एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्याकडे बऱ्याच वाहनचालकांची पाठ

अंतिम मुदत नजीक : स्थानिक डिलर्सची संख्या कमी असल्याने चिकोडी-हुबळीला धाव बेळगाव : हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) नंबरप्लेट वाहनांना बसविण्याची अंतिम मुदत अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. परंतु, बेळगाव विभागात अद्याप अनेकांनी नव्या नंबरप्लेट बसविलेल्या नाहीत. त्यामुळे मुदतवाढ मिळणार की नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई होणार, हे पहावे लागणार आहे. 1 एप्रिल 2019 पूर्वी […]

एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्याकडे बऱ्याच वाहनचालकांची पाठ

अंतिम मुदत नजीक : स्थानिक डिलर्सची संख्या कमी असल्याने चिकोडी-हुबळीला धाव
बेळगाव : हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) नंबरप्लेट वाहनांना बसविण्याची अंतिम मुदत अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. परंतु, बेळगाव विभागात अद्याप अनेकांनी नव्या नंबरप्लेट बसविलेल्या नाहीत. त्यामुळे मुदतवाढ मिळणार की नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई होणार, हे पहावे लागणार आहे. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट सक्तीच्या करण्यात आल्या आहेत. नव्या नंबरप्लेटमध्ये वाहनाची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. याबरोबरच ही नंबरप्लेट काढता येणार नसल्याने चोरी, तस्करी असे प्रकार रोखण्यास मदत होणार आहे. नंबरप्लेटवर आधारकार्डप्रमाणे एक युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक देण्यात आला असून यातून संबंधित वाहनाची संपूर्ण माहिती मिळणे शक्य होणार आहे. एचएसआरपी नंबरप्लेट बसवून घेण्यासाठी 17 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अवघे काहीच दिवस शिल्लक असतानाही बेळगाव विभागात अद्याप बऱ्याच वाहनचालकांनी एचएसआरपी नंबरप्लेट बसवून घेण्याकडे दुर्लक्ष केले आहे. तसेच बेळगाव परिसरात वाहन कंपन्यांच्या डिलर्सची संख्या कमी असल्याने वेटिंगही मोठ्या प्रमाणात आहे. नंबरप्लेट बसवून घेण्यास विलंब होत आहे. एप्रिलपर्यंत एचएसआरपीसाठी वेटिंग असल्याने चिकोडी अथवा हुबळी येथील डिलरकडून नंबरप्लेट बसवून घ्यावी लागत आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने एचएसआरपी नंबरप्लेट नसलेल्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा यापूर्वीच दिला आहे. त्यामुळे 17 फेब्रुवारीनंतर कारवाईला सुरुवात होण्याची शक्यता आहे. एचएसआरपी नंबरप्लेट नसलेल्या वाहनचालकांवर 1 हजार रुपये दंडात्मक कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कालावधी वाढवून देण्याची मागणी वाहनचालकांमधून केली जात आहे.
वाहनचालकांनो फसवणूक टाळा
प्रादेशिक परिवहन विभागाने नेमून दिलेल्या वाहन कंपन्यांच्या डिलर्सलाच नंबरप्लेट बसविण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांनी आपली फसवणूक होऊ न देता www.siam.in किंवा transport.karnataka.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन नावनोंदणी करावयाची आहे. अनेक ठिकाणी एचएसआरपीच्या नावाखाली भलत्याच नंबरप्लेट करून दिल्या जात असल्याने वाहनचालकांची फसवणूक होत असल्याचे प्रकारही समोर आले आहेत.