मनपा अर्थसंकल्प पूर्वतयारी बैठकीत समस्यांचा भडिमार
हॉटेल असोसिएशन, चेंबर ऑफ कॉमर्सच्या सदस्यांनी केल्या सूचना
बेळगाव : महापालिकेच्या अर्थसंकल्प तयारीची पूर्वबैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स, हॉटेल असोसिएशन, याचबरोबर इतर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये विविध तरतुदी करण्याबाबतची मागणी केली. महापौर सविता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी उपमहापौर आनंद चव्हाण उपस्थित होते. महापालिकेच्या सभागृहामध्ये अर्थसंकल्पातील तरतुदींवर चर्चा करण्यासाठी ही पूर्वबैठक बोलाविण्यात आली होती. बैठकीमध्ये चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष सी. सी. होंडदकट्टी यांनी महापालिकेचे औद्योगिक क्षेत्राकडे दुर्लक्ष होत आहे. सर्वात जास्त आम्ही कर देत आहोत. असे असताना औद्योगिक विभागातील उद्योजकांना पाणीपुरवठा केला जात नाही. ही बाब अत्यंत गंभीर आहे. तेव्हा याबाबत गांभीर्याने विचार करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली. यावेळी सेक्रेटरी किथ मचाडो म्हणाले, उद्योगक्षेत्राला उभारणी देण्यासाठी विशेष तरतुदी करणे महत्त्वाचे आहे. विविध जिल्ह्यांतून किंवा राज्यांतून शहराकडे येणाऱ्या पर्यटकांना आपण आकर्षित केले पाहिजे. यासाठी येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये मोठी तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी केली.
हॉटेल्स ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजय पै यांनी हॉटेलचालकांना वेळेत ट्रेड लायन्सेस, तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेने लक्ष दिले पाहिजे. लहान कॅन्टीन, हॉटेल्स यांच्याकडून दंड आकारला जात आहे. तो थांबला पाहिजे. हॉटेलचालकांना महानगरपालिकेने अधिक सहकार्य केल्यास मोठ्या प्रमाणात महापालिकेलाच कर मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वात जास्त हॉटेलचालकच कर भरत आहेत. याचा विसर महानगरपालिकेला पडला आहे, असे त्यांनी सांगितले. मनपाच्या ओला व सुका कचरा स्वतंत्र करण्याच्या योजनेचे आम्ही स्वागत करतो. मात्र बऱ्याचवेळा मोठी वाहने येतात, त्यावेळी दोन्ही कचरा एकाच वाहनामध्ये घेतात. तेव्हा स्वतंत्र वाहने पाठविल्यास निश्चित त्याचा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. हॉटेलचालकांकडून घेण्यात येणारी ट्रेड लायसेन्सची रक्कम वर्षाला चार हप्त्यातून घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
चार्टर्ड अकाऊंटंट एम. एस. तिगडी म्हणाले, भूजलपातळी अत्यंत खालावली आहे. त्याची वाढ करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. मी स्वत: यासाठी प्रयत्न केले. ते यशस्वी ठरले आहेत. मी कचऱ्यावर गॅस तयार करून वापर करत आहे. अशाच प्रकारे प्रत्येकाने जर केले तर महानगरपालिकेला कचरा गोळा करण्याची गरजही भासणार नाही. तेव्हा येत्या अर्थसंकल्पामध्ये यासाठी विशेष योजना राबवाव्यात. त्याची तरदूत अर्थसंकल्पात करावी, अशी मागणी त्यांनी केली. माजी महापौर विजय मोरे यांनी महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाबद्दल जोरदार टीका केली. अर्थसंकल्पामध्ये अनेकवेळा स्मशानभूमीसाठी विशेष निधीची तरतूद करावी, अशी मागणी केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे. येत्या अर्थसंकल्पामध्ये शहरातील प्रत्येक स्मशानभूमीसाठी 5 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करावी, अशी मागणी केली. टाऊन वेंडर कमिटीचे सदस्य मडिवाळाप्पा तिगडी यांनी शहरातील रस्त्यावरील विव्रेत्यांच्या समस्या मांडल्या. त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करावी, याचबरोबर स्वच्छतागृह नसल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. तेव्हा या व्यापाऱ्यांच्या समस्यादेखील सोडवा, असे आवाहन त्यांनी केले.
समस्या सोडविण्याचे आश्वासन
यावेळी नूतन आयुक्त पी. एस. लोकेश यांनी चेंबर, हॉटेल व इतर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून त्या समस्या सोडविण्यासाठी निश्चितच प्रयत्न करू, असे आश्वासन दिले आहे. यावेळी उपायुक्त उदयकुमार तळवार, हॉटेल असोसिएशनचे पदाधिकारी विठ्ठल हेगडे, आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे, पर्यावरण विभागाचे साहाय्यक अभियंते हणमंत कलादगी यांच्यासह इतर अधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत विविध ठरावांना मंजुरी
शहरातील पथदीपांची दुरुस्ती करणे, याचबरोबर नव्याने पथदीप बसविणे यासाठी महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा करून ती कामे पूर्ण करण्यासाठी ठराव मंजूर करण्यात आले. याचबरोबर अध्यक्षांच्या परवानगीने शहरातील विविध समस्या सोडविण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली होती. त्याला देखील बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. सोमवारी सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीची बैठक अध्यक्षा वाणी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी स्थायी समितीच्या सदस्यांनी अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या इतिवृत्तावर चर्चा केली. काही ठिकाणी तीन ते चार लाखांपर्यंतचा निधी लागणार आहे. पथदीपांची संख्या किती आहे, याची चाचपणी करण्यात आली. त्यानंतरच या निधीला स्थायी समितीमध्ये मंजुरी दिली. शहरातील अनेक भागांमध्ये पथदीप नसल्याने समस्या निर्माण होत आहेत. त्या ठिकाणी तातडीने पथदीप बसवावेत, एलईडी बल्ब वापरण्यासाठी लागणारा निधी संबंधित कंपनीला देताना एलईडी बल्बचा दर्जा तपासा, अशी सूचना करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे अनेक ठिकाणी विविध कामे अर्धवट आहेत. ती कामे पूर्ण करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करा, असे त्यांनी सांगितले.
गोवावेस कार्यालयातील चोरीबाबत चर्चा
गोवावेस येथील महानगरपालिकेच्या महसूल विभागाच्या कार्यालयामधील 4 लॅपटॉप तसेच काही कागदपत्रे चोरीला गेली आहेत. सोमवारी पहाटे ही घटना उघडकीस आली आहे. याबाबत अधिकाऱ्यांना विचारले असता सध्या त्याचा तपास सुरू आहे. किती लॅपटॉप गेलेत, याचबरोबर कोणती कागदपत्रे गायब झाली आहेत, याची तपासणी करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Home महत्वाची बातमी मनपा अर्थसंकल्प पूर्वतयारी बैठकीत समस्यांचा भडिमार
मनपा अर्थसंकल्प पूर्वतयारी बैठकीत समस्यांचा भडिमार
हॉटेल असोसिएशन, चेंबर ऑफ कॉमर्सच्या सदस्यांनी केल्या सूचना बेळगाव : महापालिकेच्या अर्थसंकल्प तयारीची पूर्वबैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स, हॉटेल असोसिएशन, याचबरोबर इतर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये विविध तरतुदी करण्याबाबतची मागणी केली. महापौर सविता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी उपमहापौर आनंद चव्हाण उपस्थित होते. महापालिकेच्या सभागृहामध्ये अर्थसंकल्पातील तरतुदींवर चर्चा करण्यासाठी […]