परस्पर सहकार्यातून क्राईम रेट घटवूया

आंतरराज्य पोलिसांचे एकमत : निपाणीतील शासकीय विश्रामगृहात सीमावर्ती पोलिसांची गुन्हेगारी आढावा बैठक निपाणी : वाढती गुन्हेगारी थांबवून जनतेला न्याय देण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे. अशावेळी सीमावर्ती भागात कर्नाटक व महाराष्ट्र पोलिसांमध्ये योग्य समन्वय असणे आवश्यक आहे. त्यामुळे बेळगाव आणि कोल्हापूर जिह्यात घडलेले गुन्हे आणि गुन्हेगारांची माहिती परस्परांना दिल्यास कारवाईला गती मिळणार आहे. त्यामुळे परस्पर सहकार्य […]

परस्पर सहकार्यातून क्राईम रेट घटवूया

आंतरराज्य पोलिसांचे एकमत : निपाणीतील शासकीय विश्रामगृहात सीमावर्ती पोलिसांची गुन्हेगारी आढावा बैठक
निपाणी : वाढती गुन्हेगारी थांबवून जनतेला न्याय देण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे. अशावेळी सीमावर्ती भागात कर्नाटक व महाराष्ट्र पोलिसांमध्ये योग्य समन्वय असणे आवश्यक आहे. त्यामुळे बेळगाव आणि कोल्हापूर जिह्यात घडलेले गुन्हे आणि गुन्हेगारांची माहिती परस्परांना दिल्यास कारवाईला गती मिळणार आहे. त्यामुळे परस्पर सहकार्य आणि समन्वयातून सीमाभागात क्राईम रेट घटविण्यासाठी प्रयत्न करूया, या गोष्टीवर बेळगाव आणि कोल्हापूर जिल्हा पोलिसांचे एकमत झाले. निपाणीतील शासकीय विश्रामगृहात सोमवारी सीमावर्ती पोलिसांची गुन्हेगारी आढावा बैठक झाली. अध्यक्षस्थानी चिकोडीचे डीवायएसपी गोपाळकृष्ण गौडर हे होते. प्रारंभी बसवेश्वर चौक पोलीस स्थानकातील गुन्हे विभागाचे उपनिरीक्षक डी. बी. कोतवाल यांनी स्वागत केले. यावेळी गौडर म्हणाले, मोटारसायकल तसेच विद्युत मोटारींची चोरी कर्नाटकात करून महाराष्ट्रात पळून जाणे किंवा महाराष्ट्रात अशा चोऱ्या करून कर्नाटकात पळून जाणे असे प्रकार घडत आहेत. हे रोखण्यासाठी सीमाभागातील दोन्ही जिह्यांमधील पोलिसांनी दक्ष राहणे आवश्यक आहे. सापडलेल्या मुद्देमालाची माहिती एकमेकांना कळविल्यास सदर मुद्देमालाचा मालक कोण हे शोधून त्यांना सुपूर्द करणे शक्य होणार आहे. काही ठिकाणी कर्नाटकातून फरार असलेले आरोपी महाराष्ट्रात कारागृहात असतात, याची माहिती कर्नाटक पोलिसांना नसते. बेवारस मृतदेहांचे शोध घेतानाही अशा अडचणी येतात. अशावेळी परस्परांना सहकार्य करणे आवश्यक आहे. कर्नाटकात एखादा गुन्हा घडल्यास तात्काळ त्याची महाराष्ट्र पोलिसांना माहिती देणे किंवा महाराष्ट्रात गुन्हा घडल्यास कर्नाटक पोलिसांना त्याची माहिती तत्काळ दिल्यास फरार आरोपींना पकडण्यासाठी नाकाबंदी करणे शक्य होणार आहे. त्यावरही परस्परांनी भर देणे गरजेचे आहे, असे सांगितले.
यावेळी कोल्हापूर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सागर वाघ म्हणाले, आतापर्यंत कोल्हापूर जिह्यामध्ये अनेक गुन्हेगारीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये जवळपास निम्म्याहून अधिक गुन्हेगार हे कर्नाटकातील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले आहे. वेळोवेळी महाराष्ट्रातील पोलीस प्रशासनाने कर्नाटकातील पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून अशा गुन्हेगारांची वेळीच धरपकड केली आहे. मात्र काहीअंशी या बाबीवर मर्यादा येत आहेत. हे पाहता कायमस्वरूपी यासाठी गुह्यांसह गुन्हेगारांची धरपकड होण्यासाठी तांत्रिक बाबी दूर करणे काळाची गरज असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित दोन्ही राज्यातील अधिकाऱ्यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची ओळख छायाचित्रासह पटवून घेत योग्य त्या फाईल आदानप्रदान केल्या. या विषयांना महाराष्ट्र पोलिसांनीही दुजोरा देत सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी सीपीआय बी. एस. तळवार, चिकोडीचे सीपीआय विश्वनाथ चौगुले, संकेश्वरचे सीपीआय एस. एस. आवजी, हुक्केरीचे सीपीआय महांतेश बस्सापुरे, कागलचे पोलीस निरीक्षक राजेंद्र लोहार, मुरगूडचे पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर, गडहिंग्लजचे पोलीस निरीक्षक गजानन सलगर, निपाणी शहर पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षक उमादेवी, बसवेश्वर चौक पोलीस उपनिरीक्षक रमेश पोवार, निपाणी ग्रामीणचे उपनिरीक्षक शिवराज नायकवडी, खडकलाट पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षक अनिता राठोड यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Go to Source