म्हैसाळ बंधारा पाण्याखाली ! कोल्हापूर- सांगली जिल्ह्याचा संपर्क तुटला
म्हैसाळ वार्ताहर
येथील कृष्णा नदी काठावरील कोल्हापूर जिल्ह्यातील कनवाड – व सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ या दोन्ही गावांना जोडणारा म्हैसाळ योजनेला वरदायी ठरलेला कोल्हापूर पध्दतीचा बंधारा यावेळी लवकर पाण्याखाली गेला आहे. यामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक व्यवस्था व ग्रामस्थांची ये जा पूर्णपणे बंद झाली आहे. यामुळे म्हैसाळ व शेजारच्या कर्नाटकात ये जा करणारे प्रवासी, ग्रामस्थ पर्यायी मिरज – म्हैसाळ – कागवाड आदी मार्गाचा अवलंब केला आहे. तर पलिकडच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कनवाड -हसुर कुटवाडआदि गावातील ग्रामस्थांनी शिरोळ , नृसिंहवाडी मार्गाचा वापर करावा लागतो आहे.गेल्या आठवड्यात झालेल्या मान्सून पुर्व पावसामुळे व गेले दोन दिवस वेळेत दाखल झालेला मान्सूनमुळे परीसरात मुसळधार पाऊस झाला ओढे नाले भरुन वाहू लागले असून यामुळे कृष्णा नदी पात्रात चांगलीच वाढ झाली आहे.त्यामुळे यावर्षी जून च्या सुरवातीलाच म्हैसाळ बंधारा पाण्याखाली गेला आहे.शिवाय वरून वाहत आलेल्या जलपर्णीमुळे ऐन उन्हाळ्यात कृष्णेचे पूर्ण पात्र जलपर्णीमुळे व्यापलेला होता.आता वाहत्या पाण्यामुळे संपूर्ण जलपर्णी पुढे वाहुन जात आहे.नदी जलपर्णी मुक्त झालेने ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.आता पूर्ण बंधारा पाण्याखाली गेला असून शेजारी पर्यायी बंधारा नव्याने उभारण्यात येत असून नदी पात्रात वाढत्या पाण्यामुळे हे काम ही बंद पडले आहे.