‘करा मनाचा निश्चय पक्का, सिंहावर मारा शिक्का’

सुदिन ढवळीकर यांची विधानसभची पंचवीस वर्षे : कोणत्याही माकडउड्या न मारता पक्ष टिकविला पणजी : एकाच पक्षात राहून आपल्या राजकीय कारकीर्दीची 25 वर्षे पूर्ण करणारे महाराष्ट्रवादी गोमंत पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर हे गोव्यातील अनेक राजकारण्यांसमोर एक वेगळ्या प्रकारचा आदर्श मांडून राहिले आहेत. 6 जून 1999 मध्ये त्यांनी गोवा राज्य विधानसभेत प्रथमच आमदारकीची शपथ घेतली होती. त्या घटनेस काल बुधवारी 25 […]

‘करा मनाचा निश्चय पक्का, सिंहावर मारा शिक्का’

सुदिन ढवळीकर यांची विधानसभची पंचवीस वर्षे : कोणत्याही माकडउड्या न मारता पक्ष टिकविला
पणजी : एकाच पक्षात राहून आपल्या राजकीय कारकीर्दीची 25 वर्षे पूर्ण करणारे महाराष्ट्रवादी गोमंत पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर हे गोव्यातील अनेक राजकारण्यांसमोर एक वेगळ्या प्रकारचा आदर्श मांडून राहिले आहेत. 6 जून 1999 मध्ये त्यांनी गोवा राज्य विधानसभेत प्रथमच आमदारकीची शपथ घेतली होती. त्या घटनेस काल बुधवारी 25 वर्षे पूर्ण झाली. गोव्याच्या राजकारणात अनेक आयाराम गयाराम आले किती आणि गेले किती ! अजूनही अनेक ज्येष्ठ नेते या पक्षातून त्या पक्षात उड्यात मारीत आहेत. अशा वेळी एका प्रादेशिक पक्षाच्या अस्तित्वाची लढाई लढत असताना विद्यमान वीजमंत्री ढवळीकर यांनी मात्र स्वत:चा असा एक वेगळा इतिहास निर्माण केला आहे.
मडकई या मतदारसंघामध्ये 1999 च्या निवडणुकीत तत्कालीन मगो अध्यक्ष सुरेंद्र शिरसाट यांनी त्यांना पक्षाची उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात होते भाजपचे नेते आणि स्थानिक आमदार श्रीपाद नाईक. मात्र त्यांना हरविण्याचे एक मोठे आव्हान ढवळीकर यांच्यासमोर होते. म गो आणि भाजपची युती 1999 च्या निवडणुकीमध्ये तुटली होती. भाजपने मगोबरोबर जाण्यास नकार दिला. 1994 च्या निवडणुकीत मगोचा हात पकडून भाजपने गोवा राज्य विधानसभेत चंचू प्रवेश केला होता. पहिल्याच युतीच्या या निवडणुकीत भाजपचे चार आमदार विजयी झाले होते. त्यात मनोहर पर्रीकर, दिगंबर कामत, श्रीपाद नाईक आणि नरहरी हळदणकर यांचा समावेश होता. 1999 च्या मध्यावधी निवडणुकीमध्ये भाजपने मगोबरोबर जाण्यास आयत्या वेळी पूर्णत: नकार दर्शविला. अशा वेळी अडचणीत आलेल्या मगोने आयत्यावेळी अनेक उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला त्यात सुदिन ढवळीकर यांचा समावेश आहे. ढवळीकर हे मगोचे समर्थक होते, परंतु ते भाजपला देखील मदत करीत होते. त्यांचे एकंदर कार्य पाहून त्यांना मगोने उमेदवारी दिली आणि त्यांनी श्रीपाद नाईक यांचा पराभव करून पहिल्यांदाच निवडणूक जिंकली.
मगो पक्ष सोडला नाही
जिंकून आल्यानंतर त्यांना काँग्रेस पक्षात जाण्यासाठी काही नेत्यांनी जोरदार आग्रह केला, परंतु त्यांनी मगो पक्ष सोडणार नाही असा निर्धार त्यावेळी व्यक्त केला. त्यानंतर अनेकवेळा ढवळीकर यांच्यावर विविध राजकीय पक्षांनी दबाव आणला. प्रसंगी मंत्रीपदही त्यांना गमवावे लागले. परंतु त्यांनी कोणत्याही परिस्थितीत भाजप किंवा काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यात  वेळोवेळी  नकार दर्शविला आणि मगो पक्षाचे गोवा विधानसभेत अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय पक्षांची संघर्ष करणे त्यांना भाग पडले.
अन्य पक्षांशी केली आघाडी 
मगो  पक्षातर्फे त्यांनी काहीवेळा काँग्रेसबरोबर तर काहीवेळा भाजपबरोबर आघाडी केली. मात्र कधीही कोणाच्याही दबावाखाली न येता मंत्रीपदावर देखील पाणी सोडले, परंतु मगोपक्ष सोडला नाही. आज आपल्याला अनेक अशी उदाहरणे दिसतात, ज्यांनी एका पक्षातून निवडून येऊन सत्तेसाठी दुसऱ्या पक्षामध्ये जाणे पसंत केले. वारंवार माकडउड्या मारणारे अनेक नेते गोव्यामध्ये आजही अस्तित्वात आहेत. परंतु ढवळीकर यांनी मात्र 1999 मध्ये ज्या पक्षातून आपण निवडून आलो त्या पक्षाशी कधीही प्रतारणा केली नाही.  त्यामुळे अनेक संकटांशी त्यांना सामोरे जावे लागले. खुद्द उपमुख्यमंत्री पदावरूनही त्यांना काढून टाकण्यात आले. मात्र त्यांनी संघर्ष करीत मगो पक्षाची निशाणी आणि मगो पक्षाचे अस्तित्व आज 25 वर्षानंतर देखील टिकवून ठेवले.
मगोचे अस्तित्व टिकविले
सुदिन ढवळीकर यांनी 1999 नंतर इसवी सन 2002, 2007 तसेच 2012, 2014 इसवी सन 2019 आणि अलीकडेच झालेल्या 2022 मधील निवडणुकीत जास्तीत जास्त प्रमाणात व सर्वाधिक मते मिळवण्याचा रेकॉर्डही स्वत:च्या नावावर तयार केला. राष्ट्रीय पक्षाने प्रादेशिक पक्ष संपवण्यासाठी विडा उचललेला होता. भाजप असू दे वा काँग्रेस पक्ष.या दोन्ही पक्षांनी मगोला संपवण्यासाठी अथक प्रयत्न केले. परंतु ‘करा मनाचा निर्धार पक्का आणि सिंहावरच मारा शिक्का’ हे तत्व लक्षात ठेवून सुदिन ढवळीकर यांनी आजतागायत मगोचे अस्तित्व गोवा विधानसभेत टिकविले आणि पक्षांतराचा कधी विचार देखील केला नाही.
मुख्यमंत्रीपदाची ऑफर धुडकावली…
एका राजकीय पक्षाने तर त्यांना मुख्यमंत्रीपदाची देखील ऑफर दिली मात्र त्यासाठी पक्षांतराची घातलेली अट त्यांनी मान्य केली नाही. परिणामी त्यांना मंत्रीपदावर देखील पाणी सोडावे लागले. अशा पद्धतीने आजकाल एखाद्या राजकीय पक्षातून आलेली व्यक्ती त्या पक्षाशी सलग 25 वर्षे बांधील राहते हा देखील एक दुर्मिळ योग असावा आणि गोव्यातील राजकीय माकडउड्या प्रकरणात सुदिन ढवळीकर हे अपवादात्मक ठरले. माकडउड्या न मारणाऱ्याबाबत गोव्यासाठी तो एक आधुनिक आदर्श ठरावा.