लोंढा-मिरज रेल्वेमार्ग दुपदरीकरणाचे काम पूर्ण

186 कि.मी.चा दुहेरी रेल्वेमार्ग : लांबपल्ल्याच्या गाड्या क्रॉसिंगसाठी न थांबता वेळेत पोहोचणार बेळगाव : पुणे-लोंढा या रेल्वे मार्गाचा महत्त्वाचा भाग असणारा लोंढा-मिरज रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले. सांगली ते विजयनगर येथील दुपदरीकरणाचे काम मागील आठवड्यात पूर्ण केल्यानंतर मध्यरेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रेल्वे मार्गाची पाहणी केल्यानंतर हा मार्ग वाहतूकीस खुला आहे. त्यामुळे आता लांबपल्ल्याच्या […]

लोंढा-मिरज रेल्वेमार्ग दुपदरीकरणाचे काम पूर्ण

186 कि.मी.चा दुहेरी रेल्वेमार्ग : लांबपल्ल्याच्या गाड्या क्रॉसिंगसाठी न थांबता वेळेत पोहोचणार
बेळगाव : पुणे-लोंढा या रेल्वे मार्गाचा महत्त्वाचा भाग असणारा लोंढा-मिरज रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले. सांगली ते विजयनगर येथील दुपदरीकरणाचे काम मागील आठवड्यात पूर्ण केल्यानंतर मध्यरेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रेल्वे मार्गाची पाहणी केल्यानंतर हा मार्ग वाहतूकीस खुला आहे. त्यामुळे आता लांबपल्ल्याच्या गाड्या क्रॉसिंगसाठी न थांबता वेळेत पोहोचणार आहेत. मध्यरेल्वे व नैऋत्य रेल्वे या जोडणारा लोंढा-मिरज रेल्वेमार्गाचे नुकतेच दुपरीकरणाचे काम पूर्ण झाले. एकूण 181 कि.मी.चा हा रेल्वेमार्ग तयार करण्यात आला आहे. सात टप्प्यांमध्ये रेल्वेमार्गाचे काम पूर्ण करण्यात आले. डिसेंबर 2023 मध्ये 178 कि.मी.चे काम पूर्ण झाले होते. परंतु सांगली ते विजयनगर या दोन रेल्वे स्थानकांदरम्यान दुपदरीकरणाचे काम रखडले होते. अखेर या कामाला डिसेंबर अखेरनंतर गती मिळाली. 8 कि.मी.चा रेल्वेमार्ग अवघ्या आठ ते दहा दिवसांमध्ये पूर्ण करुन वाहतुकीस खुला करण्यात आला.
नैऋत्य रेल्वेला मध्यरेल्वेशी जोडण्याशी मिरज जंक्शन महत्त्वाचे आहे. बेळगावमधून जाणाऱ्या गाड्या मिरजमार्गे पुण्याच्या दिशेने अथवा पंढरपूरच्या दिशेने जातात. बेळगाव ते शेडबाळ रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण वेळेत पूर्ण झाले असले तरी पुढील काम रखडले होते. त्यामुळे मध्य रेल्वे व नैऋत्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी युध्दपातळीवर हे काम पूर्ण काम केले आहे. पहिल्या टप्प्यात चिकोडी ते घटप्रभा या 16 कि.मी. रेल्वे मार्गाच्या कामाला डिसेंबर 2019 पासून सुरूवात करण्यात आली. तत्कालीन केंद्रिय रेल्वे राज्य मंत्री कै. सुरेश अंगडी यांच्या प्रयत्नातून दुपदरीकरणाच्या कामाला सुरूवात झाली. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात चिकोडी-रायबाग-चिंचली-कुडची या 31 कि.मी. रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला सुरूवात झाली. त्यानंतर बेळगाव, देसूर, खानापूर 25 कि.मी., लोंढा-खानापूर 25 कि.मी., बेळगाव-सुळधाळ 30 कि.मी. सुळधाळ-घटप्रभा 30 कि.मी., कुडची-मिरज या 33 कि.मी.च्या रेल्वेमार्गाचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात आले. शेवटच्या टप्प्यातील सांगली-विजयनगर या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी मागील आठवड्यात मेघा ब्लॉक घेण्यात आला. मिरजमार्गे बेळगावला येणाऱ्या अनेक एक्स्प्रेस रद्द तर काहींच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. नव्या रेल्वेमार्गामुळे ताशी 110 कि.मी.वेगाने प्रवास करता येणार आहे. त्यामुळे लोंढा-मिरज या मार्ग यापुढे फास्टट्रॅकवर येणार आहे.
लोंढा-मिरज रेल्वेमार्गावर वेगाने एक्स्प्रेस धावणार
मिरज-लोंढा या रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाचे काम अखेर पूर्ण झाले. मागील आठवड्यात विजयनगर ते सांगली हा आठ कि.मी.चा रेल्वे मार्ग पूर्ण करण्यात आला. यापुढे लोंढा-मिरज रेल्वे मार्गावर वेगाने एक्स्प्रेस धावणार आहेत.
– डॉ. मंजुनाथ कनमाडी (जनसंपर्क अधिकारी नैऋत्य रेल्वे)