लोकसभा निवडणूक घोषणा आज

आदर्श आचारसंहिताही त्वरित लागू होणार : दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद वृत्तसंस्था / नवी दिल्ली लोकसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज शनिवारी केली जाणार आहे. या निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम घोषित करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद आयोजित करणार आहे. ही घोषणा झाल्यानंतर त्वरित आदर्श निवडणूक आचार संहिताही लागू केली […]

लोकसभा निवडणूक घोषणा आज

आदर्श आचारसंहिताही त्वरित लागू होणार : दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज शनिवारी केली जाणार आहे. या निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम घोषित करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद आयोजित करणार आहे. ही घोषणा झाल्यानंतर त्वरित आदर्श निवडणूक आचार संहिताही लागू केली जाईल.
केंद्रीय निवडणूक आयोगाने ही माहिती ‘एक्स’वरील संदेशात दिली आहे. ही निवडणूक किती टप्प्यांमध्ये आणि कोणत्या दिनांकापासून घेतली जाणार, यासंबंधी उत्सुकता आहे. साधारणत: निवडणूक कार्यक्रमाचे स्वरुप 2019 मधील निवडणूक कार्यक्रमाप्रमाणेच असेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
16 जूनपर्यंत कालावधी
विद्यमान लोकसभेचा कालावधी 16 जून 2024 पर्यंत आहे. या कालावधीच्या आधी नवी लोकसभा अस्तित्वात येणे आवश्यक आहे. त्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया आणि सरकारची स्थापना या कालावधीच्या आत होणे आवश्यक आहे. राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी काही महिन्यांपूर्वीपासूनच कंबर कसली आहे.
विधानसभा निवडणुकाही…
ओडिशा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका लोकसभेच्या निवडणुकीसह जाहीर होऊ शकतात. त्यांचाही कार्यक्रम आज शनिवारी घोषित केला जाईल. जम्मू-काश्मीरमध्येही बराच काळ विधानसभा निवडणूक झालेली नाही. तेथे लोकसभा निवडणुकीसह ती होणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. या केंद्रशासित प्रदेशाचा दौरा करुन आणि तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन त्यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल, असे प्रतिपादन मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी बुधवारी केले आहे.
राजकीय पक्षांची सज्जता
राजकीय पक्षांनी काही महिने पूर्वीपासूनच लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकांसाठी सज्जता चालविली आहे. भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत लोकसभा निवडणुकीसाठी 267 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. तर काँग्रेसनेही 39 नावे जाहीर केली आहेत. समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष आदी पक्षांनीही काही नावांची घोषणा आतापर्यंत केली आहे.
राज्यनिहाय संभाव्य टप्पे
उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये प्रत्येकी सहा ते सात टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तर महाराष्ट्रात ती चार ते पाच टप्प्यांमध्ये होण्याचा संभव आहे. राजस्थान, गुजरात, दिल्ली, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तामिळनाडू, केरळ, तेलंगणा आदी राज्यांमध्ये ती एकाच टप्प्यात होऊ शकेल. कर्नाटक, पंजाब, ओडिशा आदी राज्यांमध्ये ती प्रत्येकी दोन टप्प्यांमध्ये घेतली जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
कोठे, किती जागा ?
लोकसभेच्या निवडून येणाऱ्या एकंदर जागांची संख्या 543 आहे. बहुमतासाठी कमीतकमी 272 जागांची आवश्यकता आहे. आंध्र प्रदेश विधानसभेत 175, ओडिशात 147, अरुणाचल प्रदेशात 60 आणि सिक्कीममध्ये 40 अशा विधानसभांच्या जागा आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक झाल्यास तेथे साधारणत: 90 जागांवर निवडणूक घ्यावी लागणार आहे. आयोगाने कार्यक्रम घोषित केल्यानंतर प्रचाराला खरा रंग चढणार आहे. प्रमुख संघर्ष भारतीय जनता पक्ष प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि ‘इंडी’ आघाडी यांच्यात होईल.
प्रचाराला चढणार खरा रंग
ड आज शनिवारी निवडणूक घोषणा झाल्यानंतर प्रचाराला चढणार खरा रंग
ड राजकीय पक्षांची तयारी काही महिन्यांपूर्वीपासूनच, उमेदवारांकडून लगबग
ड मुख्य संघर्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि विरोधकांच्या आघाडीतच
ड निवडणूक घोषणापत्रांना अंतिम रुप देण्यासाठी राजकीय पक्षांचा आटापिटा