शहर परिसरात मकर संक्रांत साजरी

‘तिळगूळ घ्या गोड बोला’चा संदेश : सोशल मीडियावरही शुभेच्छा बेळगाव : तिळगूळ घ्या गोड बोला, असा स्नेहमय संदेश देत सोमवारी शहरात पारंपरिक पद्धतीने मकर संक्रांत साजरी करण्यात आली. यावेळी बालचमूंसह साऱ्यांनीच एकमेकांना तिळगुळाची देवाण-घेवाण करून शुभेच्छा दिल्या. विशेषत: सोशल मीडियावर भोगी आणि मकर संक्रांतीच्या शुभेच्छांचा वर्षाव पाहावयास मिळाला. या निमित्ताने तिळगूळ, भाकरी आणि विविध चटणी […]

शहर परिसरात मकर संक्रांत साजरी

‘तिळगूळ घ्या गोड बोला’चा संदेश : सोशल मीडियावरही शुभेच्छा
बेळगाव : तिळगूळ घ्या गोड बोला, असा स्नेहमय संदेश देत सोमवारी शहरात पारंपरिक पद्धतीने मकर संक्रांत साजरी करण्यात आली. यावेळी बालचमूंसह साऱ्यांनीच एकमेकांना तिळगुळाची देवाण-घेवाण करून शुभेच्छा दिल्या. विशेषत: सोशल मीडियावर भोगी आणि मकर संक्रांतीच्या शुभेच्छांचा वर्षाव पाहावयास मिळाला. या निमित्ताने तिळगूळ, भाकरी आणि विविध चटणी व पदार्थांची देवाण-घेवाण झाली. सुवासिनी महिलांनी एकमेकींना वाण देऊन मकरसंक्रांत साजरी केली. रविवारी भोगीनिमित्त विविध भाज्या, भाकरी आणि इतर पदार्थांना पसंती देण्यात आली होती. सोमवारी रंगीबेरंगी तिळगूळ, ज्वारी आणि बाजरीच्या भाकरीची रेलचेल पाहावयास मिळाली. घरोघरी बालचमूंसह साऱ्यांनी एकमेकांना तिळगुळ देऊन शुभेच्छा दिल्या.
ग्रामीण भागातही सोमवारी मकर संक्रांतीनिमित्त भाकरी, तिळगूळ आणि इतर पदार्थांची देवाण-घेवाण सुरू होती. अलीकडे तयार भाकरी, चटणी आणि इतर पदार्थांची मागणी वाढली आहे. त्यामुळे शहरात विविध चौकांमध्ये तिळगुळांबरोबर विविध प्रकारच्या भाकऱ्या, चटणी आणि इतर पदार्थांची विक्री झाली. सोमवारी शासकीय सुटी राहिल्याने साऱ्यांनी मकर संक्रांतीचा आनंद द्विगुणीत केला. रविवारी मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली होती. यंदा तिळगुळाच्या दरात वाढ झाली आहे. 40 रुपयाला किलो मिळणारे तिळगूळ 50-55 रुपये झाले आहेत. त्यामुळे यंदाच्या मकर संक्रांतीला महागाईचा चटका सहन करावा लागला. ग्रामीण भागातही तयार भाकरी, चटणी व इतर पदार्थांची लगबग पाहावयास मिळाली. मात्र, पारंपरिक पद्धतीने भाकरी व तिळगुळाची देवाण-घेवाण अधिक प्रमाणात दिसून आली.