भारत-पाकने सोपविली कैद नागरिकांची यादी

भारत-पाकने सोपविली कैद नागरिकांची यादी

2008 च्या करारानुसार उचलले पाऊल : ताब्याती#socialल मच्छिमारांबद्दलही दिली माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि पाकिस्तानने परस्परांना कैदेतील नागरिक आणि ताब्यात घेण्यात आलेल्या मच्छिमारांच्या नावांची यादी पुरविली आहे. 2014 पासून आतापर्यंत पाकिस्तानने 2,639 भारतीय मच्छिमार आणि कैदेतील 71 नागरिकांना भारतात परत पाठविले आहे. कैदेतील नागरिक आणि मच्छिमारांच्या मायदेशी वापसीसाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आल्याचे भारतीय विदेश मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
2008 मध्ये झालेल्या एका द्विपक्षीय करारांतर्गत दरवर्षी एक जानेवारी आणि एक जुलै रोजी दोन्ही देशांदरम्यान अशाप्रकारच्या यादींचे आदान-प्रदान करण्यात येते. याचनुसार सोमवारी भारत आणि पाकिस्तानने कैदेतील नागरिक आणि ताब्यात घेण्यात आलेल्या मच्छिमारांची यादी परस्परांना पुरविली आहे. भारताने पाकिस्तानचे 366 नागरिक कैदेत असल्याची माहिती देत 86 मच्छिमारांच्या नावांची यादी सोपविली आहे. अशाच प्रकारे पाकिस्तानने देखील भारताचे 43 नागरिक कैदेत असल्याचे सांगत ताब्यात घेण्यात आलेल्या 211 मच्छिमारांच्या नावांची यादी सोपविली आहे.
भारतीय कैद्यांची लवकर सुटका करा
भारत सरकारने पाकिस्तानकडे त्याच्या ताब्यात असलेले भारतीय मच्छिमार तसेच कैदेतील भारतीय नागरिकांची लवकर मुक्तता करण्याची मागणी केली आहे. याचबरोबर पाकिस्तानात ताब्यात घेण्यात आलेल्या भारतीय सैन्य कर्मचाऱ्यांच्या मुक्ततेची मागणी करण्यात आली. स्वत:ची शिक्षा पूर्ण केलेल्या 185 भारतीय मच्छिमार आणि कैदेतील नागरिकांची लवकर मुक्तता करण्याची मागणी पाकिस्तानकडे करण्यात आली आहे. याचबरोबर भारताने पाकिस्तानला 47 भारतीय नागरिक आणि ताब्यात घेण्यात आलेल्या मच्छिमारांना राजनयिक अॅक्सेस प्रदान करण्याची सूचना केली आहे. तर शिक्षा भोगत असलेल्या भारतीय नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आवाहन पाकिस्तानला करण्यात आल्याचे विदेश मंत्रालयाने सांगितले आहे.