मान्सून सक्रिय; रिपरिप सुरूच

मान्सून सक्रिय; रिपरिप सुरूच

दिवसभर ढगाळ वातावरण : सूर्यदर्शन नाही, हवेत गारठा
बेळगाव : शहरासह ग्रामीण भागात मान्सून सक्रिय झाला आहे. यंदा वेळेत मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. रविवारी शहरासह ग्रामीण भागात दुसऱ्या दिवशीही पावसाची रिपरिप सुरूच होती. तर काही भागात कमी जास्त प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्या. शनिवारी झालेल्या जोरदार पावसाने रविवारी बाजारपेठेसह विविध रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ थंडावलेली पाहावयास मिळाली. शनिवारी झालेल्या जोरदार पावसाने शहर जलमय झाले होते. शहराच्या मध्यभागासह उपनगरांमध्ये सर्वदूर रस्त्यावर, सखल भागात पाणीच पाणी झाले होते. त्यामुळे रस्त्यावरून वाहतूक काही काळ संथ झाली होती. पुन्हा रविवारी दुसऱ्या दिवशीही सकाळी जोरदार पावसाला प्रारंभ झाला. त्यानंतर दुपारी काही काळ पावसाने विश्रांती घेतली. तर काही भागांत दिवसभरच पावसाच्या सरी कोसळत होत्या. तर काही ठिकाणी पावसाची रिपरिप दिवसभर सुरूच होती.
झाडांची अन् घरांची पडझड
मागील दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाने विविध ठिकाणी घरांची आणि झाडांची पडझड झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी झाडे आणि फांद्या रस्त्यावर पडल्याने वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकारही घडले आहेत. तर काही ठिकाणी झाडे आणि विजेचे खांब घरावर कोसळल्याने मालमत्तेचेही नुकसान झाले आहे.
दिवसभर सूर्याचे दर्शन नाही
शनिवारपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे शनिवारी दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. ढगाळ वातावरणामुळे गारठा निर्माण झाला आहे. सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाल्याने सूर्यदर्शन होऊ शकले नाही. ढगाळ वातावरणामुळे सूर्याची किरणे दिसून आली नाहीत. त्यामुळे मोठ्या पावसाचा अनुभव पहिल्याच पावसात अनुभवयास मिळाला. जिल्ह्यात 1 ते 7 जून दरम्यान 31 मि.मी. पाऊस झाला आहे. तर आतापर्यंत एकूण 69 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
मागील एका आठवड्यात झालेल्या पावसाचा तपशील तालुका निहाय
तालुका पाऊस (मि.मि.)

अथणी 47.9
बैलहोंगल 79.4
बेळगाव 51.6
चिकोडी 58
गोकाक 89.5
हुक्केरी 64.1
खानापूर 56.2
रामदुर्ग 113.9
रायबाग 30.3
सौंदत्ती 113.5
कित्तूर 66.7
निपाणी 36.9
कागवाड 47.4
मुडलगी 64.5
यरगट्टी 105.4