स्वीडिश कंपनीकडून भारतात रॉकेट लाँचरची निर्मिती

हरियाणाच्या झज्जरमध्ये उभारण्यात येणार प्रकल्प : 100 टक्के एफडीआय अंतर्गत काम सुरू वृत्तसंस्था/ चंदीगड भारताचे संरक्षणक्षेत्र आता झेप घेऊ लागले आहे. भारत आता स्वदेशी शस्त्रास्त्रांची निर्मिती करण्यासह संरक्षण क्षेत्रात गुंतवणूकही प्राप्त करत आहे. स्वीडनची कंपनी एसएएबीकडून भारतात कार्ल-गुस्ताफ एम4 शस्त्राची निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पाकरता 100 टक्के थेट विदेशी गुंतवणूक कंपनी करणार आहे. हरियाणाच्या […]

स्वीडिश कंपनीकडून भारतात रॉकेट लाँचरची निर्मिती

हरियाणाच्या झज्जरमध्ये उभारण्यात येणार प्रकल्प : 100 टक्के एफडीआय अंतर्गत काम सुरू
वृत्तसंस्था/ चंदीगड
भारताचे संरक्षणक्षेत्र आता झेप घेऊ लागले आहे. भारत आता स्वदेशी शस्त्रास्त्रांची निर्मिती करण्यासह संरक्षण क्षेत्रात गुंतवणूकही प्राप्त करत आहे. स्वीडनची कंपनी एसएएबीकडून भारतात कार्ल-गुस्ताफ एम4 शस्त्राची निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पाकरता 100 टक्के थेट विदेशी गुंतवणूक कंपनी करणार आहे. हरियाणाच्या झज्जरमध्ये कंपनीकडून प्रकल्प उभारण्यात येत आहे.
या प्रकल्पात पुढील वर्षापासून मेक इन इंडिया अंतर्गत कार्ल-गुस्ताफ एम4 चे उत्पादन सुरू केले जाणार आहे. कार्ल-गुस्ताफ एम4 अत्याधुनिक रॉकेट लाँचर असून याच्या माध्यमातून अनेक प्रकारचे गोळे डागले जाऊ शकतात.
केंद्र सरकारने मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये कार्ल-गुस्ताफ एम4 निर्मिती प्रकल्पाला मंजुरी दिली होती. याचरोबर एसएएबी 100 टक्के एफडीआयची मंजुरी मिळविणारी भारतातील पहिली विदेशी संरक्षण कंपनी ठरली होती. एसएएबीने झज्जरमध्ये एकूण 3.6 एकरच्या परिसरात प्रकल्प उभारणीस सुरुवात केली आहे.
कंपनीचा स्वीडनबाहेर कार्ल-गुस्ताफ एम4 साठीचा हा पहिला निर्मिती प्रकल्प असणार आहे. एसएएबीने 100 टक्के थेट विदेशी गुंतवणुकीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यावर एसएएबी एफएफव्हीओ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या नव्या कंपनीची स्थापना केली होती. ही नवी कंपनीच निर्मिती प्रकल्पाची मालक असेल आणि कार्ल-गुस्ताफ एम4 चे उत्पादन करणार आहे.
कार्ल-गुस्ताफसाठी स्वीडनबाहेरील पहिला प्रकल्प सुरू करण्याबद्दल अभिमान आहे. या उत्पादनाचा भारतीय सशस्त्र दलांसोबत एक मोठा इतिहास आहे. प्रकल्पात शस्त्रास्त्र प्रणालीचे उत्पादन पुढील वर्षापासून सुरू होणार असल्याचे एसएएबीचे वरिष्ठ उपाध्यक्ष गोरगेन जोहान्सन यांनी सांगितले आहे.