पॅनिक बटन-जीपीएस बसविण्यासाठी वाहनधारकांची लूट

मॅक्सीकॅब मालक संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन बेळगाव : केंद्रीय वाहतूक खात्याकडून राज्य वाहतूक खात्याला दिलेल्या आदेशानुसार मॅक्सीकॅब व मोटर कॅब (वाणिज्य) वाहनांना पॅनिक बटन व जीपीएस प्रणाली बसविण्याची सक्ती केली आहे. यामुळे वाहनधारकांना आर्थिक फटका बसत आहे. सरकारने सूट द्यावी, अशी मागणी उ. कर्नाटक मॅक्सीकॅब मालक संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली. केंद्राकडून दिलेल्या आदेशानुसार राज्य सरकार वाहनधारकांना पॅनिक बटन व […]

पॅनिक बटन-जीपीएस बसविण्यासाठी वाहनधारकांची लूट

मॅक्सीकॅब मालक संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : केंद्रीय वाहतूक खात्याकडून राज्य वाहतूक खात्याला दिलेल्या आदेशानुसार मॅक्सीकॅब व मोटर कॅब (वाणिज्य) वाहनांना पॅनिक बटन व जीपीएस प्रणाली बसविण्याची सक्ती केली आहे. यामुळे वाहनधारकांना आर्थिक फटका बसत आहे. सरकारने सूट द्यावी, अशी मागणी उ. कर्नाटक मॅक्सीकॅब मालक संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली. केंद्राकडून दिलेल्या आदेशानुसार राज्य सरकार वाहनधारकांना पॅनिक बटन व जीपीएसप्रणाली वाहनामध्ये बसविण्यासाठी सक्ती केली आहे. केंद्र सरकारकडून सहा हजार रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. मात्र राज्य सरकारच्या वाहतूक खात्याकडून आपल्या मर्जीतील केवळ 12 कंपन्यांना जीपीएस प्रणाली बसविण्याचे कंत्राट दिले आहे. सदर कंपन्याकडून वाहनचालकांची लूट चालविली आहे. मोटरकॅब वाहनात जीपीएस व पॅनिक बटन बसविण्यासाठी 14 ते 16 हजार रुपये आकारले जात आहेत. तर मॅक्सीकॅब वाहनामध्ये ही प्रणाली बसविण्यासाठी 24 हजार रुपये आकारले जात आहेत. त्यामुळे वाहनधारकांची लूट चालविली आहे.
प्रणाली बसविण्याची सक्ती करू नये
सरकारकडून नुकताच वाहनावर 3 टक्के कर वाढविला आहे. तसेच डिझेलचे दर वाढविल्याने वाहनधारकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या व्यवसायामध्ये बेरोजगार तरुण मोठ्या प्रमाणात आहेत. रोजगारासाठी हा व्यवसाय करीत आहेत. मात्र सरकारकडून वेगवेगळ्या माध्यमातून अशा वाहनधारकांची लूट केली जात आहे. सदर प्रणाली बसविण्याची सक्ती करण्यात येऊ नये, अशी मागणी संघटनेकडून करण्यात येत आहे.