कोल्हापूरच्या सर्वांगिण विकासाला प्राधान्य देणार : महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज यांची ‘तरूण भारत संवाद’ला ग्वाही

राजर्षी शाहूंचा समतेचा विचार संसदेत पोहोचवू; जलद कृतीशील विकासावर भर संतोष पाटील कोल्हापूर भविष्यात कोल्हापूरच्या सर्वांगिण आणि जलदपणे कृतीशील विकासावरच आपला भर राहील, राजर्षी शाहूंचा समतेच्या विचारांचा देशपातळीवर पुन्हा एकदा जागर करण्याची वेळ आली असून राजर्षींचा विचार संसदेत पोहचवू. शेतकरी प्रश्नांसह मराठासह विविध समाजाच्या आरक्षणासाठी आतापर्यंत रस्त्यावर लढा दिला, संसदेच्या व्यासपीठावर हे प्रश्न सुटणार असल्याने […]

कोल्हापूरच्या सर्वांगिण विकासाला प्राधान्य देणार : महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज यांची ‘तरूण भारत संवाद’ला ग्वाही

राजर्षी शाहूंचा समतेचा विचार संसदेत पोहोचवू; जलद कृतीशील विकासावर भर

संतोष पाटील कोल्हापूर

भविष्यात कोल्हापूरच्या सर्वांगिण आणि जलदपणे कृतीशील विकासावरच आपला भर राहील, राजर्षी शाहूंचा समतेच्या विचारांचा देशपातळीवर पुन्हा एकदा जागर करण्याची वेळ आली असून राजर्षींचा विचार संसदेत पोहचवू. शेतकरी प्रश्नांसह मराठासह विविध समाजाच्या आरक्षणासाठी आतापर्यंत रस्त्यावर लढा दिला, संसदेच्या व्यासपीठावर हे प्रश्न सुटणार असल्याने तिथे या प्रश्नांचे अभ्यासपूर्ण विवेचन करणार असल्याचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे, राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांनी ‘भारत लाईव्ह न्यूज मीडिया संवाद’ला विशेष मुलाखत दिली. यामध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे कारण, निवडणूक आल्यानंतर कोणत्या विषयाला असणारे प्राधान्य, सर्वसामान्यांशी कनेक्ट कसा राहील, हे स्पष्ट करत आपली राजकीय आणि सामाजिक वाटचाल स्पष्ट केली.
सामाजिक-राजकीय वाटचाल स्पष्ट करताना शाहू छत्रपती म्हणाले, गेल्या दोन तपामध्ये मी कोणत्याही निवडणुकीत सक्रीय नव्हतो. पण जनतेशी कनेक्ट कायम आहे. समाजकारणात आघाडीवर असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक झाली पाहिजे, ही आंतरिक भावना आहे. ‘शेतीपेक्षा मोठी कोणतीही उत्पादन संस्था नाही. धान्यापेक्षा कोणतेही मोठे उत्पादन नाही आणि शेतकऱ्यांपेक्षा मोठा कोणी देशभक्त नाही. सामाजिक चळवळी, सार्वजनिक कार्यक्रम, शेतकऱ्यांची आंदोलने, आरक्षण चळवळ अशा प्रत्येक टप्प्यावर मी जनतेसोबत काल होतो, उद्यापण राहणार आहे. महापुराची आपत्ती, कोरोना महामारी अशा संकटसमयी आपल्यापरीने लोकांना आधार दिला. मात्र या साऱ्या गोष्टीची कधी प्रसिद्धी केली नाही.
छत्रपती कुटुंबीय आणि कोल्हापूरकर यांच्यामध्ये एक वेगळं नातं आहे. काँग्रेसला मोठी परंपरा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या पक्षाने लढा दिला. संघर्ष केला, त्याग केला. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जाणारा पक्ष असल्याने राष्ट्रीय काँग्रेसची निवड केली. राजर्षी शाहू महाराजांचा समतेचा विचार दिल्लीपर्यंत पोहोचवणार आहे. यंदा निवडणूक लढवण्यामागील अनेक कारणे आहेत. देशातील सद्यस्थिती, संविधान आणि लोकशाहीला निर्माण झालेला धोका, यामुळे यंदा निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वय आणि संपर्काबाबत नाहक आरोप असल्याचे सांगत शाहू छत्रपती म्हणाले, माझ्या वयावरून विरोधकांकडून होणाऱ्या आरोपात काही तथ्य नाही. वय हा मुद्दा अतिशय गौण ठरतो. आपल्यातील उत्साह, काम करण्याची इच्छा महत्त्वाची आहे. कोल्हापूरसाठी मला काही तरी काम करण्याची इच्छा आहे. जिथे इच्छा असेल तिथे मार्ग नक्की दिसतो. गेल्या काही वर्षात सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहतो आहे. राजर्षी शाहूंचा विचार जनतेत पोहोचवण्यासाठी हजारो कार्यक्रमांना उपस्थित राहिलो. त्यामुळे मी उपलब्ध होत नाही, हा प्रचार खोटा आहे. यापुढेही मी कायम, जनतेसाठी उपलब्ध असणार आहे. मला भेटण्यात, संपर्क साधण्यात कोणाला कसल्याही आतापर्यंत अडचणी आलेल्या नाहीत. यापुढेही येणार नाहीत. मी नॉट रिचेबल नाही तर रिचेबल असणारा आहे. मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात संपर्क कार्यालय सुरू केले जाईल. पहिले संपर्क कार्यालय राधानगरी येथे असेल. 15 ऑगस्टला पहिले कार्यालय सुरू केले जाणार आहे. समाजातील कोणताही घटक अगदी हक्काने, माझ्याशी संवाद साधू शकेल. गेले महिनाभर जिह्याचा दौरा करत आहे. लोकसंपर्कात आहे. जनतेचा जो प्रतिसाद मिळत आहे, त्यावरून वयाचा मुद्दा हा गौण ठरला आहे.
राजर्षी शाहू महाराजांच्या समतावादी विचाराने जगाला प्रभावीत केले आहे. या विचारांचा जागर आता पुन्हा करण्याची वेळ आली आहे. कोल्हापूर जिह्यामध्ये विकासाची प्रचंड क्षमता आहे. उद्योग, कृषी, पर्यटन, धार्मिक, ऐतिहासिक, कला आणि क्रीडा अशा हर एक क्षेत्रात विकासाला पोषक वातावरण आहे. कोल्हापूर जिल्हा निसर्गसौंदर्यांने बहरलेला आहे. येथे पर्यटन वृद्धीला चालना मिळेल. कोल्हापूरच्या उद्योग-व्यवसायाला चालना देण्यासाठी देशातील मोठ्या शहरांशी कनेक्टिव्हिटी असायला हवी. याकरिता विमान सेवा आणि रेल्वे सुविधा आणखी भक्कम करायला हवी, त्यासाठी आपले प्रयत्न राहतील. भारतातील मोठी शहरे विमानसेवेने जोडू. उद्यमशीलता ही कोल्हापूरची खासियत आहे. मोठ्या इंडस्ट्रीजला जादा सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीला गती देऊ. कोल्हापुरात लघुउद्योजकांना औद्योगिक धोरणाचे लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे. कोल्हापुरात टॅलेंट प्रचंड असून आयटी पार्क विकसित करुन शहराचा कायापालट करण्यावर भर राहील.