हेस्कॉमच्या विद्युतखांबांना केबल्सचा फास

खांबांचा बांडगुळाप्रमाणे फुकटचा वापर : हेस्कॉमचेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष बेळगाव : इंटरनेट तसेच टीव्ही केबल्स प्रोव्हायडर कंपन्यांकडून बेळगाव शहर परिसरात फायबर ऑप्टिक केबल्स ओढण्यात आल्या आहेत. सर्रास केबल्स या हेस्कॉम तसेच बीएसएनएलच्या जुन्या खांबांवरून ओढण्यात आल्या आहेत. बऱ्याचवेळा निकामी झालेल्या केबल्सही तेथेच गुंडाळून ठेवण्यात आल्याने आग लागून दुर्घटना घडत आहेत. परंतु, हेस्कॉमकडून विनापरवाना केबल ओढलेल्या कंपन्यांवर […]

हेस्कॉमच्या विद्युतखांबांना केबल्सचा फास

खांबांचा बांडगुळाप्रमाणे फुकटचा वापर : हेस्कॉमचेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष
बेळगाव : इंटरनेट तसेच टीव्ही केबल्स प्रोव्हायडर कंपन्यांकडून बेळगाव शहर परिसरात फायबर ऑप्टिक केबल्स ओढण्यात आल्या आहेत. सर्रास केबल्स या हेस्कॉम तसेच बीएसएनएलच्या जुन्या खांबांवरून ओढण्यात आल्या आहेत. बऱ्याचवेळा निकामी झालेल्या केबल्सही तेथेच गुंडाळून ठेवण्यात आल्याने आग लागून दुर्घटना घडत आहेत. परंतु, हेस्कॉमकडून विनापरवाना केबल ओढलेल्या कंपन्यांवर अद्याप कारवाई करण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. बिल भरण्यास एक दिवस जरी उशीर झाला तर कारवाई करणाऱ्या हेस्कॉमकडून ऑप्टिक केबल्स ओढलेल्या कंपन्यांना मात्र दिलासा दिला जात आहे. मागील अनेक वषर्पांसून शहरात विविध दूरसंचार तसेच इंटरनेट पुरवठा करणाऱ्या खासगी कंपन्यांनी हातपाय पसरले आहेत. काही कंपन्यांनी भूमिगत केबल्स घातल्या आहेत. मात्र, उर्वरित कंपन्यांनी आपल्या केबल्स हेस्कॉमच्या विद्युतखांबांवरून ओढल्या आहेत. यातील धक्कादायक बाब म्हणजे निम्म्याहून अधिक केबल्स विनापरवाना ओढण्यात आल्या आहेत. परंतु, संबंधित कंपन्यांवर हेस्कॉमकडून कोणतीही कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही. काही कंपन्यांनी रितसर परवानगी घेऊन शहरातील काही भागात हेस्कॉमच्या खांबांवरून केबल ओढल्या आहेत. बेंगळूर महानगरपालिका व बेस्कॉमने एकत्रितरीत्या बेंगळूर शहरातील अनधिकृत ऑप्टिक फायबर केबलवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे बेस्कॉमकडे मोठ्या प्रमाणात महसूल जमा होण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, हेस्कॉमकडून  जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अपघाताला जबाबदार कोण?
विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसात विद्युतवाहिन्या पेट घेण्याचे प्रकार वाढत असतात. शहराच्या मध्यवर्ती भागात निमुळत्या गल्ल्या असून घरांच्या शेजारीच विद्युतखांब बसविण्यात आले आहेत. अधिकृतसह अनधिकृत ऑप्टिक फायबर केबल विद्युतखांबावरून ओढण्यात आल्याने तारांचे जंजाळ निर्माण झाले आहे. अनेकवेळा विद्युतवाहिन्या पेट घेत असून त्यामुळे आजूबाजूच्या घरांनाही धोका निर्माण होत असल्याने हेस्कॉमने अनधिकृत केबल्सवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.