महाशिवरात्र : शहर परिसरात बम बम भोलेचा गजर!

विविध धार्मिक कार्यक्रमांनी महाशिवरात्रीचे भक्तीभावाने आचरण : शिवमंदिरांमध्ये पहाटेपासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी : आज विविध ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन बेळगाव : ॐ नम: शिवाय चा जप, बम बम भोलेचा गजर, होम-हवन, महारुद्राभिषेक यासह विविध धार्मिक कार्यक्रमांनी शहर परिसरात महाशिवरात्रीचे अत्यंत भक्तीभावाने व श्रद्धेने आचरण करण्यात आले. शहरातील सर्व शिवमंदिरांमध्ये  पहाटेपासून रात्री उशीरापर्यंत भाविकांनी महादेवाच्या दर्शनासाठी गर्दी […]

महाशिवरात्र : शहर परिसरात बम बम भोलेचा गजर!

विविध धार्मिक कार्यक्रमांनी महाशिवरात्रीचे भक्तीभावाने आचरण : शिवमंदिरांमध्ये पहाटेपासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी : आज विविध ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन
बेळगाव : ॐ नम: शिवाय चा जप, बम बम भोलेचा गजर, होम-हवन, महारुद्राभिषेक यासह विविध धार्मिक कार्यक्रमांनी शहर परिसरात महाशिवरात्रीचे अत्यंत भक्तीभावाने व श्रद्धेने आचरण करण्यात आले. शहरातील सर्व शिवमंदिरांमध्ये  पहाटेपासून रात्री उशीरापर्यंत भाविकांनी महादेवाच्या दर्शनासाठी गर्दी केली. दक्षिण काशी असा मान लाभलेल्या कपिलेश्वर मंदिरामध्ये गुरूवारी रात्री कपिलेश्वर महादेव ट्रस्टतर्फे पूजन करण्यात आले. शुक्रवारी पहाटे 5 वाजल्यापासूनच पंचामृत अभिषेकासाठी भाविकांनी गर्दी केली. सकाळी 6 ते 10 वाजेपतर्यंत विशेष रुद्राभिषेकानंतर त्रिकाल पूजा करण्यात आली. पालकी प्रदर्शनानंतर महाआरती करण्यात आली.
शिषमहलचा देखावा
दरवर्षी पेक्षा यंदा कपिलेश्वर मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या अधिक होती. यंदा मंदिर पदाधिकाऱ्यांनीही भाविकांच्या सोयीला प्राधान्य दिले आहे. बेळगावचे कलाकार विनायक पालकर यांनी यंदा शिषमहलचा देखावा साकारला आहे. प्रवेशद्वाराजवळच असणाऱ्या श्री शंकराच्या भव्य मूर्तीला संपूर्ण रुद्राक्षाणी सजविण्यात आले आहे. मंदिर व्यवस्थापनाने यंदा उन्हाचा तडाखा लक्षात घेऊन भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रवेशद्वारापासून आतपर्यंत मॅट घातली आहे. यंदा मच्छे येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या स्वामी विवेकानंद बाल संस्कार केंद्रातील मुलांनी चप्पल स्टॅन्डची जबाबदारी स्वीकारली व चोखपणे पार पाडली. दरवर्षी वाढत जाणाऱ्या गर्दीचे स्वरुप लक्षात घेऊन लहान बाळांच्या मातांसाठी हिरकणी कक्ष तसेच रुग्ण वाहिका सेवाही उपलब्ध ठेवली. शनिवार दि. 9 रोजी दुपारी 12 ते 4 यावेळेत महाप्रसाद होणार आहे. महाशिवरात्रीचा मुख्य सोहळा यशस्वी होण्यासाठी व महाप्रसादाचे नियोजन करण्यामध्ये मंदिर व्यवस्थापन मंडळ, विश्वस्त मंडळ व कार्यकर्ते अखंड परिश्रम घेत आहेत.
ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय महाविद्यालयातर्फे महाशिवरात्रीनिमित्त शांतीयात्रा काढली. तत्पूर्वी भारतनगर येथील आश्रममध्ये झालेल्या धार्मिक कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून लेफ्टनंट जनरल पाटील, डॉ. आश्विनी सहभागी झाले होते. व्यासपीठावर ब्रह्माकुमारीच्या मिनाक्षी व अनुराधा बहन उपस्थित होत्या. त्यानंतर भारतनगर, नाथ पै, सर्कल, आयुर्वेदिक कॉलेजमार्गे, शहापूर, कोरे गल्ली ते शिवाजी उद्यान, कपिलेश्वर मंदिर, खडेबाजार, नाथ पै सर्कल या मार्गावरुन ही शांतीयात्रा जाऊन पुन्हा मुख्य आश्रमामध्ये सांगता झाली. दरम्यान बसवाण गल्ली येथील बसवण मंदिरामध्ये दररोज सायंकाळी 6 वाजता शिवदर्शन व आध्यात्मिक प्रर्दन दि. 9 पर्यंत आयोजित करण्यात आले आहे.
महर्षी रोड-टिळकवाडी
महर्षी रोड-टिळकवाडी येथील शिवलिंग मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त सकाळी 7 वाजता नित्या पूजा झाल्यानंतर दुपारी अभिषेक व महाआरती करण्यात आली. रात्री 8.30 वाजता पुन्हा महाआरती झाली. शनिवार दि. 9 रोजी सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत वरदशंकर पूजा होणार आहे. व त्यानंतर महाप्रसादाला सुरूवात होईल.
समर्थनगर
श्री एकदंत युवक मंडळ संचलित श्री दुर्गाशक्ती महिला मंडळातर्फे यंदाही समर्थनगर, विनायक मार्ग येथील महादेव मंदिरात महाशिवरात्रोत्सव साजरा करण्यात आला. गुरूवारी रात्री रुद्राभिषेक घालण्यात आला. ॐनम: शिवायचा जप करून जागरण करून विधिवत पूजा करून अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर महाआरती झाली. शनिवार दि. 9 रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
शिव पंचायतन् मंदिर
महाशिवरात्रीनिमित्त अध्यापक कुटुंबीयांच्या प्राचिन शिवपंचायतन् मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम झाले. सकाळी नामस्मरण झाल्यानंतर रुद्राभिषेक झाला. पौरोहित्य वे. शा. सं. नागेश देशपांडे यांनी केले. मंदिराचे विश्वस्त प्रकाश अध्यापक यांनी रुद्राभिषेक केल्यानंतर महाआरती करून जनकल्याणची प्रार्थना केली. यावेळी मंदिराचे सर्व विश्वस्त व समाजसेवक सुधीर मोरे उपस्थित होते.