मळेकरणी आमराईने घेतला मोकळा श्वास
निर्णयानुसार शुक्रवारीही पूर्णपणे यात्रा बंद : ग्राम पंचायतीच्या सर्व सदस्यांकडून पदयात्रा काढून नागरिकांमध्ये जागृती
वार्ताहर /उचगाव
उचगाव गावचे ग्रामदैवत मळेकरणी देवीच्या आमराईमध्ये मोठ्या प्रमाणात चाललेल्या पशुबळीवर पूर्णपणे निर्बंध घालण्यासाठी ग्राम पंचायतीने आणि ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयानुसार शुक्रवार दि. 31 मे रोजी यात्रा बंद ठेवण्यात आली होती. मात्र भाविकांनी देवीच्या मंदिरात येऊन विधीपूर्वक पूजाअर्चा, ओटी भरणे, गाऱ्हाणा घालणे असे सर्व कार्यक्रम सुरळीत चालू होते. या यात्रेत कायद्याने गुन्हा ठरत असलेल्या पशुहत्येवर मात्र पूर्णपणे निर्बंध बसविल्याने सर्वत्र ग्राम पंचायतसह ग्रामस्थांचेही अभिनंदन करण्यात येत आहे. शुक्रवारी बकरी बळी देण्याचा काहींनी प्रयत्न केला. त्यांची नाईलाजास्तव बकरी जप्त करण्यात आली व सायंकाळी परत करण्यात आली. शुक्रवारी सकाळी सहा वाजल्यापासूनच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मळेकरणी देवीच्या आमराईत कोणीही पशुहत्या करू नये, यासाठी पोलीस खात्याने काटेकोरपणे चोख पहारा ठेवला होता. मळेकरणी देवीच्या आमराईमध्ये सकाळपासूनच साहाय्यक पोलीस आयुक्त बेळगाव ग्रामीणचे बी. एम. गंगाधर, एईओ रामरेड्डी पाटील, एसीसी बसवराज यांनी खास भेट देऊन चौकशी केली. मंदिर परिसरात शांतता राखून सर्व भाविकांनी देवीचे दर्शन घ्यावे. या ठिकाणी कोणीही पशुहत्या करू नये. पशुहत्या हा कायद्याने गुन्हा आहे. यासाठी इथून पुढे या आमराईमध्ये आणि परिसरात कोणीही पशुहत्या करणार नाहीत आणि तशी केली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सर्वांना बजावून सांगितले.
मळेकरणी देवीच्या आमराईकडे अनेक भाविक टेम्पो, वडाप रिक्षा, ट्रॅक्स, कार अशा वाहनांतून बकरी घेऊन यात्रा करण्यासाठी येत होते. मात्र गावच्या वेशीतच बसस्थानकावर मळेकरणी देवीच्या आमराईकडे जाणाऱ्या रस्त्यावर ग्राम पंचायतीचे सर्व सदस्य आणि मोठ्या संख्येने जमलेल्या ग्रामस्थांनी त्यांना अडवून सर्वांना प्रेमाने सांगून परत पाठविले. सर्वांनी जाऊन देवीचे दर्शन घ्यावे. मात्र या ठिकाणी पशुहत्या करण्यावर बंदी घातल्याने कोणालाही बकरी मारण्यास परवानगी नाही. पूजा करून तुम्ही तुमच्या घरी जाऊन बकरी मारून ही यात्रा साजरी करावी, असे सांगण्यात येत होते. मळेकरणी देवीच्या आमराईमध्ये बेळगाव तालुक्मयाचे पशुखात्याचे अधिकारी डॉ. आनंद पाटील, तसेच त्यांचा पूर्ण कर्मचारी वर्ग, उचगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला वैद्याधिकारी डॉ. स्मिता गोडसे आणि कर्मचारी वर्ग तसेच बेळगाव तालुक्मयाचे तहसीलदार सिद्धराय भोसगी यांसह विविध खात्यांचे अधिकारीही या आमराईमध्ये सदर पशुहत्या थांबविण्याच्यादृष्टीने जनतेच्या आरोग्याच्यादृष्टीने सर्वांना समजावून सांगत होते. उचगाव ग्राम पंचायतीने भाविकांना पशुहत्या कायद्याने कसा गुन्हा आहे, तसेच यात्रेमुळे पसरणारी दुर्गंधी, आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, स्वच्छता, यात्रेमुळे होणारी वाहतुकीची कोंडी, युवती-महिलांची होणारी छेडछाड, तळीरामांमुळे शेतकऱ्यांना होणारा काचा-केरकचऱ्याचा त्रास, व्यसनात अडकणारी युवापिढी आणि त्यांच्यावर होणारे दुष्परिणाम अशा प्रकारचे माहिती फलक बनविले होते. ते फलक घेऊन सर्व ग्रा. पं. सदस्यांनी या ठिकाणी पदयात्रा काढून नागरिकांमध्ये जागृती केली.
मंदिराचा भाग वगळता सर्वत्र शांतता
मंगळवारी आणि शुक्रवारी बेळगाव-वेंगुर्ला या मार्गावर दुपारी एक ते सायंकाळी पाच यावेळेत बेळगाव-उचगाव फाट्यापर्यंत प्रवास करणे म्हणजे मोठी कसरतच होती. वाहतुकीच्या कोंडीतून मार्ग काढत वाहतूक करणे म्हणजे फार मोठे परिश्र्रमाचे काम होते. फाट्यावर आलेल्या व्यक्तीला आमराईत पोहोचण्यासाठी जवळपास तास ते दीड तास या गर्दीतून येण्यास वेळ लागत होता. तसेच उचगाव फाट्यावरून पुढे उचगावमार्गे कोवाड, नेसरी, आजरा, गडहिंग्लज या भागाला जाणाऱ्या अनेक प्रवाशांचीही मोठी कुचंबणा होत असे. मात्र शुक्रवारी हे चित्र पूर्णपणे पालटले व रस्ता मोकळा झाला. देवीच्या आमराईकडे जाणारा रस्ताही पूर्णपणे मोकळा आणि संपूर्ण आमराईमध्ये मंदिराचा भाग वगळता सर्वत्र शांतता होती.
ग्राम पंचायतकडून आवाहन
उचगाव ग्राम पंचायतच्यावतीने सर्व भाविकांना आवाहन करण्यात आले आहे की, इथून पुढे मळेकरणी देवीच्या आमराईत पशुहत्या करण्यावर पूर्णपणे निर्बंध लावण्यात आलेले आहेत. जर कोणी या ठिकाणी येऊन बकरी मारण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून दंडही लावण्यात येईल, याची सर्वांनी खबरदारी घ्यावी. तसेच गावातील मंगल कार्यालयांमध्येही मंगळवार, शुक्रवार देवीच्या नावाने कोणीही यात्रा करू नये, असे केल्यास सदर कार्यालयावर कायदेशीर कारवाई करून सील ठोकण्यात येईल. मात्र मंदिरात येऊन देवीला इतर सर्व विधी करण्यास कोणालाही बंधन नाही. नेहमीप्रमाणे सर्व भाविकांना येथे येण्याची पूर्णपणे मुभा राहील, असे कळविण्यात आले आहे. या यात्रेमध्ये पशुहत्या होऊ नये यासाठी सकाळी 6 वाजल्यापासून ग्राम पंचायतच्या अध्यक्षा मथुरा तेरसे, उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे, बुडाचे माजी अध्यक्ष युवराज कदम, माजी सदस्य बी. एस. होनगेकर, पीएलडी बँकेचे माजी चेअरमन पुंडलिकराव कदम-पाटील, ता. पं. माजी अध्यक्ष लक्ष्मणराव होनगेकर, संभाजी कदम, रामा कदम, अशोक हुक्केरीकर, मधू जाधव, गणपतराव पावले, सदानंद पावशे, मनोहर कदम, शशिकांत जाधव, मनोहर होनगेकर, रामा कांबळे यांच्यासह ग्रा. पं. सर्व सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
‘भारत लाईव्ह न्यूज मीडिया’चे खास आभार
उचगाव येथील मळेकरणी देवीच्या यात्रेमुळे ग्रामस्थांना होणारा त्रास, कुचंबणा यासंदर्भात ‘भारत लाईव्ह न्यूज मीडिया’ने आतापर्यंत चांगल्या प्रकारे वृत्तांकन करून या यात्रेवर कशा प्रकारे निर्बंध घालता येतील, याबाबत सविस्तर माहिती प्रसिद्ध करून सर्व वाचक, भाविकांना, नागरिकांना जागृत करण्यासाठी सहकार्य आणि मदत केल्याबद्दल उचगाव ग्रा. पं.च्यावतीने आणि गावातील जनतेने मन:पूर्वक आभार मानले आहे.
Home महत्वाची बातमी मळेकरणी आमराईने घेतला मोकळा श्वास
मळेकरणी आमराईने घेतला मोकळा श्वास
निर्णयानुसार शुक्रवारीही पूर्णपणे यात्रा बंद : ग्राम पंचायतीच्या सर्व सदस्यांकडून पदयात्रा काढून नागरिकांमध्ये जागृती वार्ताहर /उचगाव उचगाव गावचे ग्रामदैवत मळेकरणी देवीच्या आमराईमध्ये मोठ्या प्रमाणात चाललेल्या पशुबळीवर पूर्णपणे निर्बंध घालण्यासाठी ग्राम पंचायतीने आणि ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयानुसार शुक्रवार दि. 31 मे रोजी यात्रा बंद ठेवण्यात आली होती. मात्र भाविकांनी देवीच्या मंदिरात येऊन विधीपूर्वक पूजाअर्चा, ओटी भरणे, गाऱ्हाणा घालणे असे सर्व कार्यक्रम सुरळीत चालू होते. या यात्रेत कायद्याने गुन्हा ठरत […]