Kolhapur News : खासदार शाहू छत्रपतींनी घेतले भवानीचे दर्शन!
प्रतापगडावर शाहू महाराजांचे स्थानिकांकडून वाद्यांच्या गजरामध्ये उत्स्फूर्त स्वागत
कोल्हापूर : कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी रविवारी प्रतापगडला भेट दिली. तेथे तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन त्यांनी देवीला अभिषेक केला.खासदार शाहू छत्रपती महाराज रविवारी सकाळीच किल्ल्यावर पोहोचले. भवानी मातेच्या मंदिरात त्यांनी विधीवत पूजा, अभिषेक करून किल्ल्यातील भवानी देवीचे आशीर्वाद घेतले.
यावेळी मंदिर परिसर ढोल-ताशांच्या निनाद आणि पारंपरिक घोषणांनी दुमदुमून गेले. खासदार शाहू छत्रपती महाराज प्रतापगडावर पोहोचताच गडावरील स्थानिक ग्रामस्थ, महिला मंडळ, तथा ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांचे स्वागत केले. प्रतापगड येथे कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी रविवारी प्रतापगडावर भवानी मातेचे दर्शन घेतले.
.
स्थानिकांनी शाहू महाराजांना भवानी मातेची परंपरा, मंदिर व्यवस्थापन, पर्यटन व्यवस्थांबद्दलची माहिती दिली. महाराजांनी सर्वांचे आभार मानत प्रतापगडाच्या विकासासाठी आवश्यक सहकार्य करण्याचा विश्वास दिला. सुट्टीचा दिवस असल्याने प्रतापगडावर भाविक आणि पर्यटकांचीही मोठी गर्दी होती. शाहू महाराजांच्या आगमनामुळे गर्दीत आणखी वाढ झाली. पर्यटकांनी महाराजांसोबत छायाचित्रे घेण्याचा प्रयत्न केला, काहींनी प्रतापगडाच्या इतिहासाबाबत त्यांच्याशी संवाद साधला.
गड संवर्धनासाठी पुढे या.
प्रतापगड हा केवळ दगड-मातीचा नाही. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा गह आहे. त्याची जपणूक, संवर्धन आणि स्वच्छता यासाठी प्रत्येकाने पुढे यायला हवे. – शाहू छत्रपती महाराज, खासदार, कोल्हापूर
