मँचेस्टर सिटी सलग चौथ्यांदा विजेते

ईपीएल : शेवटच्या सामन्यात वेस्ट हॅमवर 3-1 गोलफरकाने मात, अर्सेनलला दुसरे स्थान वृत्तसंस्था/ मँचेस्टर मँचेस्टर सिटीने विक्रमी सलग चौथ्यांदा प्रिमियर लीगचे जेतेपद पटकावताना शेवटच्या सामन्यात वेस्ट हॅमचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव केला. सिटीने या मोसमात एकूण 91 गुण मिळविले तर अर्सेनलला 89 गुणांवर समाधान मानावे लागले. सलग चार वर्षे इंग्लिश फुटबॉलमधील अव्वल डिव्हिजन लीगचा चॅम्पियन […]

मँचेस्टर सिटी सलग चौथ्यांदा विजेते

ईपीएल : शेवटच्या सामन्यात वेस्ट हॅमवर 3-1 गोलफरकाने मात, अर्सेनलला दुसरे स्थान
वृत्तसंस्था/ मँचेस्टर
मँचेस्टर सिटीने विक्रमी सलग चौथ्यांदा प्रिमियर लीगचे जेतेपद पटकावताना शेवटच्या सामन्यात वेस्ट हॅमचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव केला. सिटीने या मोसमात एकूण 91 गुण मिळविले तर अर्सेनलला 89 गुणांवर समाधान मानावे लागले.
सलग चार वर्षे इंग्लिश फुटबॉलमधील अव्वल डिव्हिजन लीगचा चॅम्पियन होणारा मँचेस्टर सिटी हा पहिला संघ आहे. त्यांचे हे सात मोसमातील सहावे जेतेपद आहे. त्यांना दुसऱ्या स्थानावरील अर्सेनलकडून कडवा प्रतिकार झाला. अर्सेनलने आपल्या शेवटच्या सामन्यात एव्हर्टनचा 2-1 असा पराभव केला. फिल फॉडेनने पूर्वार्धात दोन गोल नोंदवून पेप गार्डिओलाच्या सिटी संघाने विजयाच्या दिशेने आगेकूच केली. मोहम्मद कुडुसने ओव्हरहेड किक मारत वेस्ट हॅमचा पहिला व एकमेव गोल नोंदवला. पण रॉड्रीने गोल नोंदवून सिटीची दोन गोलांची आघाडी कायम ठेवली. सिटीला जेतेपद निश्चित करण्यासाठी हा सामना जिंकणे अत्यंत आवश्यक होते.  या सामन्यात उतरण्याआठी त्यांनी दोन गुणांच्या आघाडीसह अव्वल स्थान मिळविले होते.
फॉडेनने दुसऱ्याच मिनिटाला शानदार गोल नोंदवून सिटीला आघाडीवर नेले. बर्नाडो सिल्वाकडून मिळालेल्या पासवर त्याने वेस्ट हॅमच्या जेम्स वार्ड प्राउजला हुलकावणी देत आगेकूच केली आणि बॉक्सच्या बाहेरून डाव्या पायाने मारलेला फटका जाळ्याच्या वरच्या कोपऱ्यातून आत गेला. इंग्लंडचा वर्षातील सर्वोत्तम फुटबॉलपटू ठरलेल्या फॉडेनने 18 व्या मिनिटाला आणखी एक गोल नोंदवून ही आघाडी 2-0 अशी केली. जेरेमी डोकूच्या क्रॉस पासवर त्याने हा गोल नोंदवला. 42 व्या मिनिटाला कुडुसने अॅक्रोबॅटिक ओव्हरहेड किक मारत वेस्ट हॅमचा पहिला गोल नोंदवला. या गोलनंतर वेस्ट हॅमला मुसंडी मारण्याची आशा वाटत होती. पण रॉड्रीने उत्तरार्धात जोरदार फटक्यावर सिटीचा तिसरा गोल नोंदवला. गोलरक्षक अल्फोन्स एरिओलाच्या हाताला चेंडू लागला होता. पण चेंडूला जाळ्यात जाण्यापासून तो रोखू शकला नाही.