मान्सूनची केरळात धडक
देशवासियांसाठी शुभवर्तमान : दोन दिवस आधीच देवभूमीत दाखल
पुणे : दुष्काळाने होरपळत असलेल्या देशवासियांसाठी शुभवर्तमान असून, नैत्य मोसमी वारे अर्थात मान्सून दोन दिवस आधीच गुऊवारी देवभूमी केरळात दाखल झाला. याबरोबरच मान्सूनने पूर्वोत्तर भारताचा बराचसा भागही व्यापला आहे. त्यामुळे पावसाकडे डोळे लावून बसलेल्या भारतवासियांना दिलासा मिळाला आहे. सर्वसाधारणपणे मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये सक्रिय होतो. यंदा तो दोन दिवस आधीच आला आहे. केरळमध्ये गेले काही दिवस दमदार पाऊस होत आहे. मौसमी वाऱ्यांना बळकटी मिळाल्याने हवामान विभागाने मान्सून देवभूमीमध्ये दाखल झाल्याचे जाहीर केले. गेल्यावषी 8 जूनला मोसमी पाऊस केरळात दाखल झाला होता. केरळबरोबरच मान्सूनने पूर्वोत्तर भारताचा काही भागही व्यापला आहे. या भागात मान्सून 5 जूनपर्यंत येत असतो. यंदा मात्र तो लवकर आला आहे. मान्सूनने जोरदार धडक मारत केरळचा 85 टक्के भाग व्यापला आहे. तसेच तामिळनाडूचा किंचितसा भाग, आसाम, मेघालय, त्रिपुराचा बराचसा भाग, संपूर्ण मिझोराम, मणिपूर, नागालँड, अऊणाचल प्रदेशचा काही भाग व बंगालचा उपसागर, अरबी समुद्राचा बराचसा भागही त्याने व्यापला आहे. अमिनी, कन्नूर, कोईमतूर, कन्याकुमारी, आगरतळा, धुब्री अशी मान्सूनची रेषा आहे.
यंदा 106 टक्के पाऊस
प्रशांत महासागरातील एल निनो कमजोर होत असून, मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात ला निनो उद्भवण्याचा अंदाज आहे. यामुळे मान्सून सरासरीच्या 106 टक्के राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. देशभर सर्वदूर चांगला पाऊस राहणार आहे. कृषी प्रवण क्षेत्र, मध्य, दक्षिण, उत्तर, पूर्व, पश्चिम व वायव्य भारतात पावसाची स्थिती समाधानकारक असेल. तर पूर्वोत्तर भारतात यंदा पावसाची ओढ राहील.
जूनच्या दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात पाऊस
महाराष्ट्रात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून प्रवेश करेल. सर्वसाधारणपणे 5 ते 7 जूनच्या आसपास मान्सून तळकोकणात येतो.
उष्णतेची लाट ओसरणार
देशाच्या वायव्य, उत्तर भागात असलेली उष्णतेची लाट ओसरणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. गुऊवारी राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश आदी भागात तीव्र उष्णतेची लाट आली होती. शुक्रवारपासून यात घट होणार आहे.
महाराष्ट्रात कमाल तापमान वाढणार
पुढील काही दिवसात महाराष्ट्रातील कमाल तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्मयता आहे.
दोन दिवसात कर्नाटकात
मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असून, पुढील 2-3 दिवसात तो केरळचा उर्वरित भाग, तामिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल, सिक्कीम व आसाम-मेघालयच्या उर्वरित भागामध्ये प्रवेश करण्याची शक्मयता आहे.
गेल्या काही वर्षातील मान्सूनच्या आगमनाच्या तारखा
2019 8 जून
2020 1 जून
2021 3 जून
2022 29 मे
2023 8 जून
2024 30 मे