मंडलिकांना निवडणूकीचे रिंगण नवीन नाही : खा. संजय मंडलिक यांचा सूचक इशारा

उमेदवारी निश्चित असल्याचा केला पुनरुच्चार सरवडे प्रतिनिधी आपण विद्यमान खासदार असून महायुतीत शिंदे गटाच्या सर्वच्या सर्व १३ खासदारांची उमेदवारी निश्चित आहे. आपण शंभर टक्के लोकसभेच्या मैदानात असणार आहे. आपले कार्यकर्ते आतापासून कामाला लागले असून आता माघार घेणार नाही. आजवर मंडलिकांना संघर्षाशिवाय कधीच काही मिळालेले नसून निवडणूकीचे रिंगण आपल्याला नवीन नाही असा सूचक इशारा खासदार संजय […]

मंडलिकांना निवडणूकीचे रिंगण नवीन नाही : खा. संजय मंडलिक यांचा सूचक इशारा

उमेदवारी निश्चित असल्याचा केला पुनरुच्चार

सरवडे प्रतिनिधी

आपण विद्यमान खासदार असून महायुतीत शिंदे गटाच्या सर्वच्या सर्व १३ खासदारांची उमेदवारी निश्चित आहे. आपण शंभर टक्के लोकसभेच्या मैदानात असणार आहे. आपले कार्यकर्ते आतापासून कामाला लागले असून आता माघार घेणार नाही. आजवर मंडलिकांना संघर्षाशिवाय कधीच काही मिळालेले नसून निवडणूकीचे रिंगण आपल्याला नवीन नाही असा सूचक इशारा खासदार संजय मंडलिक यांनी दिला.
हेही वाचा >>>कोल्हापूरातून भाजप नेत्यांचा मंडलिकांच्या उमेदवारीला विरोध…मागल्या वेळी चुक झाल्याची कुपेकरांची कबुली
बिद्री ( ता. कागल ) येथे कै . हिंदुराव पाटील यांच्या कार्यक्रमानिमित्त आलेले खा. मंडलिक पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, महायुतीत जागेवरुन जरूर रस्सीखेच आहे. प्रत्येक पक्षाला उमेदवारी मागण्याचा आणि पक्ष विस्ताराचा हक्क आहे. कोल्हापूरातून विद्यमान खासदार म्हणून आपल्यालाच उमेदवारी मिळणार असून एकदा उमेदवारी मिळाल्यावर सर्वजण एक होऊन आपल्या विजयासाठी झटतील. ही निवडणूक पंतप्रधान मोदीजींचे हात बळकट करणारी असून आपल्या विजयाने याला हातभार लागणार आहे.
यावेळी माजी जि. प. सदस्य भूषण पाटील, माजी पं. स. सदस्य नंदकुमार पाटील, हमिदवाडाचे संचालक आनंदराव फराकटे, माजी उपसरपंच भरत पाटील आदी उपस्थित होते.
कुपेकरांनी माहिती घेऊन विरोध करावा
भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य संग्रामसिंह कुपेकर यांनी खा. मंडलिकांच्या उमेदवारीला विरोध केल्यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, कुपेकर हे आपले जुन्या काळातील सहकारी आहेत. मागील अडीच वर्षांच्या काळात महायुतीत एकत्र असल्यापासून कुपेकर कुठल्याही कामासाठी आपल्याला भेटलेले नाहीत. परंतू त्यांच्या वडिलांच्या सांगण्यावरुन मी त्यांच्या शेताचा रस्ता केला आहे. आपल्याबाबत त्यांचे काही गैरसमज असल्यास समोरासमोर बसून त्यांचे गैरसमज दूर करणार असून त्यांनी आपल्या कामाची आधी माहिती घेऊन मगच आपल्या उमेदवारीला विरोध करावा असे आवाहन खा. मंडलिकांनी केले.