भ्रष्टाचार विरोधात बेळवट्टी ग्रामपंचायतवर मोर्चा
भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी : दलित संघटनेसह संतप्त ग्रामस्थांचे तीन तास ठिय्या आंदोलन
वार्ताहर /किणये
बेळवट्टी ग्रामपंचायतमध्ये विविध कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. विविध प्रकारची कामे राबविण्यात आली असल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र कामे झालीच नाहीत. ग्रामपंचायत पीडीओ व सदस्यांनी या पंचायतीमध्ये मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप बेळवट्टी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील दलित बांधव व नागरिकांनी केला आहे. या भ्रष्टाचाराच्या विरोधात बुधवारी सकाळी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्यात आला. या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप दलित बांधवांनी केला आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी म्हणून अनेक योजनांमधील निधी हडप करण्यात आला आहे. प्रशासनाचेही या प्रकाराकडे दुर्लक्ष झाले आहे. अशा तक्रारी इथल्या नागरिकांनी केल्या आहेत. अखेर संतप्त झालेल्या दलितबांधव व भागातील नागरिकांनी बुधवारी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन छेडले. विद्यार्थ्यांना संगणक मिळवून देण्यासाठी अॅडमिशन घेतल्याचे दाखविण्यात आले आहे. तसेच संगणक शिकवणीही करण्यात आली असल्याचे कागदोपत्री दाखवून पैसे काढण्यात आले आहेत. प्रत्यक्षात मात्र या पंचायत कार्यक्षेत्रातील एकाही विद्यार्थ्याला याचा लाभ मिळालेला नाही, अशी माहिती नागरिकांनी दिली.
पीडीओंकडून उडवाउडवीची उत्तरे
पीडिओ श्रीदेवी हिरेमठ यांना उपस्थित नागरिकांनी चांगलेच धारेवर धरले. ग्रामपंचायतसाठी मंजूर झालेला निधी गेला कुठे? असे नागरिकांनी ठणकावून विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच सदस्यांनी ठराव करूनच निधी काढला, असेही सांगितले. तर उपस्थित सदस्यांनी आम्हाला अधिक माहिती नाही. तुम्ही पीडीओ यांना विचारा, असे त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पुन्हा उपस्थित गावकरी अधिक भडकले होते. ग्रामपंचायतसमोर सुमारे दोन तास नागरिक बसून होते. अखेर तीनच्या दरम्यान तालुका पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनवाडकर व तालुका पंचायतीचे समाज खात्याचे अधिकारी महांतेश सवतगुंडी हे दाखल झाले. त्यांना ग्रामस्थांनी व दलित बांधवांनी भ्रष्टाचाराची संपूर्ण माहिती दिली व ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
चौकशीसाठी आठवड्याची मुदत
आपण या प्रकरणाची सविस्तर चौकशी करू, असे आश्वासन आंदोलनस्थळी दाखल झालेल्या अधिकाऱ्यांनी दिले. आंदोलनकर्त्या ग्रामस्थांनी सदर अधिकाऱ्यांना आठ दिवसांचा वेळ दिला आहे. आठ दिवसात भ्रष्टाचाराची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा याहून तीव्र आंदोलन करणार, असे सांगण्यात आले. यावेळी दलित संघटनेचे महेश कोलकार, मारुती उर्फ मुन्ना कांबळे, अरुण कांबळे, विलास कांबळे, नारायण नलावडे, एन. के. नलवडे, डॉ. अर्जुन पाटील, सुरेश नाईक, नारायण कांबळे, मधुकर देसाई, चेतन पाटील, विनोद कांबळे आदींसह बेळवट्टी, बाकनुर, इनाम बडस, धामणे एस. गावातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
संगणक उताऱ्यासाठी 15000 रुपये
या ग्रामपंचायतीमध्ये 50 रुपयाच्या संगणक उताऱ्यासाठी 15000 रुपये सर्वसामान्य नागरिकांकडून घेण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच घर बांधणीसाठी मेजरमेंट चकबंदीही पंचायतीच्या कार्यालयात बसूनच अंदाजे घालण्यात आली आहे. एससी एसटी फंड पूर्णपणे हडप करण्यात आला आहे, अशी तक्रारही केली आहे.
पाणी समस्या निवारण्यासाठी 60 लाखाचा निधी खर्च
स्वच्छता कामकाजाच्या नावाखालीही निधी लाटण्यात आला आहे. याचबरोबर पाणी समस्या निवारण्यासाठी म्हणून योजना राबविण्यात आली. यासाठी सुमारे 60 लाख रुपये इतका निधी खर्च करण्यात आलेला आहे. प्रत्यक्षात मात्र पाणी समस्येसाठी काम झाले नसल्याचा आरोपही यावेळी सदर नागरिकांनी केला.
Home महत्वाची बातमी भ्रष्टाचार विरोधात बेळवट्टी ग्रामपंचायतवर मोर्चा
भ्रष्टाचार विरोधात बेळवट्टी ग्रामपंचायतवर मोर्चा
भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी : दलित संघटनेसह संतप्त ग्रामस्थांचे तीन तास ठिय्या आंदोलन वार्ताहर /किणये बेळवट्टी ग्रामपंचायतमध्ये विविध कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. विविध प्रकारची कामे राबविण्यात आली असल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र कामे झालीच नाहीत. ग्रामपंचायत पीडीओ व सदस्यांनी या पंचायतीमध्ये मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप बेळवट्टी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील दलित बांधव व […]
