मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

हजारो एकर जमीन पाण्याखाली : पूरसदृश परिस्थितीने सारेच हवालदिल  बेळगाव : शहरासह उपनगरात गुरुवारीही मुसळधार पाऊस कोसळल्याने साऱ्यांचीच तारांबळ उडाली. या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पाणी साचून राहिल्याने त्यामधून वाट काढताना कसरत करावी लागली. शहरामध्येही अनेक ठिकाणी पाणी साचून घरांमध्ये शिरले होते. त्यामुळे पाणी काढण्यासाठी साऱ्यांची धावपळ उडाली. गुरुवारी झालेल्या दमदार पावसामुळे शहरातील बाजारपेठेमधील व्यावसायिकांची तारांबळ उडाली आहे. […]

मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

हजारो एकर जमीन पाण्याखाली : पूरसदृश परिस्थितीने सारेच हवालदिल 
बेळगाव : शहरासह उपनगरात गुरुवारीही मुसळधार पाऊस कोसळल्याने साऱ्यांचीच तारांबळ उडाली. या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पाणी साचून राहिल्याने त्यामधून वाट काढताना कसरत करावी लागली. शहरामध्येही अनेक ठिकाणी पाणी साचून घरांमध्ये शिरले होते. त्यामुळे पाणी काढण्यासाठी साऱ्यांची धावपळ उडाली. गुरुवारी झालेल्या दमदार पावसामुळे शहरातील बाजारपेठेमधील व्यावसायिकांची तारांबळ उडाली आहे. फेरीवाले, भाजीविक्रेते तसेच इतर बैठ्या व्यावसायिकांना दणका बसला. संततधार पावसामुळे ग्रामीण भागातील जनतेने शहराच्या बाजारपेठेकडे पाठ फिरविली आहे. तसेच खरेदीसाठी आलेल्या जनतेने तातडीने खरेदी करून माघारी फिरण्यातच धन्यता मानली.
शहरासह उपनगरांमध्ये पाणी साचून आहे. त्यामुळे ये-जा करणेही अवघड झाले आहे. आता काही पुलांवर पाणी येण्याची भीती निर्माण झाली असून काही गावांचा शहराशी संपर्क तुटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सध्या काही गावांचा संपर्क रस्ता तुटला आहे. त्यामुळे नागरिकांना इतर रस्त्यांवरून फेरा मारून शहराकडे यावे लागत आहे. गेल्या सहा दिवसांपासून दमदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. यामुळे शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. बेळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 21 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वात जास्त खानापूर तालुक्यात 75.7 मि.मी. तर त्या खालोखाल बेळगाव तालुक्यात 37.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
बळ्ळारी नाला, मार्कंडेय नदी परिसराला पुराचा विळखा 
बळ्ळारी नाला, मार्कंडेय नदी परिसराला पुराचा विळखा बसला असून शेतकरी हवालदील झाला आहे. पिके पूर्णपणे कुजून जाणार आहेत. शेतकऱ्यांनी पोटतिडकीने बळ्ळारी नाल्याची खोदाई करावी, अशी मागणी अनेकवेळा केली. बेळगाव तालुक्यातील व शहरातील शेतकऱ्यांनी या नाल्यांच्या खोदाईसाठी जिल्हा प्रशासनासह मंत्र्यांकडे पाठपुरावा केला आहे. मात्र त्याकडे साऱ्यांनीच दुर्लक्ष केले आहे. केवळ बेळगावातीलच शेतकरी हा अन्याय सहन करत आहेत. कर्नाटकातील इतर भागातील शेतकरी असते तर सरकारला चांगलाच हिसका दाखविले असते, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. बळ्ळारी नाला, लेंडी नाला परिसरातील हजारो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे. संततधार पाऊस असल्यामुळे हे पाणी कमी होणे अशक्य असून भातपीक पूर्णपणे कुजून जाणार आहे.