वकिलांना कोट न घालता कामकाज करता येणार

वकिलांतून समाधान : वाढत्या उष्म्यामुळे उच्च न्यायालयाचा निर्णय बेळगाव : राज्यात सर्वत्रच उष्मा वाढला आहे. या उष्म्यामध्ये कोट परिधान करून न्यायालयामध्ये काम करणे अशक्य झाले आहे. त्याबाबत कर्नाटक राज्य बार असोसिएशनने उच्च न्यायालयाकडे कोट नसताना न्यायालयात युक्तिवाद करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. त्याची दखल घेत उच्च न्यायालयाने गुरुवार दि. 18 एप्रिल ते 31 […]

वकिलांना कोट न घालता कामकाज करता येणार

वकिलांतून समाधान : वाढत्या उष्म्यामुळे उच्च न्यायालयाचा निर्णय
बेळगाव : राज्यात सर्वत्रच उष्मा वाढला आहे. या उष्म्यामध्ये कोट परिधान करून न्यायालयामध्ये काम करणे अशक्य झाले आहे. त्याबाबत कर्नाटक राज्य बार असोसिएशनने उच्च न्यायालयाकडे कोट नसताना न्यायालयात युक्तिवाद करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. त्याची दखल घेत उच्च न्यायालयाने गुरुवार दि. 18 एप्रिल ते 31 मे पर्यंत कोट न घालता वकिलांना न्यायालयीन कामकाज करण्यास मुभा दिली आहे. यामुळे वकिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या बेळगाव जिल्ह्यामध्येही उष्मा वाढला आहे. साऱ्यांच्याच अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. या उष्म्यामध्ये कोट घालून न्यायालयामध्ये कामकाज करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे वकिलांनाही कोट न घालता कामकाज करण्यास मुभा मागितली होती. उच्च न्यायालयाने वकिलांना पांढऱ्या रंगाचे शर्ट परिधान करून युक्तिवाद करण्यास मुभा दिली आहे. याचबरोबर महिला वकिलांनाही पांढऱ्या रंगाचे सलवार कमीज किंवा फिकट रंगाची साडी परिधान करून युक्तिवाद तसेच न्यायालयीन कामकाज करता येणार आहे. मात्र नेक बॅन्ड घालावे लागणार आहे. यावर्षी पाऱ्याने उच्चांक गाठला आहे. उष्म्यामुळे सारेच हैराण झाले आहेत. अंगामध्ये केवळ खादी कपडे घालण्याकडेच साऱ्यांचा कल वाढला आहे. वकिलांना मात्र काळ्यारंगाचा कोट घालून काम करावे लागत होते. त्यामुळे अधिकच उष्मा जाणवत होता. आता केवळ पांढऱ्या रंगाचे शर्ट घालून काम करता येणार आहे. त्यामुळे वकिलांना दिलासा मिळाला आहे. बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. एस. एस. किवडसण्णावर, जनरल सेक्रेटरी अॅड. वाय. के. दिवटे यांनीही उच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत.