवारी पहाटे चक्क मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनीच हातात फॉगिंग मशीन घेऊन फवारणी केली. या भूमिकेमुळे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वत: होऊनच विविध भागामध्ये फॉगिंग करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी सकाळी 6 वाजता आयुक्तांनी अनगोळच्या विभागीय कार्यालयाला भेट दिली. तेथील कामकाजाची पाहणी करून तपासणी केली. यावेळी आरोग्य निरीक्षकांना संपूर्ण प्रभागातील स्वच्छता करण्यासाठी सूचना केली. कचऱ्याची उचल वेळेत करा, रस्त्यावर तसेच डबक्यांमध्ये पाणी साचू नये याची काळजी घ्या, असे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रभागातील प्रत्येक घरामध्ये जाऊन नागरिकांची विचारपूस करा, कोणालाही ताप किंवा अंगदुखी असेल तर संबंधित व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करून त्यांना औषधांचा पुरवठा करा, असे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर शहापूर येथील नाथ पै सर्कलला भेट दिली. तेथील साफसफाईची पाहणी केली. तेथे असलेल्या इंदिरा कॅन्टीनला भेट देऊन स्वच्छता राखण्याची सूचना केली. कपिलेश्वर मंदिराजवळील तलाव व परिसराची पाहणी केली. स्वत: फॉगिंग मशीन घेऊन त्या परिसरात औषधाची फवारणी केली. खडेबाजार, टेंगिनकेरा गल्ली परिसरातही पाहणी केली. नाल्यांची पाहणी करून स्वच्छ करण्याची ताकीदही दिली आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या संरक्षणासाठी हातमोजे, संरक्षक कपडे, बूट, मास्क परिधान करावेत, जेणेकरून कर्मचाऱ्यांना कोणताही आजार होऊ नये, याची प्रथम दक्षता घ्या, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. प्रत्येक प्रभागामध्ये औषधाची फवारणी होणे महत्त्वाचे आहे.
डासांचा प्रादूर्भाव रोखा
डासांचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक आरोग्य निरीक्षक, महसूल निरीक्षकांनी कार्यरत रहावे. एखादा दिवस फॉगिंग करून न थांबता चार दिवसांतून किंवा आठवड्यातून एकदा तरी सर्व परिसरात फॉगिंग करावे, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी महानगरपालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे, पर्यावरण विभागाचे अभियंते हणमंत कलादगी, अभियंते आदिलखान पठाण यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.