समाजहितासाठी साहित्य-संवाद महत्त्वाचा

संमेलनाध्यक्ष प्रा. दिनेश पाटील यांचे प्रतिपादन : कडोली येथे 39 वे मराठी साहित्य संमेलन उत्साहात आण्णाप्पा पाटील- मोहन कुट्रे /कडोली भाषावार प्रांतरचनेनंतर समस्त सीमाबांधव आपल्या न्याय हक्कासाठी झगडताना दिसत आहेत. तुम्ही सर्व सीमाबांधव पेचात सापडलेल्या प्रदेशात राहूनही आपली मराठी भाषा आणि संस्कृती टिकविण्यासाठी प्रयत्न करत आहात. संघर्षातूनही आपल्या भाषेसाठी तुमचा लढा सुरू आहे. साहित्य संमेलनाच्या […]

समाजहितासाठी साहित्य-संवाद महत्त्वाचा

संमेलनाध्यक्ष प्रा. दिनेश पाटील यांचे प्रतिपादन : कडोली येथे 39 वे मराठी साहित्य संमेलन उत्साहात
आण्णाप्पा पाटील- मोहन कुट्रे /कडोली
भाषावार प्रांतरचनेनंतर समस्त सीमाबांधव आपल्या न्याय हक्कासाठी झगडताना दिसत आहेत. तुम्ही सर्व सीमाबांधव पेचात सापडलेल्या प्रदेशात राहूनही आपली मराठी भाषा आणि संस्कृती टिकविण्यासाठी प्रयत्न करत आहात. संघर्षातूनही आपल्या भाषेसाठी तुमचा लढा सुरू आहे. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून साहित्याचा जागर या भागात सुरू आहे. आपल्या मातृभाषेसाठी तुमचा इतक्या वर्षांचा संघर्ष इतिहासात नोंद करण्यासारखाच आहे. साहित्य संमेलनासाठी संपूर्ण गाव एकत्र येऊन आपल्या पुढील पिढीला संत, साहित्याची शिकवण देण्यासाठी धडपडताना दिसतो. समाजहितासाठी साहित्य संवाद महत्त्वाचा आहे, असे मनोगत वारणानगर येथील प्रा. दिनेश पाटील यांनी व्यक्त केले. कडोली येथील मराठी साहित्य संघ यांच्यावतीने 39 व्या मराठी साहित्य संमेलनात प्रा. दिनेश पाटील संमेलनाध्यक्ष या नात्याने बोलत होते. रविवारी सकाळी दूरदुंडेश्वर विरक्त मठाचे आवार, स्वामी विवेकानंदनगरी, कडोली येथे मोठ्या उत्साहात मराठी साहित्य संमेलन झाले. या संमेलनाला साहित्यप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
दिनेश पाटील पुढे म्हणाले, कोरोनानंतरचा काळ हा कठीण काळ आला आहे. पुस्तक वाचणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. सामाजिक माध्यमांचा जमाना आला आहे. मात्र, पुस्तकांशिवाय माणसाला माणुसकीचे ज्ञान होत नाही. यासाठी ग्रंथ, पुस्तकांचे वाचन झालेच पाहिजे. अलीकडे आई-वडील, मुलगा, शिक्षक, विद्यार्थी, शेजारी या सर्वांमध्ये संवाद कमी झालेला पाहावयास मिळत आहे. त्यामुळे एकमेकांशी संवाद होणे अतिशय महत्त्वाचे आहे. अलीकडे बदल हा प्रचंड वेगाने होताना दिसत आहे. इंटरनेटचा वापर अधिक होऊ लागला आहे. याचा थोड्या प्रमाणात फायदा आहे तर बहुतांश प्रमाणात दुष्परिणाम होताना दिसत आहे. सोशल मीडियावर सतत राहणाऱ्यांमध्ये द्वेश, हिंसा व नैराश्य वाढलेले दिसून येत आहे. माणसाने समाधानी जीवन जगण्यासाठी इंटरनेटपासून थोड्याबहुत प्रमाणात दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. फेसबुकवर मैत्री अधिक प्रमाणात मात्र प्रत्यक्षात साथीला दोन-चार मित्रही अनेकांकडे नसतात, अशी परिस्थिती आहे. वाचन, लेखन यावर अधिक भर दिला पाहिजे. गाव तिथे ग्रंथालय ही चळवळ रुजविण्यासाठी सर्व स्तरांतून प्रयत्न केले पाहिजेत. सर्वसामान्य लोकांचे जीवनमान साहित्यातून समाजासमोर मांडले पाहिजे. मराठी भाषा ज्ञानभाषा झाली पाहिजे. या भाषेचे संवर्धन काळाची गरज बनली आहे, असे सांगितले. पूर्वी महिलांकडून व्यक्त होण्यासाठी जात्यावरची गाणी म्हटली जात होती. अलीकडे ही परंपरा लुप्त होताना दिसत आहे. आधुनिक युगात मराठी भाषा टिकविणे महत्त्वाचे ठरणार आहे. मराठीबरोबरच इतर महान साहित्यिकांची पुस्तके मराठीत अनुवाद करायला हवीत. तरुणांनी निराश न होता संकटांचा सामना केला पाहिजे. येणाऱ्या प्रत्येक आव्हान, संकटांचा सामना करण्यासाठी साहित्य, पुस्तके महत्त्वाची ठरतात. त्यामुळेच गावोगावी ग्रंथालय क्रांती झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. याचबरोबर सयाजीराव गायकवाड यांच्या जीवनचरित्रावर तसेच महाराष्ट्रातील विविध साहित्यिकांची साहित्यासाठी असलेली चळवळ याबद्दल सविस्तर माहिती त्यांनी दिली.
संमेलनाचे दुसरे सत्र
भारताचा गौरवशाली इतिहास समजून घेणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. इतिहास समजून घेऊन त्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे. इतिहासाबरोबरच वास्तवाची जाणीव ठेऊन तरुणांनी काम केले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रातून प्रत्येकाला जगण्याची दिशा मिळते. साहस आणि स्फूर्ती निर्माण होण्यासाठी इतिहास समजून घ्यायला हवा, असे संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात ठाणे येथील संदीप कदम यांनी सांगितले.
वृद्धाश्रमांची वाढती संख्या ही शोकांतिका
दुसऱ्या सत्राला सुरुवात करतानाच जय जिजाऊ, जय शिवराय असा जयघोष त्यांनी केला. सर्व साहित्यप्रेमी नागरिकांनाही हा जयघोष करण्यासाठी सांगितले. यावेळी सारेजण हात उंचावून जिजाऊ आणि शिवरायांच जयघोष करताना दिसून आले. ते पुढे म्हणाले, गेल्या 39 वर्षांपासून साहित्य संमेलनाचे शिवधनुष्य घेऊन तुम्ही कार्य करत आहात. ही परंपरा टिकविण्यासाठी साऱ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. आपली मातृभाषा तुम्ही जपताय ही अभिमानाची गोष्ट आहे. या पवित्र भूमीमध्ये आपला जन्म झाला असल्याने देशाचा गौरवशाली इतिहास जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. अन्यायाच्या विरोधात बोलतो तो वारकरी आहे. त्यामुळे जिथे चुकतं तिथे वारकऱ्यांनीही बोलायलाच हवं. संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांनी समाजाला दिलेला संदेश महत्त्वाचा आहे. तरुणांनी आयुष्यभर आपल्या आई-वडिलांना सन्मान द्यावा. त्यांची मान कधी खाली घालावी लागणार नाही याची काळजी घ्यायला हवी. सध्याच्या युगात वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे. ही शोकांतिका आहे. महापुरुष हे कोणत्याही जाती-धर्माचा द्वेष करत नव्हते. त्यामुळे महापुरुषांबद्दल वक्तव्य करण्यापूर्वी अभ्यास केला पाहिजे. इंजिनिअरिंग, वैद्यकीय शिक्षणाचा खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नाही. त्यामुळे सरकारने इंजिनिअरिंग व वैद्यकीय शिक्षणासाठी सहकार्य केले पाहिजे. ध. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रातील विविध किस्से तसेच संभाजी महाराजांचे बलिदान याबद्दलची माहिती कदम यांनी आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून दिली.
ग्रंथदिंडी अमाप उत्साहात
ढोलताशांचा गजर, भजनाच्या सुमधूर आवाजात, पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी घडविलेले विविध लोककलांचे दर्शन, साहित्यिक आणि साहित्य रसिकांच्या उदंड प्रतिसादात 39 व्या कडोली मराठी साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी उत्साहात पार पडली. गावच्या वेशीत अनुसया कलाप्पा मायाण्णा यांच्या हस्ते पालखी पूजन झाल्यानंतर ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. कलमेश्वर भजनी मंडळ आणि श्री कलमेश्वर वारकरी भजनी मंडळाच्या सुमधूर भजनानी ग्रंथदिंडीमध्ये तल्लीनता निर्माण झाली होती. प्राथमिक मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषेत टिपरी, लेझीम आणि लाठीमेळ्याचे सादरीकरण केले. दिंडीत कवी डॉ. स्वप्निल चौधरी, कथाकार समृद्धी पाटील, वैभवी मोरे, कुशल गोरल, श्रीमती शांता यलाप्पा होनगेकर, गजानन सावंत, सतीश सावंत, प्राजक्ता संभाजी होनगेकर, उद्योजक अनिल कुट्रे, डॉ. प्राजक्ता टुमरी, रवी होनगेकर, बाबुराव नेसरकर, बाबुराव गौंडाडकर आदी उपस्थित होते.
ग्रंथदिंडी पेठ गल्ली मार्गे येवून श्री दुरदुंडेश्वर मठात आल्यानंतर सुवासिनीनी आरती ओवाळून साहित्यिक आणि मान्यवरांचे स्वागत केले. ग्रंथ दालनाचे उद्घाटन विराज फायनान्सियल सर्व्हिस अँड वेल्थ मॅनेजमेंटचे वदान्य चैतन्य दास यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर कै. यलाप्पा लक्ष्मण होनगेकर संमेलन मंडपाचे उद्घाटन शांता यलाप्पा होनगेकर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन सतीश सावंत, सरस्वती प्रतिमा पूजन क्रीयाकार आर्किटेक्ट फर्मच्या प्राजक्ता होनगेकर तसेच विविध प्रतिमांचे पूजन उद्योजक अनिल कुट्रे, डॉ. प्राजक्ता टुमरी, रवी होनगेकर यांच्या हस्ते तर सांगाती व्यासपीठाचे उद्घाटन विठ्ठलराव सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन आणि स्वागत गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. कडोली मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष अरुण पाटील यांनी प्रास्ताविक करून गेल्या 38 वर्षांपासून सुरू असलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या कार्याचा आढावा घेतला. स्वागताध्यक्ष म्हणून शिवराज कालकुंद्रीकर हे उपस्थित होते. संमेलनाचे उद्घाटन अशोक गुंडू शिरोळे यांच्या हस्ते झाले. सूत्रसंचालन सुधीर कुट्रे यांनी केले तर आभार बसवंत शहापूरकर यांनी मानले.
कथाकथनातून नवोदितांनी दिला सामाजिक संदेश
संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात बेळगाव परिसरातील नवोदितांचे कथाकथन झाले. यामध्ये बालिका आदर्शची समृद्धी पाटील, बेळगुंदी येथील बालवीर विद्यानिकेतनची   वैभवी मोरे, मराठी विद्यानिकेतनची कुशल गोरल यांचा सहभाग होता. समृद्धी पाटील हिने ‘गुरुजी’ या कथेत ग्रामीण भागातील गुरुजी, मुलांचा खोडकरपणा आणि शिक्षण व्यवस्था मांडली. रेल्वेतून प्रवास करीत असताना भिकारी व्यापाऱ्याकडे भीक मागतो, त्यावेळी तुम्हीही दुसऱ्यांना काहीतरी देत जा, असा सल्ला व्यापाऱ्याने भिकाऱ्याला दिला. यानंतर सदर भिकारी भीक मागितल्यानंतर प्रत्येकाला फूल देऊ लागला. यातून भिकाऱ्याच्या जीवनात परिवर्तन झाले. त्यांनंतर लवकरच तो फुलांचा व्यापारी बनला. जीवनात कोणत्या गोष्टीला महत्त्व आहे, आपण कोण आहोत, याची जाणीव ठेऊन काम केले पाहिजे, असे ‘व्यापारी व भिकारी’ या कथेतून वैभवी मोरे हिने सांगितले. प्रत्येक गोष्टीकडे बघून आपण आपला दृष्टिकोन बदलायला हवा, असे तिने सांगितले. याचबरोबर मास्तर आणि राम यांची सायकल ही कथा कुशल गोरल हिने सादर केली.