मनपाचा अर्थसंकल्प 27 रोजी

अखेर मनपा-नगरसेवकांना आली जाग : अर्थ-कर स्थायी समितीची आज बैठक प्रतिनिधी /बेळगाव महापालिकेचा अर्थसंकल्प मांडण्यास यावर्षी उशीर झाला आहे. यापूर्वीच हा अर्थसंकल्प मांडणे गरजेचे होते. मात्र विविध कारणांनी हा अर्थसंकल्प लांबणीवर पडला. त्यानंतर आता महानगरपालिकेला आणि नगरसेवकांनाही जाग आली असून मंगळवार दि. 27 रोजी अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. याबाबत कौन्सिल विभागाकडून नगरसेवकांना नोटीस पाठवून देण्यात […]

मनपाचा अर्थसंकल्प 27 रोजी

अखेर मनपा-नगरसेवकांना आली जाग : अर्थ-कर स्थायी समितीची आज बैठक
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेचा अर्थसंकल्प मांडण्यास यावर्षी उशीर झाला आहे. यापूर्वीच हा अर्थसंकल्प मांडणे गरजेचे होते. मात्र विविध कारणांनी हा अर्थसंकल्प लांबणीवर पडला. त्यानंतर आता महानगरपालिकेला आणि नगरसेवकांनाही जाग आली असून मंगळवार दि. 27 रोजी अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. याबाबत कौन्सिल विभागाकडून नगरसेवकांना नोटीस पाठवून देण्यात आल्याचे सांगण्यात आले. महापालिकेचा संपूर्ण लेखाजोखा पाहून हा अर्थसंकल्प सादर केला जातो. दरवर्षी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी विविध स्थानिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची पूर्वबैठक बोलाविली जाते. मात्र केवळ यावर्षी एकमेव बैठक झाली. या बैठकीमध्ये समस्यांचा भडिमार करण्यात आला. त्या समस्या सोडविण्यासाठी तरतूद करण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार आता अर्थ आणि कर स्थायी समिती तरतूद करणार का? हे देखील पहावे लागणार आहे. अर्थ आणि कर स्थायी समितीच्या अध्यक्षा वीणा विजापुरे यांनी बैठकीतील काही तरतुदी नमूद करून घेतल्या आहेत. याचबरोबर शुक्रवारी स्थायी समितीची बैठकही बोलाविण्यात आली आहे.
त्या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करून महापालिकेच्या सभागृहामध्ये अर्थसंकल्प सादर करावा लागणार आहे. त्याबाबत महापालिकेतील अधिकाऱ्यांनी तयारी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शहरामध्ये विविध समस्या भेडसावत आहेत. सत्ताधारीसह विरोधी गटातील नगरसेवकांनी विविध कामांसाठी निधीची तरतूद करावी, अशी जोरदार मागणी सर्वसाधारण बैठकीमध्ये केली आहे. आता अर्थसंकल्प सादर करताना या नगरसेवकांच्या मागणीची पूर्तता होणार का? हे देखील पहावे लागणार आहे. अर्थसंकल्प सादर केल्यानंतरच विकासाला गती येण्याची शक्यता आहे. यावर्षी कशाप्रकारे अर्थसंकल्प सादर होणार, याकडे शहरवासियांचे लक्ष लागून आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून येणारा निधी, याचबरोबर शहरातून जमा होणारा कर यावर हा अर्थसंकल्प अवलंबून आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत किती कर वसूल केला आहे, सरकारकडून येणारा कोणता निधी खर्च केला आहे, तर सध्या किती निधी शिल्लक आहे, हे देखील पहावे लागणार आहे. राज्य व केंद्र सरकारकडून येणारा निधी बऱ्याचवेळा थेट खर्च केला जातो. त्यामुळे जमा होणाऱ्या करावरच महापालिकेचा अर्थसंकल्प मांडावा लागणार आहे.