वीस वर्षांपूर्वी हरवला…बेळगावात गवसला!

गुलबर्ग्याच्या बेपत्ता युवकाला सोपविले कुटुंबीयांच्या हाती बेळगाव : तब्बल 20 वर्षांपासून तो बेपत्ता होता. कुटुंबीयांनी तर तो आता जिवंत राहिला नाही, या निष्कर्षाप्रत पोहोचून त्याला शोध घेणेच बंद केले होते. मात्र, माळमारुती पोलिसांच्या तत्परतेने हा युवक पुन्हा एकदा त्याच्या कुटुंबात सुरक्षितपणे पोहोचला. 29 जून रोजी दुपारी रामदेव हॉटेलजवळ एक अनोळखी युवक चक्कर येऊन पडला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी 108 रुग्णवाहिकेतून […]

वीस वर्षांपूर्वी हरवला…बेळगावात गवसला!

गुलबर्ग्याच्या बेपत्ता युवकाला सोपविले कुटुंबीयांच्या हाती
बेळगाव : तब्बल 20 वर्षांपासून तो बेपत्ता होता. कुटुंबीयांनी तर तो आता जिवंत राहिला नाही, या निष्कर्षाप्रत पोहोचून त्याला शोध घेणेच बंद केले होते. मात्र, माळमारुती पोलिसांच्या तत्परतेने हा युवक पुन्हा एकदा त्याच्या कुटुंबात सुरक्षितपणे पोहोचला. 29 जून रोजी दुपारी रामदेव हॉटेलजवळ एक अनोळखी युवक चक्कर येऊन पडला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी 108 रुग्णवाहिकेतून त्याला सिव्हिल हॉस्पिटलला हलविले. तो आपले नाव सांगण्याच्याही मनस्थितीत नव्हता. केवळ आपण गुलबर्गा जिल्ह्यातील गोगीहाळचा राहणारा असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुलबर्गा पोलिसांशी संपर्क साधून गोगीहाळला चौकशी करायला सांगितली.
पोलिसांनी इस्पितळात दाखल झालेल्या युवकाचा फोटो दाखवून हा युवक याच गावचा आहे का? अशी विचारणा केल्यानंतर काही गावकऱ्यांनी पोलिसांना त्याच्या घरापर्यंत नेले. कुटुंबीयांनी त्याचा फोटो ओळखला. मोहन पिराप्पा बडीगेर (वय 46) रा. गोगीहाळ, ता. यड्रामी, जि. गुलबर्गा असे त्याचे नाव आहे. मोहनचा फोटो पाहून कुटुंबीयांना धक्काच बसला. त्यांनी लगेच माळमारुती पोलिसांशी संपर्क साधला. बुधवारी 3 जुलै रोजी मोहनचे काका लक्ष्मण बडीगेर बेळगावात आले. सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन मोहनला ओळखले. 20 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला मोहन पोलिसांच्या तत्परतेने आपल्या कुटुंबीयांकडे पोहोचला. बुधवारी त्यांनी त्याला गुलबर्ग्याला नेले आहे. या 20 वर्षांत मोहनविषयी कसलीच माहिती कुटुंबीयांना मिळाली नव्हती. त्यामुळे तो हयातीत नाही, या निर्णयापर्यंत ते पोहोचले होते. शेवटी हा युवक सुखरूप आपल्या घरी पोहोचला आहे.