मिलॉर्ड! घराची खिडकी उघडण्याची अनुमती द्या
उच्च न्यायालयासमोर विचित्र याचिका : जम्मू-काश्मीरमधील घटना
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयासमोर एक अजब प्रकरण सुनावणीसाठी आले. एका व्यक्तीच्या याचिकेवर सुनावणी करत उच्च न्यायालयाने त्याला 5 वर्षांनी स्वत:च्या घराची खिडकी उघडण्याची अनुमती दिली आहे. याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या आदेशात याचिकाकर्ता कशाप्रकारे त्याच्या शेजाऱ्याच्या खासगीत्वात हस्तक्षेप करतोय हे स्पष्ट होत नसल्याचे न्यायाधीश अतुल श्रीधरन यांनी याप्रकरणी सुनावणी करताना म्हटले आहे.
याचिकाकर्त्याचा स्वत:च्या मालमत्तेवर, स्वत:च्या घराची खिडकी उघडण्याचा अधिकार आहे, भले मग ही खिडकी शेजारील घराच्या दिशेने का असू दे, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. खिडकी उघडल्याने याचिकाकर्त्याच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबाच्या खासगीत्वाला धक्का पोहोचेल असा युक्तिवाद करण्यात आला होता. प्रतिवादीचा खिडकी उघडल्याने खासगीत्वाचे उल्लंघन होईल हा तर्क पूर्णपणे निराधार आहे. कारण प्रतिवादीला स्वत:चे खासगीत्व निश्चित करण्यासाठी आवश्यक पाऊल उचलण्याचे स्वातंत्र्य आहे असे न्यायालयाने नमूद केले आहे.
प्रतिवादी स्वत:च्या खासगीत्वाची सुरक्षा करू शकतो, याकरता तो स्वत:च्या घरात पडदे लावून घेऊ शकतो किंवा कुंपणभिंतीची उंची वाढवू शकतो. यामुळे शेजारील घराच्या खिडकीतून त्याच्या घरात डोकावता येणार नसल्याची टिप्पणी उच्च न्यायालयाने केली आहे.
वादाची पार्श्वभूमी
बडगाम जिल्ह्यात राहणाऱ्या एका व्यक्तीने दिवाणी न्यायालयात याचिका दाखल करत शेजारील घराच्या खिडकीमुळे माझ्या खासगीत्वाला धक्का पोहोचत असल्याचा आरोप केला होता. तसेच ज्या पद्धतीने ड्रेनेज पाइप लावण्यात आले आहेत, त्यामुळे माझ्या मालमत्ताक्षेत्रात पाणी येत आहे. तसेच शेजारील घराच्या छतावरुन बर्फ माझ्या मालमत्ताक्षेत्रात पडत असल्याचे त्याने याचिकेत म्हटले होते. यानंतर दिवाणी न्यायालयाने शेजारी राहणाऱ्या व्यक्तीला याचिकाकर्त्याच्या घराच्या दिशेने असलेली खिडकी उघडण्यास मनाई केली होती. याप्रकरणी शेजारी राहणाऱ्या व्यक्तीते उच्च न्यायालयात धाव घेतली होती.