खासदार अनंतकुमार हेगडे यांचा उद्या खानापूर दौरा

विकास कामांकडे दुर्लक्षामुळे तालुक्यातील मतदारांतून तीव्र नाराजी खानापूर : कारवार मतदारसंघाचे खासदार अनंतकुमार हेगडे हे बुधवार दि. 17 रोजी खानापूर तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दुपारी 3 वाजता येथील पक्ष कार्यालयात ते कार्यकर्त्यांसमवेत बैठक घेणार आहेत. त्यानंतर ते तालुक्यातील काही गावात भेटी देवून पुढील निवडणुकीसंदर्भात चर्चा करणार असल्याचे समजते. खासदार अनंतकुमार हेगडे यांनी खानापूर तालुक्याकडे पूर्णपणे […]

खासदार अनंतकुमार हेगडे यांचा उद्या खानापूर दौरा

विकास कामांकडे दुर्लक्षामुळे तालुक्यातील मतदारांतून तीव्र नाराजी
खानापूर : कारवार मतदारसंघाचे खासदार अनंतकुमार हेगडे हे बुधवार दि. 17 रोजी खानापूर तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दुपारी 3 वाजता येथील पक्ष कार्यालयात ते कार्यकर्त्यांसमवेत बैठक घेणार आहेत. त्यानंतर ते तालुक्यातील काही गावात भेटी देवून पुढील निवडणुकीसंदर्भात चर्चा करणार असल्याचे समजते. खासदार अनंतकुमार हेगडे यांनी खानापूर तालुक्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून पाचवेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. प्रत्येक निवडणुकीत खानापूर तालुक्यातून त्यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्क्य देण्यात आले होते. मात्र गेल्या 25 वर्षात खासदार अनंतकुमार हेगडे यांनी खानापूर तालुक्यासाठी कोणताही मोठा निधी अथवा प्रकल्प आणलेला नाही. मात्र भाजपच्या लाटेवर प्रत्येकवेळी खानापूर तालुक्याचे मतदान विजयासाठी कारणीभूत होते. गेल्या दहा वर्षात खानापूर तालुक्यात फिरकलेसुद्धा नाहीत. आमदार हलगेकरांच्या प्रचाराच्यावेळी त्यांनी तालुक्याकडे पाठ फिरविली होती.
तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या एकाही समस्येचे निराकारण त्यांच्याकडून करण्यात आले नाही. खासदार अनंतकुमार हेगडे आहेत. हेही खानापूर तालुक्याचे मतदार विसरुन गेले आहेत. तालुक्याचा विचार करता कारवार मतदार क्षेत्राचा शेवटचा तालुका म्हणून ओळखला जातो. खासदार अनंतकुमार हेगडे यांनी खानापूर तालुक्याच्या मतदारांना ग्रहित धरुन कोणतीच विकासकामे केलेली नाहीत. आता लोकसभा निवडणूक तोंडावर आल्याने मतदारांच्या तोंडाला पाणे पुसण्यासाठी हा दौरा आखला असल्याची चर्चा होत आहे. प्रत्येकवेळी निवडणुकीच्या आधी दोन महिने येऊन कार्यकर्त्यांना भूलथापा देवून आपली पोळी भाजून घेण्यात पटाईत असलेल्या खासदार अनंतकुमार हेगडेंना यावेळी खानापूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात विरोध होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नुकताच आरएसएसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी तालुक्याचा लोकसभा निवडणुकीसंदर्भात कानोसा घेण्यासंदर्भात दौरा केला होता. यावेळी सर्वसामान्य जनतेतून तसेच काही वरिष्ठ नेत्यांकडून अनंतकुमार हेगडेंबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आरएसएसच्या गोठातही अनंतकुमार हेगडेंबाबत नाराजीचा सूर उमटत आहे. त्यामुळे होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी अनंतकुमार हेगडेंबाबत वेगळा विचार होणार असल्याची चर्चा होत आहे.