माझ्यासह अनेक सहकारी तुमच्या पाठीशी!

शरद पवार यांचे उत्तम पाटलांच्याबाबत सूचक वक्तव्य : निपाणीत नागरी सत्कार-कृतज्ञता मेळावा निपाणी : राजकीय जीवनात मी आजवर 14 निवडणुका लढवल्या. एकही निवडणूक हरलो नाही. क्रिकेट मंडळाची निवडणूक मात्र एकदा हरलो. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष असताना आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपल्याच देशाच्या माणसाने माझा पराभव केला. पण एवढ्यावर आपण थांबलो नाही. पुढे आयसीसी […]

माझ्यासह अनेक सहकारी तुमच्या पाठीशी!

शरद पवार यांचे उत्तम पाटलांच्याबाबत सूचक वक्तव्य : निपाणीत नागरी सत्कार-कृतज्ञता मेळावा
निपाणी : राजकीय जीवनात मी आजवर 14 निवडणुका लढवल्या. एकही निवडणूक हरलो नाही. क्रिकेट मंडळाची निवडणूक मात्र एकदा हरलो. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष असताना आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपल्याच देशाच्या माणसाने माझा पराभव केला. पण एवढ्यावर आपण थांबलो नाही. पुढे आयसीसी या जागतिक क्रिकेट कौन्सिलचा अध्यक्ष झालो. पराभव झाला म्हणून काम थांबवायचे नाही. कोणतेही पद सहजासहजी मिळत नाही. उत्तम पाटलांनी साखर कारखानदारीच्या माध्यमातून शेतकरी आणि कामगारांसाठी चालवलेले काम मोठे आहे. त्यांनी असेच काम सुरू ठेवावे. माझ्यासह अनेक सहकारी त्यांच्या पाठीशी आहेत, असे सूचक वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांना कर्नाटक जैन असोसिएशन यांच्यावतीने जैनधर्मप्रभावक पुरस्कार व युवा नेते उत्तम पाटील यांना कर्नाटक राज्याचा सहकाररत्न पुरस्कार असे प्रतिष्ठित असे पुरस्कार मिळाल्याने त्यांचा शरद पवार यांच्या हस्ते नागरी सत्कार सोहळा आणि विधानसभा निवडणुकीत सहकार्य केलेल्या कार्यकर्ते व जनतेप्रती कृतज्ञता सोहळा मंगळवारी निपाणीत पार पडला. यावेळी ते बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रा. सुभाष जोशी तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उपस्थित होते.
लोकसभा लढविण्यासही उत्तम पाटील तयार
माजी आमदार प्रा. सुभाष जोशी म्हणाले, 2018 साली तत्कालीन काँग्रेस नेते व पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या घरी काँग्रेस उमेदवारीसाठी मी काका पाटील व उत्तम पाटील यांची बैठक झाली. यात काका पाटील यांनी माझ्यासमोर 2023 ला विधानसभा निवडणुकीचा उमेदवार तूच असशील, म्हणून उत्तम पाटलांना शब्द दिला. पण तो पाळला नाही. उत्तम पाटील यांचा विजय जवळ असताना भाजपने काही ठिकाणी उत्तमला मतदान न करता काँग्रेसला करा असे आवाहन केले. मात्र पहिल्याच निवडणुकीत 65 हजारावर मते घेणाऱ्या उत्तम पाटलांच्या पाठीशी जनता कायम असून आगामी लोकसभा निवडणूक ही लढवायला ते तयार आहेत असे स्पष्ट करताच उपस्थितांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला.