मोदी श्रीरामाच्या विरुद्ध मार्गावर!

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची चित्रदुर्गमधील सभेत टीका प्रतिनिधी/ बेंगळूर हिंदू परंपरेत नेत्याला सत्याच्या मार्गावर जाणारा आणि सेवा भावनेने काम करणारा या दृष्टीकोनातून पाहिले जाते. प्रभू श्रीरामांनी देखील याच मार्गाने वाटचाल केली होती. मात्र, मागील दहा वर्षांपासून पंतप्रधानपदावर असलेले नरेंद्र मोदी यांनी याउलट राज्य केले आहे, अशी टीका काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या आणि स्टार प्रचारक प्रियांका […]

मोदी श्रीरामाच्या विरुद्ध मार्गावर!

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची चित्रदुर्गमधील सभेत टीका
प्रतिनिधी/ बेंगळूर
हिंदू परंपरेत नेत्याला सत्याच्या मार्गावर जाणारा आणि सेवा भावनेने काम करणारा या दृष्टीकोनातून पाहिले जाते. प्रभू श्रीरामांनी देखील याच मार्गाने वाटचाल केली होती. मात्र, मागील दहा वर्षांपासून पंतप्रधानपदावर असलेले नरेंद्र मोदी यांनी याउलट राज्य केले आहे, अशी टीका काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या आणि स्टार प्रचारक प्रियांका गांधी यांनी केली.
चित्रदुर्ग येथे मंगळवारी जुने माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर आयोजित काँग्रेसच्या ‘न्याय संकल्प रॅली’त त्या बोलत होत्या. देशाचा राजकीय वारसा प्रतिष्ठीत होता. आतापर्यंत एकाही पंतप्रधानाने हा मार्ग सोडला नाही. मात्र, आता या पदावर असलेले नेते अहंकाराने वावरत आहेत. त्यांना अधिकाराचा गर्व असून ऐषोरामाचे जीवन जगत आहेत. नैतिकतेशिवाय राजकारण करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
बिगर भाजपची सत्ता असणाऱ्या राज्यातील सरकार चुकीच्या पद्धतीने पाडली जात आहेत. नेत्यांना शेकडो कोटी रु. देऊन खरेदी केले जात आहे. प्रसारमाध्यमे हाच मास्टरस्ट्रोक समजून वृत्तांकन करत आहेत. हा असंवैधानिक आणि अनैतिक मार्ग आहे. याविषयी सवाल करण्याचे धाडस कोणामध्येही नाही. मोदी जगभरात प्रसिद्ध असल्याचे दाखविले जात आहे. इतके बलिष्ठ असणाऱ्या नेत्याकडून देशातील महागाई, बेरोजगारी आणि समस्या का कमी केल्या जात नाहीत, असा परखड प्रश्न प्रियांका गांधी यांनी उपस्थित केला.
जगात मोदींमुळे देशाचा लौकिक वाढल्याचे भासविले जात आहे. देशाचा विकास झाल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. मात्र, सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात काही बदल झाले आहे का, असा प्रश्न उपस्थित करताना प्रियांका गांधी म्हणाल्या, मोदींच्या दोन भांडवलदार मित्रांची संपत्ती वाढली आहे. त्या मित्रांनी जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. हीच मोदींची दहा वर्षांची कामगिरी असावी, अशी टिकाही त्यांनी केली.
विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न
केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल करणाऱ्या विरोधी पक्षांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. दोन मुख्यमंत्र्यांना अटक करून काँग्रेसचे बँक खाते गोठवण्यात आल्याचा आरोप प्रियांका गांधी यांनी केला. नरेंद्र मोदींनी निवडणूक रोख्यांच्या नावाखाली खासगी कंपन्यांकडून देणग्या गोळा केल्या आहेत. केंद्र सरकारच्या भीतीने अनेक कंपन्यांनी भाजपला लाभांशापेक्षा जास्त शेअर्स दान केले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे देणगीदारांची नावे समोर आली आहेत, असे त्या म्हणाल्या.