विरोधी आघाडीचा मतपेढीसमोर ‘मुजरा’ !

विरोधी पक्षांच्या आघाडीचा सध्या मुस्लीम समुदायाच्या ‘मतपेढी’समोर ‘मुजरा’ चाललेला आहे. या मतपेढीला खूष ठेवण्यासाठी ही आघाडी कोणत्याही थराला जाण्यास तयार आहे. तथापि, आम्ही कोणत्याही परिस्थितीत दलीत, आदीवासी आणि अन्य मागासवर्गीयांचे आरक्षण धर्माच्या नावावर अन्य लोकांना मिळू देणार नाही, असा ठाम निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बिहारमध्ये बक्सर, […]

विरोधी आघाडीचा मतपेढीसमोर ‘मुजरा’ !

विरोधी पक्षांच्या आघाडीचा सध्या मुस्लीम समुदायाच्या ‘मतपेढी’समोर ‘मुजरा’ चाललेला आहे. या मतपेढीला खूष ठेवण्यासाठी ही आघाडी कोणत्याही थराला जाण्यास तयार आहे. तथापि, आम्ही कोणत्याही परिस्थितीत दलीत, आदीवासी आणि अन्य मागासवर्गीयांचे आरक्षण धर्माच्या नावावर अन्य लोकांना मिळू देणार नाही, असा ठाम निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बिहारमध्ये बक्सर, काराकट आणि पाटलीपुत्र येथे पाठोपाठ तीन प्रचार सभांमध्ये भाषणे केली. विरोधी पक्षांची आघाडी सध्या लोकांच्या मनांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. तथापि, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे केंद्र सरकार कोणाच्याही दबावाखाली न येता आणि कोणालाही न घाबरता दहशतवाद आणि भ्रष्टाचार संपविण्यासाठी कार्यरत राहणार आहे, असे स्पष्ट प्रतिपादन त्यांनी केले.
बिहारी कामगारांचा अपमान
तेलंगणा, पंजाब, तामिळनाडू आदी राज्यांमध्ये बिहारी कामगारांचा अपमान केला जातो. कष्ट करुन आपले जीवन जगण्यासाठी तेथे गेलेल्या या कामगारांना सापत्नभावाची वागणूक तेथील प्रशासनही देते. या राज्यांमध्ये काँग्रेसची किंवा काँगेसच्या मित्रपक्षांची राज्ये आहेत. बिहारच्या मतदारांनी काँग्रेसला आणि विरोधी पक्षांच्या आघाडीला पराभूत करुन आपली अस्मिता दाखवून द्यावी. तसेच घटना परिवर्तन करुन हिंदू वंचितांचे आरक्षण मुस्लीमांना देण्याचा विरोधी आघाडीचा डाव उधळून लावावा. तसे न केल्यास अनेक मागासवर्गीय जातींना आरक्षणाची सुविधा गमवावी लागण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत विरोधी पक्षांच्या आघाडीचा सपशेल पराभव होणार हे निश्चित आहे. तरीही मतदारांनी सावध रहावे. आणि विरोधकांचा कुटील डाव उधळून लावावा, असे आवाहन त्यांनी केले.
बिहार ही क्रांतीची भूमी
सामाजिक न्याय या संकल्पनेला नवी दिशा देण्याचे कार्य बिहारच्या भूमीने केले आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अन्य मागासवर्गीय यांच्यावर आम्ही कधीही अन्याय होऊ देणार नाही. धर्माच्या आधारावर आरक्षण आपल्या राज्य घटनेला अमान्य आहे. तथापि, विरोधी पक्षांची आघाडी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अन्य मागासवर्गीयांचे आरक्षण काढून ते मुस्लीमांना धर्माच्या आधारावर देण्याची भाषा करीत आहे. मुस्लीमांच्या लांगूलचालनाचा कळस  विरोधी पक्षांच्या आघाडीने गाठला आहे. या देशातील सूज्ञ मतदार या आघाडीला तिची योग्य जागा दाखवून देणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.